संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात संगमनेर तालुक्यातील तिगाव जिल्ह्यात प्रथम!

By चंद्रकांत शेळके | Published: January 2, 2024 06:42 PM2024-01-02T18:42:00+5:302024-01-02T18:42:29+5:30

जिल्हास्तरीय स्वच्छता स्पर्धेचा निकाल जाहीर

Sant Gadgebaba first in Tigaon district of Ahmednagar district in cleanliness campaign! | संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात संगमनेर तालुक्यातील तिगाव जिल्ह्यात प्रथम!

संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात संगमनेर तालुक्यातील तिगाव जिल्ह्यात प्रथम!

चंद्रकांत शेळके, अहमदनगर : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२२-२०२३ जिल्हास्तरीय स्वच्छता स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यात संगमनेर तालुक्यातील तिगाव गावाने प्रथम क्रमांक पटकावला. श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद दुसऱ्या, तर राहुरी तालुक्यातील गणेगाव तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा जिल्ह्यात राबविण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्हा परिषद गटस्तरावर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या. यात गटस्तरावर सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या ९ ग्रामपंचायतींची तपासणी जिल्हास्तरीय तपासणी समितीने केली. यामध्ये ग्रामपंचायत तिगाव (ता. संगमनेर) प्रथम, जाफराबाद, (ता. श्रीरामपूर) द्वितीय, तर ग्रामपंचायत गणेगाव (ता. राहुरी) या गावाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांकांचे पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीची तपासणी विभागस्तरीय तपासणी समितीकडून होणार आहे.

अशी आहेत बक्षिसे 

स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतीला ६ लाख, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतीस ४ लाख आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतीस ३ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

या गावांना विशेष पुरस्कार

विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीमध्ये आंबी खालसा (ता. संगमनेर) यांना स्व. वसंतराव नाईक पुरस्कार (घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी), निमगाव कोऱ्हाळे (ता. राहाता) गावाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापनासाठी) व ग्रामपंचायत डोंगरगावला (ता. अकोले) आबासाहेब खेडकर पुरस्कार (शौचालय व्यवस्थापनासाठी) जाहीर झाला आहे.

Web Title: Sant Gadgebaba first in Tigaon district of Ahmednagar district in cleanliness campaign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.