कुजबुज-२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:15 AM2021-06-22T04:15:47+5:302021-06-22T04:15:47+5:30

अहमदनगर शहराच्या नव्या महापौरांचे आता वेध लागले आहेत. शिवसेनेकडे संख्याबळ, महापौरपदाचा तगडा उमेदवार आहे. फक्त सोबतीला कोण घ्यायचे, तेच ...

Whisper-2 | कुजबुज-२

कुजबुज-२

Next

अहमदनगर शहराच्या नव्या महापौरांचे आता वेध लागले आहेत. शिवसेनेकडे संख्याबळ, महापौरपदाचा तगडा उमेदवार आहे. फक्त सोबतीला कोण घ्यायचे, तेच ठरवायचे बाकी राहिले आहे. संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांचा शिवसेनेतील नगरसेवकांसोबत आमदार संग्राम जगताप यांच्याशीही संपर्क असतो. या नात्याने ते संपर्कप्रमुखाची चांगलीच भूमिका वठवतात. त्यामुळे शिवसेनेतील काही नगरसेवक आणि कोरगावकर मिळून मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अधूनमधून भेटत असतात. मात्र त्यात अनेक नगरसेवकांना डावलले जाते. त्यामुळे त्यांनी नाराजी कायम असते. ही नाराजी रविवारी एका हॉटेलवर झालेल्या बैठकीत उघड झाली. महापौर निवडीच्याआधी सहलीचे नियोजन करण्यासाठी सेनेचे सर्वच्या सर्व नगरसेवक झाडून-पुसून उपस्थित होते. त्यातील बरेच जण म्हणत होते, ठाकरे यांना भेटीला जाताना विश्वासात घेत नाहीत, मग आता सहलीला कशाला नेता. पण असे त्यांना थेट म्हणता येईना. त्यामुळे अनेकांनी तपासणी करायची आहे, कोराेनात एकत्र सहल कशाला काढायची, घरची खूप कामे आहेत, असा नाराजीचा सूर आळवला. त्यामुळे महापौरपदाच्या उमेदवारांना चांगलीच धास्ती बसली. त्यात शिवसेनेेच्या आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बमुळे स्थानिक राजकारण तर फिरणार नाही ना, याचीही चिंता लागली आहे.

-----------

योग म्हणायचा की योगायोग

सध्या शिवसेना आणि भाजप हे परस्परांचे राजकीय विरोधक असले तरी नगर शहरात भाजपपेक्षा शिवसेनेची ताकद मोठीच आहे, हे विसरून चालणार नाही. तसे दोन्ही पक्षातील स्थानिक नेते आणि आजी-माजी नगरसेवक यांचे घरोब्याचे संबंध आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने भाजपला सामुदायिक योग दिन घ्यायला शिवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्याच मंगल कार्यालयाचा आसरा घ्यावा लागला. भाजपचे सर्वजण योगा करणार म्हटल्यावर फुलसौंदर यांनीही मोठ्या मनाने त्यांना मोफत जागा दिली. फुलसौंदर यांचे मंगल कार्यालय फक्त शिवसेनेच्याच कार्यक्रमासाठी प्रसिद्ध आहे. मात्र भाजपलाही तिथे कार्यक्रम घ्यायची इच्छा व्हावी, हा फक्त योग म्हणायचा की योगायोग याची मात्र शहरात चर्चा सुरू झाली आहे. भाजपमधील सर्व पदाधिकारी, नगरसेवक या योग वर्गाला उपस्थित होते. त्यात मंगल कार्यालयाचे मालक या नात्याने भगवान फुलसौंदर सहभागी झाले होते. राज्यात शिवसेना-भाजप एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना नगरचा हा योगा-योगही लक्षवेधी ठरला आहे.

Web Title: Whisper-2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.