..तरी देवा सरना ह्यो भोग कशापायी? महाराष्ट्रीयन मजुरांच्या व्यथा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 11:41 AM2020-05-17T11:41:59+5:302020-05-17T11:42:24+5:30

परप्रातींयासाठी राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली जाते. प्रवासासाठी एसटी बस, रेल्वे दिली जाते. आम्ही महाराष्ट्रातालेच़ महाराष्ट्रासाठीच काम करतो. तरीही आमचाच भोग का सरत नाही? सरकार आमची व्यवस्था का करीत नाही. आम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहोत, हा आमचा गुन्हा आहे का? ते माणंस हाईत तर आम्ही जनावरं कसे? असे प्रश्न पुण्यावरुन अमरावतीला  पायी निघालेला सुनील ठेपे विचारत होता. 

..But what happened to Deva Sarna? The plight of Maharashtrian laborers .. | ..तरी देवा सरना ह्यो भोग कशापायी? महाराष्ट्रीयन मजुरांच्या व्यथा..

..तरी देवा सरना ह्यो भोग कशापायी? महाराष्ट्रीयन मजुरांच्या व्यथा..

Next

साहेबराव नरसाळे । 
अहमदनगर : परप्रातींयासाठी राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली जाते. प्रवासासाठी एसटी बस, रेल्वे दिली जाते. आम्ही महाराष्ट्रातालेच़ महाराष्ट्रासाठीच काम करतो. तरीही आमचाच भोग का सरत नाही? सरकार आमची व्यवस्था का करीत नाही. आम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहोत, हा आमचा गुन्हा आहे का? ते माणंस हाईत तर आम्ही जनावरं कसे? असे प्रश्न पुण्यावरुन अमरावतीला पायी निघालेला सुनील ठेपे विचारत होता. 
पुण्यातील बालेवाडी परिसरात वीटभट्टी मजूर असलेले ठेपे कुटुंबिय १३ मे रोजी गावाकडे जायला निघाले. शुक्रवारी (दि़१५) हे कुटुंबीय नगरजवळील केडगाव बायपास रोडपर्यंत पोहोचले.
 खांद्यावर तीन-चार वर्षांची तीन पोरं, गोण्यांमध्ये भरलेला अख्खा संसार डोक्यावर घेऊन हे कुटुंब घराच्या ओढीने निघाले होते. पुण्याहून केडगाव बायपासला ते आले तेंव्हा तिथे परप्रांतीय मजुरांसाठी बसची व्यवस्था करण्यात एसटी महामंडळाचे अधिकारी व्यस्त होते. ‘साहेब आमच्यासाठीही एखादी बस किंवा खासगी गाडी सोडा,’ अशी विनवणी या मजुरांनी एसटी महामंडळाचे अधिकारी, पोलिसांकडे केली. ‘तुमची काहीही व्यवस्था नाही,’ असे त्यांना सांगत हे अधिकारी पुन्हा परप्रांतीयांच्या सेवेत रुजू झाले. तेथून थोड्याच अंतरावर एक ट्रक उत्तर प्रदेशसाठी भरला जात होता. या ट्रकवाल्याकडेही या मजुरांनी विचारणा केली. परंतु त्यानेही महाराष्ट्रीयन लोकांसाठी ही ट्रक नाही, असे सांगत झिडकारले. शेवटी हे मजूर शिणल्या तोंडाने केडगाव बायपास रोडने अमरावतीकडे रवाना झाले.
ट्रकवाल्यांचे  उखळ पांढरे
उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगढ येथे जाणा-या मजुरांकडून एका व्यक्तीसाठी ३ हजार रुपये तर सीमेपर्यंत सोडण्यासाठी दीड हजार रुपये मागितले जात होते. ट्रकवाल्यांना प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना नसतानाही बेकायदा ही वाहतूक केली जात होती. विशेष म्हणजे पोलिसांसमोर हे ट्रक भरले जात होते. एसटी महामंडळाचे अधिकारीही या ट्रकवाल्यांकडे कानाडोळा करीत होते़ त्यामुळे ट्रकवाल्यांनी आपले उखळ पांढरे करण्याची संधी साधली.
पुण्यावरुन हे मजूर नगरला येतातच कसे?
केडगाव बायपासला आलेले सर्व मजुर पुणे जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रात काम करणारे होते. पुण्यावरुन काही मजूर पायी तर काही ट्रकमधून केडगाव बायपास रोडवर येत होते. केडगाव बायपासवरुन उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगढ येथे जाण्याची तसेच जेवणाची व्यवस्था करण्यात येत असल्याचे त्यांना सांगितले होते. विशेष म्हणजे काही मजुरांकडे शिरुर, शिक्रापूर तहसीलदारांनी दिलेले पत्र होते. या मजुरांची आरोग्य तपासणीही तेथे करण्यात आली होती. तेथून या मजुरांना केडगाव बायपासला पाठविण्यात आल्याचे हे मजुर सांगत होते. पुणे रेड झोनमध्ये असतानाही हे मजूर पुण्यातून नगरला येतातच कसे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.  
परप्रांतीयांसाठी एकाच दिवसात ४५ बस
केडगाव बायपासला गुरुवारी सुमारे चार ते पाच हजार परप्रांतीय मजूर आले होते. गुरुवारी (दि़ १४) छत्तीसगढ, मध्यप्रदेश या राज्यांमधील मजुरांना सोडण्यासाठी प्रशासनाने ४५ एस़टी़ बसची व्यवस्था केली होती. शुक्रवारीही छत्तीसगढसाठी बस सोडण्यात आल्या. मात्र, महाराष्ट्रातील विविध भागात राहणा-या मजुरांसाठी काहीच व्यवस्था नव्हती. स्वयंसेवी संस्थांच्या वतीनेही परप्रांतीय मजुरांना जेवण, चहा, पाणी अशी सर्व व्यवस्था केली जात होती. मात्र, महाराष्ट्रीयन माणूस उपाशीपोटी पायी गावाकडे जात होता.

 
परप्रांतीय मजुरांना महाराष्ट्राच्या बॉर्डरपर्यंत एस. टी. बसने सोडले जात आहे. महाराष्ट्रातील मजुरांना जर त्यांच्या गावी जायचे असेल तर त्यांनी त्या-त्या तहसीलदारांकडे नोंदणी करावी. ट्रकमधून जर कोणी प्रवासी वाहतूक करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल़, असे नगरचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी सांगितले.


सध्या फक्त परप्रांतीय लोकांना सोडण्यासाठी सरकारने निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रीयन लोकांसाठी काहीच व्यवस्था नाही. परप्रांतीय लोकांनाही बॉर्डरपर्यंतच सोडण्याची व्यवस्था आहे. तेथून पुढे त्यांनी त्यांची व्यवस्था करायची आहे, असे एस. टी.चे विभाग नियंत्रक विजय गिते यांनी सांगितले. 
 

Web Title: ..But what happened to Deva Sarna? The plight of Maharashtrian laborers ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.