Three workers killed in crane collapsing | क्रेन तुटून तीन कामगार ठार
क्रेन तुटून तीन कामगार ठार

अकोले (जि.अहमदनगर) : तालुक्यातील हिवरगाव आंबरे येथे देवठाण रोडलगत गहिनीनाथनगर शिवारात जोर्वेकर यांचे विहिरीत क्रेन तुटून झालेल्या अपघातात तीन कामगार ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी सव्वा दोनच्या दरम्यान घडली.


या अपघातात गणेश चंद्रभान कदम (वय ३३, रा.हिवरगाव आंबरे), नवनाथ गोविंद शिंदे (वय ४१, रा.वडगाव लांडगा, ता.संगमनेर) व बाळासाहेब दत्तू शेळके (वय ४४, रा.देवठाण) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. विहीर खोल खोदण्याचे काम सुरु होते. दुपारी जेवण झाल्यानंतर हे तिघे क्रे नने विहिरीत उतरत असताना क्रेनची कडी तुटली आणि तिघेही विहिरीत पडले. कदम व शिंदे हे दोघे एकमेकांचे मेहुणे असून ते जागीच ठार झाले. शेळके यांना दवाखान्यात नेत असताना वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली.

अकोले ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. सोमवारी सायंकाळी उशिरा शवविच्छेदन झाल्यानंतर शोकाकुल वातावरणात हिवरगाव व देवठाण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने हिवरगाव आंबरे, देवठाण व वडगाव लांडगा या तीन गावात शोककळा पसरली आहे.


Web Title: Three workers killed in crane collapsing
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.