राज्यातील सर्व शाळा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:14 AM2021-06-23T04:14:35+5:302021-06-23T04:14:35+5:30

अहमदनगर : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र पद्मश्री ...

Start all schools in the state | राज्यातील सर्व शाळा सुरू करा

राज्यातील सर्व शाळा सुरू करा

Next

अहमदनगर : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र पद्मश्री पोपटराव पवार यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू यांना पाठविले आहे.

हिवरे बाजार (जि. अहमदनगर) या आदर्श गावात लोकांचा सहभाग व सामाजिक शिस्त असल्यामुळे हे गाव कोरोनामुक्त झालेले असून त्याच अनुभवातून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गावातील शाळा सुरू केली आहे. विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक व ग्रामपंचायत यांनी स्वत:च्या जबाबदारीवर १५ जून २०२१ पासून ५ वी ते ७ वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व इ. ८ ते १० वी यशवंत माध्यमिक विद्यालय सुरू केलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी अतिशय आनंदी आहेत. गेले ८ दिवस कुठल्याही प्रकारची अडचण जाणवली नाही.

हिवरे बाजार हे गाव १५ मे २०२१ रोजी कोरोनामुक्त झाले. त्यात कोरोना सुरक्षा मुख्य समितीत फ्रंटलाईन वर्कर म्हणून प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शिक्षक काम करीत होते. त्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्याशी शिक्षकांचा संवाद चालूच होता. गावातील सर्व्हेतून मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वांनी जबाबदारी स्वीकारून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जी गावे, वाड्या, वस्त्या व पाडे यामध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही तसेच जी गावे उत्तम नियोजनातून कोरोनामुक्त झालेली आहेत, अशा ठिकाणी कोरोनाविषयक जबाबदारी पालक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांनी घेतल्यास शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी विनंती पवार यांनी या पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

...........

मुले विसरली लिखाण, वाचन

१६ ते ३० मे या कालावधीत प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याबाबत विद्यार्थी व पालक सर्व्हे करून प्रत्यक्षात चर्चा केली. त्यांची मते जाणून घेतली. त्यातून असे लक्षात आले की, विद्यार्थी लिखाण, वाचन विसरून गेलेले आहेत. ग्रामीण भागात ऑनलाईन अभ्यासक्रमात इंटरनेट व त्या अनुषंगिक इतर सोयी-सुविधा नसल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे समोर आले आहे, असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

.......................

Web Title: Start all schools in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.