दत्ता देशमुख नावाचे वादळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 03:04 PM2019-08-17T15:04:01+5:302019-08-17T15:04:07+5:30

स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्टÑ चळवळ राबविणा-या कॉम्रेड दत्ता देशमुख यांनी १९४६ च्या प्रांतिक निवडणुकीत विजय मिळवून संगमनेर तालुक्याचे पहिले आमदार म्हणून तालुक्याच्या विकासाचा पाया घातला. १९६२ मध्ये दिल्लीला जाताना यशवंतराव चव्हाणांनी येरवडा जेलमध्ये जाऊन स्थानबद्ध असलेल्या दत्ता देशमुख यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना ‘महाराष्टÑाचे नेतृत्व’ करण्याची आॅफरही दिली. मात्र, दत्ता देशमुख यांनी स्पष्ट नकार दिला. आजच्या घडीला दत्तांसारख्या व्यक्तिचा त्याग आणखी उठून दिसतो. 

A storm called Datta Deshmukh | दत्ता देशमुख नावाचे वादळ

दत्ता देशमुख नावाचे वादळ

googlenewsNext

अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील जवळे कडलगसारख्या दुष्काळी गरीब शेतकरी कुटुंबातील अशिक्षित आई मुलाच्या शिक्षणासाठी आग्रह धरते. प्रतिकूल परिस्थितीत मुलगा सिव्हिल इंजिनिअर होतो. मात्र, पैसा आणि प्रतिष्ठेचा राजमार्ग सोडून हा तरूण राजकीय, सामाजिक चळवळीत स्वत:ला झोकून देतो आणि मुख्यमंत्रीपदासारखे राज्यातील सर्वोच्च पद मिळण्याची संधी असतानाही एखाद्या नि:स्पृह तपस्वीप्रमाणे त्याकडे पाठ फिरवून गरीब, कष्टकरी आणि ग्रामीण शेतकरी, प्रकल्पग्रस्त समुदाय आत्मनिर्भर व्हावेत म्हणून आयुष्यभर लोकशिक्षकाची भूमिका बजावित त्यांच्यासाठी संघर्ष करतो. हा संघर्षयात्री म्हणजेच कॉ. दत्ता देशमुख.
संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे १९१८ मध्ये दत्ता देशमुख या  बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा जन्म झाला़ जवळे कडलग येथेच प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर संगमनेर येथील पेटीट विद्यालयात माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले. पुण्यातून बी.ई. सिव्हिल इंजिनिअरची पदवी मिळविली. पदवीनंतर १९४४ ते १९४५ दरम्यान बिहारमधील गया येथे त्यांनी नोकरी केली. स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेऊन कारावास भोगलेल्या या चळवळी व्यक्तिमत्त्वाने पुन्हा संगमनेर गाठले आणि लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठविला.
दुष्काळी महाराष्टÑाचे पाणी सल्लागार आणि प्रख्यात जलतज्ज्ञ, कामगार-शेतकरी-शेतमजुरांचे नेते, शेतीक्षेत्राला नवी दिशा देणारे बुद्धीजिवी शेतकरी, सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देणारे सिव्हिल इंजिनिअर, कामगार संघटना कशा चालवाव्यात याचा वस्तुपाठ घालून देणारे वीज बोर्डाच्या वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष, विधायक विरोधाची भूमिका बजावताना आपल्या अभ्यासू भाषणांनी सत्ताधीशांना घाम फोडणारे आमदार, मतदारांचे प्रबोधन करणारे लोकशिक्षक, सच्चा गांधीवाद्यांनीही आदर्श घ्यावा, असे कृतिशील मार्क्सवादी पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. ‘कॉँग्रेस’, शेतकरी-कामगार पक्ष, कामगार किसान पक्ष, लाल निशाण गट आणि लाल निशाण पक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. पण या प्रवासात त्यांनी कधीही आपल्या तात्विक विचारांशी बांधिलकी सोेडली नाही. प्रसंगी ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियेले नाही बहुमता’ या संतवचनाला साक्षी ठेवून निर्णय घेतले. हे सर्व करत असताना मूळ विचाराच्या गाभ्यात कधीच तडजोड केली नाही. 
