Take the cattle in camps; Movement of farmers in Tahsildar office | वाढीव जनावरे छावणीत घ्या ; शेतक-यांचे तहसीलदार कार्यालयात आंदोलन
वाढीव जनावरे छावणीत घ्या ; शेतक-यांचे तहसीलदार कार्यालयात आंदोलन

केडगाव : शासनाने दुष्काळात शेतक-यांचे पशुधन वाचविण्याच्या हेतूने नगर तालुक्यात छावण्या सुरू केल्या. पावसाने दडी मारल्याने छावण्यात शेतक-यांची नवीन जनावरे दाखल होत आहे. मात्र प्रशासन या जनावरांना छावण्यात घेण्यास परवानगी देण्यास टाळाटाळ करत आहे. चा-याअभावी जनावरांचा पोटमारा होत असल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. छावणीत नवीन जनावरे घेण्यास तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी करत तालुक्यातील शेतक-यांनी तहसीलदारांच्या कार्यालयात बैठे आंदोलनास सुरुवात केली असून तहसीलदारांकडून परवानगी मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शेतक-यांनी घेतली आहे.
तालुक्यातील शेतक-यांनी बाजार समितीचे उपसभापती रेवणनाथ चोभे, भाजपाचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. दुष्काळात चारा व पाणीटंचाईमुळे शेतक-यांच्या जनावरांना छावण्यांचा मोठा आधार मिळाला. ज्या शेतक-यांकडे चारा उपलब्ध होता. त्यांची जनावरे दावणीलाच होती. मात्र पावसाने मारलेली दडी अन चाराच संपल्याने छावणीबाह्य असलेली दावणीतील जनावरे मोठया संख्येने छावणीत दाखल होत आहेत. नवीन जनावरांना छावणीत घेण्यास प्रशासन परवानगी देण्यास टाळाटाळ करत आहे. घरचा चारा संपला, परवानगीअभावी शासनाचाही चारा मिळेना अशा अवस्थेत जनावरांचा पोटमारा होत आहे. आमची जनावरे छावणीत घेण्यास तत्काळ परवानगी अशी मागणी होत असून प्रशासकीय अधिकारी या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलक शेतक-यांनी केला आहे. तालुक्यातील वाळकी, हिवरेझरे, बाबुर्डी बेंद, राळेगण म्हसोबा, वडगाव तांदळी, रुई छत्तीशी सह अन्य गावातील शेतक-यांकडे चारा उपलब्ध असल्याने रुई छत्तीशी सह अन्य गावातील शेतक-यांकडे चारा उपलब्ध असल्याने छावणी बाह्य जनावरांची संख्या मोठी होती. पावसाने दिलेला ताण आणि दावणीचा चारा संपल्याने नवीन जनावरे छावणीत येत आहेत. मात्र परवानगी शिवाय या जनावरांना चारा मिळत नाही. अधिका-यांच्या परवानगी शिवाय छावणीचालक नवीन जनावरे छावणीत घेण्यास तयार होत नाहीत.
दुष्काळात शेतक-यांच्या जनावरांचा पोटमारा होऊ नये म्हणून शासनाने छावण्या सुरु केल्या. मात्र अधिका-यांच्या आडमुठ्या धोरणामुळे जनावरांची उपासमार होत आहे. नवीन जनावरांना छावणीत घेण्यास व तत्काळ चारा देण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी मागणी केली. आंदोलनात बाजार समितीचे उपसभापती रेवननाथ चोभे, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, सुधीर भापकर, उध्दव कांबळे, गोरख काळे, प्रशांत जाधव, दत्ता काळे, गणेश हराळ, शहाजी कुताळ, तुषार चोभे, बाबासाहेब काळे, विजय काळे आदींसह शेतकरी सहभागी झाले.


Web Title: Take the cattle in camps; Movement of farmers in Tahsildar office
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.