राज्यात उसाचा दर ठरविणारी यंत्रणाच नाही, ऊस दर नियंत्रण मंडळाचा सूर

By शिवाजी पवार | Published: November 27, 2023 04:04 PM2023-11-27T16:04:49+5:302023-11-27T16:06:37+5:30

पाच वर्षे गठन नाही; कारखान्यांची मनमानी

There is no sugarcane rate fixing system in the state, Sugarcane Rate Control Board | राज्यात उसाचा दर ठरविणारी यंत्रणाच नाही, ऊस दर नियंत्रण मंडळाचा सूर

राज्यात उसाचा दर ठरविणारी यंत्रणाच नाही, ऊस दर नियंत्रण मंडळाचा सूर

शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर): साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाचा किती दर द्यावा यासाठी कायद्याने गठित केलेले ऊस दर नियंत्रण मंडळ राज्यात गेली पाच वर्षे अस्तित्वात आलेले नाही. त्यामुळे साखर कारखाने मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांना दर देत आहेत. विशेषतः नगर जिल्ह्यात कारखान्यांनी दर जाहीर न करताच गाळप हंगाम सुरू केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कारखानदारांना फटकारले आहे.

नगर जिल्हा हा उसाची पंढरी म्हणून ओळखला जातो. खासगी तसेच सहकारी मिळून तब्बल २३ कारखाने कार्यरत आहेत. मात्र प्रवरा सहकारी साखर कारखाना तसेच अन्य काही अपवाद वगळता कोणत्याही कारखान्याने उसाचा दर जाहीर केेलेला नाही. प्रवरेने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वसाधारण सभेत टनाला तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली. इतर कारखानदारांनी मात्र दराबाबत चुप्पी साधली आहे. अखेर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी सर्व कारखानदारांना ऊस दर जाहीर करण्याची सक्ती केली.

केंद्र सरकारने १०.२५ टक्के साखर उताऱ्याला ३,१५० रुपये दर जाहीर केला. त्यापुढील प्रत्येक एक टक्का साखर उताऱ्यावर ३१५ रुपये दर त्यानुसार द्यावयाचा आहे. मात्र, असे असले तरी राज्य सरकारने २०१३ च्या कायद्यानुसार उसाचे दर निश्चित करण्यासाठी एक नियंत्रण मंडळ गठित केले आहे. या मंडळामध्ये राज्याचे मुख्य सचिव, वित्त सचिव, सहकार सचिव, कृषी सचिव, राज्य सरकारचे नामनिर्देशित केलेले साखर कारखानदारांचे पाच प्रतिनिधी, शेतकऱ्यांचे पाच प्रतिनिधी आणि साखर आयुक्त यांचा समावेश आहे.

राज्यातील महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये हे मंडळ कार्यरत होते. मात्र आघाडी सरकार कोसळल्यानंतर समिती बरखास्त झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये अद्यापही ऊस दर नियंत्रण मंडळ अस्तित्वात येऊ शकलेले नाही. ऊस नियंत्रण आदेश १९६६ च्या तरतुदीनुसार उत्पन्न विभागणीच्या आधारे केंद्र सरकारने ठरविलेल्या एफआरपी व्यतिरिक्तचा शेतकऱ्यांना द्यावयाचा दर मंडळाकडून जाहीर होतो. हा दर निश्चित करताना बॅग्स, मळी व प्रेसमड, वीजनिर्मिती यांसारख्या उपपदार्थांच्या मूल्यांसह साखरेच्या मूल्याच्या आधारे ७०-३० असे सूत्र अंमलात आले आहे. ज्या कारखान्यांकडे उपपदार्थांची निर्मिती केली जात नाही व केवळ साखरेच्या मूल्याच्या आधारे ऊस दर निश्चित होतो, त्यांच्यासाठी हे सूत्र ७५-२५ (शेतकरी व कारखानदारांतील विभागणी) असे आहे.
एफआरपी ही उसाचा पुरवठा केल्यानंतर १४ दिवसांत अदा करावयाची असून उर्वरित पैसे हे मंडळाकडून निर्धारित केलेला अर्धवार्षिक कारखाना दर व मूल्य प्रसिद्धीनंतर द्यावयाचा आहे.

Web Title: There is no sugarcane rate fixing system in the state, Sugarcane Rate Control Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.