संगमनेरातील पेटीट विद्यालयात शिक्षण घेत असताना स्वातंत्र्याचे आंदोलन चालू होते. महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर प्रभाव होता. राष्टÑीय चळवळीचे संस्कार होत होते. वारंवार पाडणा-या दुष्काळामुळे ग्रामीण जनतेची होणारी परवड ते अनुभवत होते. त्यामुळे या परिस्थितीतून मार्ग दाखविणारे शिक्षण घेण्याचा ध्यास होता. आपल्या आत्मनिवेदनात ते म्हणतात, जे उपयुक्त होईल ते आणि भारतात जे उच्चतम असेल ते शिक्षण घ्यायचे असे मनात पक्के केले होते. मग इंजिनिअर व्हायचे ठरवले. पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनाचा वणवा भडकला. त्यातल्या सहभागाने ‘कारावास’ झाला पण वर्ष वाया गेले तरी अभ्यासावर परिणाम होऊ न दिल्याने, परीक्षा उत्तमरितीने उत्तीर्ण झाले. घरचे कर्ज फेडण्यासाठी काही दिवस वालचंद ग्रुपच्या ‘हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन’मध्ये नोकरीही केली. १९४६ मध्ये तत्कालीन कॉँग्रेस अध्यक्ष केशवराव जेधेंच्या आग्रहास्तव अकोले, संगमनेर, बेलापूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव व राहुरी अशा आठ तालुक्याचा समावेश असलेल्या ‘नगर उत्तर’मधून निवडणूक लढविली. या २५-२६ वर्षाच्या तरूण इंजिनिअरचा आमदार म्हणून मुंबई विधानसभेत प्रवेश झाला. आपल्या अभ्यासू आणि घणाघाती भाषणांनी त्यांनी विधानसभा दणाणून सोडली. त्यावेळच्या बाळासाहेब खेर आणि मोरारजीभाई देसाई यांच्या पक्षपाताचे वाभाडे काढले. कॉँग्रेसचे आमदार असूनही कॉँग्रेसच्याच मोरारजीभार्इंनी त्यांना शेतक-यांच्या प्रश्नांवर मोर्चे काढले म्हणून तुरूंगात डांबले. सतत ९० दिवस विधानसभेत गैरहजर राहिले म्हणून खेर-मोरारजींनी त्यांचे विधानसभा सदस्यत्वही रद्द केले. त्यावेळी आचार्य अत्र्यांसह सर्व पत्रकारांनी सरकारवर टिकेची झोड उठविली आणि दत्ता देशमुख एक संघर्षशील व्यक्ती म्हणून महाराष्टÑाला परिचित झाले. 
‘नाही रे’ वर्गाची बाजू घेण्याचे धोरण अधिक पक्के झाल्यावर त्यांचा कल मार्क्सवादाकडे झुकत गेला. नंतर शेतकरी कामगार पक्ष, कामगार किसान पक्ष, लाल निशाण गट मार्गे लाल निशाण पक्षाच्या माध्यमातून ते शेतकरी, मजूर, प्रकल्पग्रस्तांसाठी सतत संघर्ष करीत राहिले़ लाल निशाण पक्षात एस. के. लिमये, यशवंतराव चव्हाण, संतराम पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, लक्ष्मण मेस्त्री, विठ्ठल भगत, ए. डी. भोसले, बापूसाहेब भापकर, मधुकर कात्रे, जीवनराव सावंत, भाई सथ्था, भास्करराव जाधव, व्ही. एन. पाटील, भि. र. बावके, व्ही. डी. पाटील, गं. पा. लोके, सुरेश गवळी असे कितीतरी तळमळीने काम करणारे ध्येयवादी नेते होते. ते उच्चविद्याविभूषित तर होतेच, शिवाय स्वातंत्र्य आंदोलनात कारावास झालेले होते. प्रत्येकाने व्यक्तिश: आणि सर्वांनी मिळून तळागाळातील दुर्लक्षितांच्या संघटना बांधून शोषितांना न्याय मिळवून देण्याचे मोठे काम केले. मार्क्सवादी सिद्धांताप्रमाणे मूलभूत स्वरूपाचे काम केले. तरीही या सर्वांपेक्षा किंबहुना लाल निशाण पक्षापेक्षाही दत्ता देशमुख यांचे स्थान आणि काम अधिक वेगळे होते. त्यांचे सहकारी यशवंत चव्हाणांनी त्यांची योग्यता शब्दबद्ध करताना म्हटले, ‘लाल निशाण पक्षाच्या वैचारिक, राजकीय, संघटनात्मक आणि सामर्थ्यांमध्ये दत्तांचा मोठा भाग होता. विशेषत: दत्तांची सामाजिक व्याप्ती लाल निशाण पक्षाच्या व्याप्तीपेक्षा किती तरी मोठी होती.’ 
