Sundays Special: नगरचे हिलस्टेशन उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 03:53 PM2019-02-24T15:53:20+5:302019-02-24T15:53:26+5:30

मांजरसुंबा येथील उंच हिरव्यागार डोंगरावर उभारण्यात आलेल्या निजामशाहीकालिन मर्दानखाना ही ऐतिहासिक वास्तू देखभाल अभावी मोडकळीस आल्याने अखेरच्या घटका मोजत आहे.

Sundays Special: The city's hill station is neglected | Sundays Special: नगरचे हिलस्टेशन उपेक्षित

Sundays Special: नगरचे हिलस्टेशन उपेक्षित

googlenewsNext

योगेश गुंड
केडगाव : मांजरसुंबा येथील उंच हिरव्यागार डोंगरावर उभारण्यात आलेल्या निजामशाहीकालिन मर्दानखाना ही ऐतिहासिक वास्तू देखभाल अभावी मोडकळीस आल्याने अखेरच्या घटका मोजत आहे. नगरचे हिलस्टेशन असणारा हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होण्यासाठीच्या प्रस्तावावर आता धूळ बसली आहे.
हिरव्यागार डोंगरदऱ्यांनी नटलेला हा परिसर समुद्र सपाटीपासून सुमारे २९०० फूट उंचीवर आहे. यामुळेच हा परिसर नगरचे हिलस्टेशन म्हणून आता ओळखला जाऊ लागला आहे. येथील निसर्ग व ऐतिहासिक वास्तूच्या सौंदर्य निरीक्षणाचा आनंद घेण्यासाठी येणाºया पर्यटकांना येथे कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. डोंगरगण व गोरक्षनाथ गड यांच्या मध्यभागी असलेल्या उंच डोंगरावर निजामशाहाच्या काळात बादशहाच्या विश्रांतीसाठी हा देखणा मर्दानखाना महाल बांधण्यात आला. या वास्तूमुळे नगरच्या ऐतिहासिक वैभवात भर पडली आहे. मात्र देखभालीअभावी व लक्ष न दिल्याने या सुंदर वास्तूचे आता पडझड झालेले अवशेष उरले आहेत. भग्नावस्थेत असणारी ही वास्तू पर्यटन विकासापासून वंचित राहिली आहे.
निजामशाही सुरक्षित राहावी, परकीय सत्तांचे आक्रमण होऊ नये म्हणून या महालातून टेहळणी केली जात होती. या महालाशेजारी जलविहारासाठी तयार केलेला तलाव, त्यात पाणी भरण्यासाठी हत्ती मोट, स्नानासाठीचा हमामखाना, शाही दरवाजा, चौकी,याच ठिकाणी दावलमलिक दर्गा आहे.
मांजरसुंबा ग्रामस्थांनी दोन लाख रूपये खर्चुन महालावर पर्यटकांना जाण्यासाठी रस्ता तयार केला होता. मात्र पावसामुळे या रस्त्याची पूर्ण वाट लागली आहे. मांजरसुंबा गडावर पॅराग्लायडिंग व ट्रेकिंग करण्यासाठी काही हौशी पर्यटक येत असतात. याच गडावर मराठी चित्रपटाचे चित्रीकरण व अनेक लघुपटाचे चित्रीकरण झाले आहे. सुटीच्या दिवशी अनेक पर्यटक येथे आपली सुटी घालविण्यासाठी आवर्जून भेट देतात. मात्र सुखसुविधा नसल्याने पर्यटकांची मोठी अडचण होते.
असा आहे पर्यटन विकासाचा प्रस्ताव
मांजरसुंबा येथील ऐतिहासिक वास्तूचे व येथील निसर्गाचे सौंदर्य वाढविण्यासाठी सरपंच जालिंदर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी पर्यटनाचा प्रकल्प तयार केला. त्यात पर्यटकांसाठी खेळण्या, बाकडे, झोके, रोपवे, बंधारे, रस्ते असा प्रकल्प तयार केला. त्यास ग्रामवन असे नावही देण्यात आले. हा प्रस्ताव सरकारी दरबारी धूळ खात पडला आहे.


सुशोभीकरणाचा प्रस्ताव धूळ खात पडून
मांजरसुंबा गावाने येथील निसर्ग व ऐतिहासिक महत्त्व ओळखून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथील विकास कामांचा व सुशोभीकरणाचा प्रस्ताव महसूल आयुक्तांकडे पाठवूनही त्यावर कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत.

नगरकरांच्या पर्यटनासाठी आम्ही येथील विकासकामांचा प्रस्ताव तयार केला. तो मंजूर झाल्यास येथील ऐतिहासिक वास्तू व निसर्गरम्य वातावरणाचा पर्यटन विकासासाठी फायदा होणार आहे. काही खासगी कंपन्या सुद्धा येथील ऐतिहासिक वास्तूच्या दुरूस्तीसाठी पुढे येत आहेत. मात्र त्यांना मंजुरी मिळत नाही. -जालिंदर कदम, सरपंच ,मांजरसुंबा.

Web Title: Sundays Special: The city's hill station is neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.