लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणापासून दूर असलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ३० शाळांमध्ये ‘सीसी कॅमेरे’ लावण्यात येणार आहेत. त्यासाठी शाळांची नावे निश्चित करण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत शुक्रवारी घेण्यात आला. यावर्षीचे गणवेश धोरण लवकरच निश्चित करण्याचेही सभेत ठरविण्यात आले.शाळांमध्ये सीसी कॅमेरे लावण्यासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध असून, या निधीतून जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणापासून दूर असलेल्या ३० शाळांमध्ये सीसी कॅमेरे लावण्यासाठी शाळांची नावे देण्याचे ठरविण्यात आले. जिल्ह्यात दुर्गम भागातील ४० शाळांमध्ये बायोमेट्रिक यंत्र बसविण्यात येणार असून, शाळांची नावे निश्चित करण्याचे या सभेत ठरले. तसेच जलशुद्धीकरण यंत्र लावण्यासाठी दहा शाळांची नावे तातडीने सुचविण्याचे निर्देश या सभेत देण्यात आले. शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला समितीचे सदस्य प्रतिभा अवचार, ज्योत्स्ना चोरे, अनिता आखरे, संतोष वाकोडे, मनोहर हरणे, अक्षय लहाने यांच्यासह शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर उपस्थित होते.वैद्यकीय देयके; पोषण आहाराचा मुद्दा गाजला!वैद्यकीय प्रतिपूर्तीची प्रलंबित ४०० देयके आणि शालेय पोषण आहराचा मुद्दा समितीच्या सभेत चांगलाच गाजला. वैद्यकीय प्रतिपूर्तीची देयके निकाली काढण्यासाठी काय प्रयत्न करण्यात आले, यासंदर्भात विचारणा करण्यात आली. तसेच यासंदर्भात संबंधितांविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शालेय पोषण आहाराची माहिती अद्याप का प्राप्त झाली नाही, असा प्रश्न या सभेत उपस्थित करण्यात आला व माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
३० शाळांमध्ये लावणार ‘सीसी कॅमेरे’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2017 00:50 IST