दत्ता देशमुख यांचे संयुक्त महाराष्टÑाच्या आंदोलनातील योगदान अप्रकाशित राहिले. कॉ. श्रीपाद डांगे, एस. एम. जोशी, कॉ. दत्ता देशमुख ही संयुक्त महाराष्टÑाच्या समितीची ‘श्ॉडो कॅबिनेट’च होती. खरे तर या तिघांनी मिळून महाराष्टÑाच्या सामाजिक व राजकीय जीवनात वेगळा आदर्श निर्माण केला. आजच्या पिढीने हे अभ्यासण्याची गरज आहे. १९६२ मध्ये दिल्लीला जाताना यशवंतराव चव्हाणांनी येरवडा जेलमध्ये जाऊन स्थानबद्ध असलेल्या दत्ता देशमुख यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना ‘महाराष्टÑाचे नेतृत्व’ करण्याची आॅफरही दिली. मात्र, दत्ता देशमुख यांनी स्पष्ट नकार दिला. आजच्या घडीला दत्तांसारख्या व्यक्तिचा त्याग आणखी उठून दिसतो. 
सत्तेलाही बधत नाही म्हटल्यावर यशवंतरावांनी आपल्या बेरजेच्या राजकारणाच्या खेळीत दत्ता देशमुखांना पराभूत केले. पुढे त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून माघार घेत सामाजिक कामांसाठी स्वत:ला वाहून घेतले. 
त्यांच्या पक्षाच्या धोरणाप्रमाणे जिल्हा लोकल बोर्ड, कोतवाल, वनकामगार, बांधकाम कामगार, रस्ते बांधकाम कामगार, म्युन्सिसिपल कामगार, विडी कामगार, सोसायट्यांचे सेक्रेटरी, मैला कामगार, शेतमजूर, धरणग्रस्त-प्रकल्पग्रस्त शेतकरी, ऊस तोडणी कामगार इत्यादी तळाच्या कष्टकरी व विस्थापितांच्या संघटना बांधून त्यांचे प्रश्न ऐरणीवर आणले. त्यासाठी पक्षांच्या कार्यकर्त्यांबरोबर उन्हा-पावसातून मिळेल त्या साधनाने असेल त्या परिस्थितीत प्रवास केला. सारा आडवळणाचा महाराष्टÑ पालथा घातला. 
विकासाच्या प्रक्रियेपासून कोसो दूर असणाºयांना न्याय मिळून देण्यासाठी विधायक संघर्षाची भूमिका घेतली. मुंबईचा गिरणी कामगार आणि ग्रामीण महाराष्ट्राचा कष्टकरी यांच्यात भ्रातृभाव निर्माण केला. शेतीसाठी पाणी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. लहरी अनियमित आणि अनिश्चित पर्जन्यमान असलेल्या आपल्या देशात पाण्याचे वितरणही विषम झालेले आहे. त्यामुळे सर्वांना न्याय पाणी वाटप व्हावे, यादृष्टीने भूपृष्ठावरील पाणी साठ्याबरोबरच भूगर्भातील पाणी साठ्याचाही त्यांनी गांभीर्याने विचार केला. भूगर्भातील पाणी साठ्याचा ‘पेवा’सारखा उपयोग केला जावा, असाही त्यांचा आग्रह होता. 
आज कूपनलिकांमधून अमर्याद उपसा करून भूगर्भातील साठे संपले आहेत. अशा पार्श्वभूमीवर दत्ता देशमुखांसारख्या पाणी तज्ज्ञांची प्रकर्षाने उणीव भासते आहे. त्यांनी पाण्यासाठी तहानलेल्या विभागांचा प्राधान्यक्रमाने विचार केला. पहिल्या सिंचन आयोगावर त्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव पडला होता. सार्वजनिक खर्चातून उभ्या राहणा-या कोणत्याही पाटबंधारे योजनांचे पाणी पहिल्यांदा वंचित घटकांना मिळाले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या प्रत्येक चळवळीला विशुद्ध शास्त्रीय बैठक असायची. त्यात सामाजिक बांधिलकीचा पाया भक्कम होता. धरणांच्या जागेचा प्रश्न असो की पाणीवाटप असो, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न असो की विस्थापितांच्या जीवनमरणाचा असो सर्वांना दत्ता देशमुख जवळचे वाटायचे. महादेवीचा प्रश्न, पैठणच्या धरणाचा प्रश्न या प्रश्नांनी जेव्हा उग्र रूप धारण केले, तेव्हा त्यांची भूमिका महत्वाची ठरली. विस्थापितांच्या पुनर्वसनाचा कायदा करून ‘आधी पुनर्वसन मग धरण’ ही भूमिका घेण्यात डॉ. बाबा आढाव आणि दत्तांचा मोठा सहभाग राहिला आहे. वास्तवाचे भान आणि अभ्यासपूर्ण बैठक यामुळेच त्यांची कोणतीच भूमिका एकांगी वाटली नाही. महाराष्ट्राच्या शेती विकासासाठी पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व असताना पर्यावरणाच्या नावाखाली मोठ्या धरणांना होणारा विरोध त्यांना मान्य नव्हता. ते म्हणत ‘देशाला अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी अवर्षणग्रस्त भागांना ओलिताखाली आणले पाहिजे. त्यासाठी जेथे जास्त पाऊस पडतो तेथे अडवण्याची व पाटाने पाणी नेऊन कोरड्या जमिनींची तहान भागविण्याची गरज आहे. त्यासाठी मध्यम व मोठ्या धरण योजना गरजेच्या आहेत. विस्थापितांचे आदर्श पुनर्वसन झाले पाहिजे. