पिंपळगाव माळवी प्रकरणात तीन अभियंत्यांवर संशयाची सुई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 04:59 PM2019-08-02T16:59:11+5:302019-08-02T17:06:05+5:30

पिंपळगाव माळवी (ता़ नगर) येथील पाणी पुरवठा योजनेतील अनागोंदीवरुन तीन अभियंत्यांवर संशयाची सुई असून, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यासाठी जिल्हा परिषदेत हालचाली सुरु झाल्या आहेत़

 Three engineers in need of suspicion in Pimpalgaon Malvi case | पिंपळगाव माळवी प्रकरणात तीन अभियंत्यांवर संशयाची सुई

पिंपळगाव माळवी प्रकरणात तीन अभियंत्यांवर संशयाची सुई

Next

साहेबराव नरसाळे

अहमदनगर : पिंपळगाव माळवी (ता़ नगर) येथील पाणी पुरवठा योजनेतील अनागोंदीवरुन तीन अभियंत्यांवर संशयाची सुई असून, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यासाठी जिल्हा परिषदेत हालचाली सुरु झाल्या आहेत़ मात्र, पाण्याच्या टाकीची जागा बक्षिसपत्र झालेली नसतानाही या योजनेला प्रशासकीय मान्यता देणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांच्यावर कोण जबाबदारी निश्चित करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़
पिंपळगाव माळवी येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून १ कोटी २२ लाख रुपये खर्चून पाणी योजना मंजूर करण्यात आली होती़ २८ फेबु्रवारी २०१८ रोजी या योजनेच्या कामाला प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश देण्यात आला़ पाईपलाईन टाकण्याचे प्रगतीपथावर आहे़ मात्र, पूर्वीची जागा बक्षिसपत्र करुन न घेताच काम सुरु झाले़ ज्यांची जमीन पाण्याच्या टाकीसाठी वापरण्यात येणार होती, त्या जागेचे बक्षिसपत्र करुन नंतर काम सुरु होणे अपेक्षित होते़ मात्र, जागा मालकाचे केवळ सहमती पत्र घेऊन काम सुरु करण्यात आले़ नंतर संबंधित जागा मालकाने बक्षिसपत्र करुन देण्यास नकार दिला़ त्यानंतर संबंधित ठेकेदारास या योजनेतील पाईपलाईनचे ४८ लाख रुपये अदा करण्यात आले़ वास्तविक योजनेला तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया व कार्यारंभ आदेश देण्यापूर्वी जागेचे बक्षिसपत्र करुन घेणे आवश्यक होते़ मात्र, त्याकडे दुर्लक्ष करुन ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आला़ पाईपलाईनचे कामही अपूर्ण असताना ठेकेदाराला ४८ लाख रुपये अदा करण्यात आले़ यावरुन जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत व स्थायी समितीत चौकशीची मागणी करण्यात आली़ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी या योजनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही प्रस्तावित करण्याच्या सूचना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता ए़ ए़ कोकरे यांना दिल्या़ त्यानुसार या योजनेच्या कामांना त्या - त्या टप्यावर कोणी मान्यता दिली, तांत्रिक बाबी का तपासण्यात आल्या नाहीत, निविदा प्रक्रिया कशी राबविण्यात आली, कामेच अपूर्ण असताना ठेकेदारांना बिले का देण्यात आली, याची माहिती मागवून संबंधित अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत़
दरम्यान या योजनेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांनी प्रशासकीय मान्यता दिली असून, त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करणार का, असा सवाल पाणी पुरवठा विभागातीलच काही अधिकारी उपस्थित करीत आहेत़

पूर्वीच्या व आत्ताच्या जागांमध्ये अंतर
च्पिंपळगाव माळवी गावास या योजनेतून पाणी पुरवठा करण्यासाठी दोन साठवण टाक्या बांधण्यात येणार आहेत़ त्यासाठी पूर्वी ज्या जमीन मालकाने जागा बक्षिसपत्र करुन देण्याची संमती दाखविली होती, त्या जागेनुसार योजनेचा आराखडा तयार करण्यात आला़ त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आणि निविदा प्रक्रियाही त्याच आराखड्यानुसार राबविण्यात आली़
च्मात्र, नंतर त्या जागा मालकाने जागा बक्षिसपत्र करुन देण्यास नकार दिला़ नंतर पाणी पुरवठा विभागाची जागेसाठी धावाधाव सुरु झाली़ ग्रामपंचायतीने एका टाकीच्या बांधकामासाठी जागा देण्याची तयारी दाखविली आहे़ पूर्वीची जागा व ग्रामपंचायतीने दिलेली जागा यात सुमारे ४५० मीटरचे अंतर आहे़ तर दुसºया टाकीसाठी एका खासगी जागा मालकाने जागा दिली आहे़ यातही सुमारे २५० मीटरचे अंतर आहे़ या दोन्ही जागांची समपातळी तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात येते़

कारणे दाखवा नोटीस बजावण्याची तयारी
च्या योजनेतील अनागोंदीला तत्कालीन कनिष्ठ अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांचा त्या-त्या टप्प्यावर काय सहभाग राहिला, याबाबत जिल्हा परिषदेने पडताळणी सुरु केली आहे़

बक्षिसपत्र करुन जिल्हा परिषदेच्या नावावर होत नाही, तोपर्यंत तांत्रिक मंजुरी, निविदा प्रक्रिया, कार्यारंभ आदेश या प्रक्रिया का करण्यात आल्या, याबाबतचा खुलासा संबंधितांकडे मागितला जाणार आहे़ यात तीनही अभियंत्यांची जबाबदारी निश्चित करुन त्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल, असे सांगण्यात आले़

Web Title:  Three engineers in need of suspicion in Pimpalgaon Malvi case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.