अकोला : अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे टिनपत्राच्या सभामंडपावर कडूनिंबाचे झाड कोसळून आठ भाविक ठार झाल्याची घटना गेल्या ९ एप्रिल रोजी जिल्हयातील बाळापूर तालुक्यात पारस येथील बाबुजी महाराज संस्थान येथे घडली. या दुर्घटनेतील आठ मृतकांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत राज्य शासनाने घोषित केली आहे. त्यानुसार आठ मृतक भाविकांच्या कुटुंबियांसाठी ३२ लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश बाळापूर तहसीलदारांना वितरीत करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी २४ एप्रिल रोजी दिला.
मदतीच्या रक्कमेचे धनादेश तहसीलदारांकडून मृतकांच्या कुटुंबियांना वितरीत करण्यात येणार आहेत. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात गेल्या ९ एप्रिल रोजी बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबुजी महाराज संस्थान येथे टिनपत्र्याच्या सभामंडपावर निंबाचे झाड कोसळून सात भाविकांचा मृत्यू झाला होता. या घटनेत जखमींपैकी गंभीर जखमी आणखी एकाचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पारस येथील दुर्घनेत मृत्यू झालेल्या मृतकांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यानुसार मदतनिधी शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्यानंतर, दुर्घटनेतील आठ मृतकांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी चार लाख रुपयांप्रमाणे ३२ लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश बाळापूर येथील तहसीलदारांना वितरीत करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. त्यानुसार बाळापूर तहसीलदारांमार्फत मदतीच्या रक्कमेचे धनादेश मृतकांच्या कुटुंबियांना वितरीत करण्यात येणार आहेत.
जखमींसाठी एक लाखाची मदतपारस येथील दुर्घटनेत जखमी झालेल्या २४ जणांना मदत देण्यासाठी एक लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बाळापूर येथील तहसीलदारांना वितरीत करण्यात आला. त्यानुसार उपलब्ध मदत निधीतून तहसीलदारांमार्फत संबंधित जखमींना मदतीची रक्कम दिली जाणार आहे.
२३२ घरांची पडझडअवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या तडाख्यात पारस येथे २३२ घरांची पडझड झाली होती. अंशत: नुकसान झालेल्या संबंधित घरांची भरपाइ देण्यासाठी आठ लाख रुपयांचा मदतनिधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बाळापूर तहसीलदारांना वितरीत करण्यात आला असून, घरांच्या नुकसानीचे मूल्यांकन केल्यानंतर बाळापूर तहसीलदारांमार्फत मदतीची रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.