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडी झाल्या पाहिजेत. हे खरे तर होऊ शकते, पण धरणेच नको, असे म्हणणे आत्मघातकीपणाचे आहे. १९६२ मध्ये पराभूत झाल्यावर त्यांनी आपल्या शेतीतही लक्ष घातले. परिसरातल्या सर्व शेतकºयांना बरोबर घेऊन द्राक्ष, डाळिंब, कारली इत्यादी नगदी उत्पन्न देणारी फळपिके घेऊन कोरडवाहू शेतीचा दृष्टिकोन बदलून टाकला. शेतक-यांना नवी दृष्टी देऊन त्यांनी प्रयोगशील बनवले तर त्यांच्या दृष्टिकोनामुळे महाराष्ट्राच्या शेतीला नवी दृष्टी देणारा इंजिनिअर असा त्यांचा सार्थ गौरव ग. प्र. प्रधान सरांनी केला होता.  दत्ता देशमुख यांच्या गावाच्या उशाशी असलेल्या आढळा मध्यम प्रकल्पाला त्यांनी आठमाही करून सर्व धरणे आठ माहिच असावीत, अशी भूमिका घेतली आणि सरकारने तसा कायदा केला. दांडेकर, देऊस्कर आणि दत्ता देशमुख अशी जी ‘थ्रीडी कमिटी’ होती, त्या कमिटीने पाण्यासंदर्भात शासनाला अनेक शिफारशी केल्या. ते लिहितात, पाण्याच्या मर्यादित उपलब्ध संबंधी जनमानसात कमालीचे अज्ञान आहे. ३० ते ३५ टक्के जमिनी बागायती करून ७० टक्के लोकांना जिरायती शेतीवर जगण्यास भाग पाडून महाराष्ट्रातील शेती अर्थव्यवस्थेचे प्रश्न सोडवता येतील, असे मानणे म्हणजे स्वत:ची फसवणूक करण्यासारखे आहे. महाराष्ट्रातील शेतजमिनी प्रत्येक एकराला एकातरी पिकासाठी हमखास पाणी मिळाले पाहिजे. ते तसे मिळण्याची शक्यता औद्योगिक नागरी आणि ग्रामीण जीवनाच्या आरोग्यविषयक गरजा भागवून शक्य आहे, असा आत्मविश्वास त्यांना होता़ लोकसंख्येची वाढ लक्षात घेऊन अन्नधान्य व अन्य शेतीमालाचे उत्पादन किती वाढायचे, हे निश्चित करावे. मग भावनाविवश न होता अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने वस्तुनिष्ठ रीतीने व गतिमान दृष्टीने या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विचार व्हावा आणि योग्य 
उपाय योजनाच्या आड येणाºया हितसंबंधांना बाजूला सारून परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक राजकीय, सामाजिक, आर्थिक सामर्थ्य उभे करावे, असे त्यांना वाटे. इथेही व्यापक जनहित हे त्यांच्या विचारांचे मुख्य सूत्र होते. कालकथित दादासाहेब रूपवते हे दत्ता देशमुखांना मानवी चेहºयाचा कम्युनिस्ट असे आदराने म्हणत. त्यांच्यामधील साम्यवादास माणुसकीची संवेदनशील किनार होती. त्यांची निष्ठा आणि त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कुणीही शंका घेऊच शकत नव्हते. स्वत:चे भले होण्याच्या अनेक संधी नाकारून या भल्या माणसाने नेहमीच देशातील कष्टकरी गरीब जनतेच्या  भल्याचाच विचार केला. 
त्यांना स्वाभिमानाने आणि स्वावलंबनाने जगता येईल, याचा ध्यास घेतला. ६५ ते ७० टक्के लोकांचे निर्वाहाचे साधन असलेल्या शेती सुधारणेचा विचार करत पाणी प्रश्नांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांची १९४६ ते १९६२ या काळातील विधानसभेतील भाषणे आणि विधानसभेबाहेरील काम हे  त्याचेच निर्देशक आहेत. 


जन्म : १९१८
गाव : जवळे कडलग (ता. संगमनेर)
शिक्षण : बी.ई. सिव्हिल
मृत्यू : १ नोव्हेंबर १९९४

भूषविलेली पदे 
- १९४२ : स्वातंत्र्य चळवळीत सहभाग व कारावास
- १९४६ ते १९६२ : आमदार
- १९६२ : बर्वे सिंचन आयोगाचे सदस्य
- संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग
- सेक्रेटरी : लाल निशाण पक्ष

लेखक - प्रा. विठ्ठल म. शेवाळे (इतिहास अभ्यासक, संगमनेर)

Web Title: A storm called Datta Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.