गोवर-रुबेला लसीकरणात ग्रामीण भाग आघाडीवर

By साहेबराव नरसाळे | Published: January 16, 2019 10:41 AM2019-01-16T10:41:44+5:302019-01-16T10:45:04+5:30

राज्याच्या ग्रामीण भागात गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेला मोठे यश मिळाले असून, त्या तुलनेत महानगरपालिका हद्दींमध्ये थंडा प्रतिसाद मिळत आहे़

Rural areas dominate the Gore-Rubella vaccine | गोवर-रुबेला लसीकरणात ग्रामीण भाग आघाडीवर

गोवर-रुबेला लसीकरणात ग्रामीण भाग आघाडीवर

Next

साहेबराव नरसाळे
अहमदनगर : राज्याच्या ग्रामीण भागात गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेला मोठे यश मिळाले असून, त्या तुलनेत महानगरपालिका हद्दींमध्ये थंडा प्रतिसाद मिळत आहे़ नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक १०५ टक्के लसीकरण झाले आहे़ तर भिवंडी महापालिका हद्दीत अवघे ४१ टक्के लसीकरण झाले आहे़
२०१६ मध्ये देशभरात गोवर आजाराने ५० हजार बालकांचा मृत्यू झाला होता़ त्यामुळे सरकारने गोवर-रुबेला लसीकरण मोहीम हाती घेतली़ राज्यात २७ नोव्हेंबर २०१८ पासून गोवर-रुबेला लसीकरणास प्रारंभ झाला़ प्रत्येक आठवड्याला या मोहिमेचा सरकारकडून आढावा घेतला जात आहे़ १४ जानेवारी २०१९ पर्यंत राज्याच्या ग्रामीण भागात ८८ टक्के तर शहरी भागात ६५ लसीकरण झाले आहे़
नाशिक, लातूर, पुणे, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये अपेक्षित बालकांपेक्षा जास्त बालकांना लसीकरण झाले आहे़ त्यामुळे या जिल्ह्यांमधील टक्केवारी १०० पेक्षा अधिक झाली आहे़
बुलढाणा जिल्ह्यात सर्वात कमी ७४ टक्के लसीकरण झाले असून, त्यानंतर रायगड व जालना जिल्ह्यात ७५ टक्के लसीकरण झाले आहे़ ७५ टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झालेले हे तीन जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे़ तर महापालिका हद्दीत केवळ धुळे महापालिकेने १०० टक्के लसीकरण करुन आघाडी घेतली आहे़ तर १५ महापालिकांच्या हद्दीत ७५ टक्केपेक्षा कमी लसीकरण झाले आहे़ अहमदनगर महापालिका हद्दीत ७२ टक्के लसीकरण झाले असून, ७५ टक्यांपेक्षा कमी लसीकरण असलेल्या महापालिका व जिल्हा आरोग्य यंत्रणांना लसीकरणाची गती वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़

दुर्गम वाड्या-वस्त्या, उसाच्या फडात पोहोचले अधिकारी
जिल्ह्यात डॉ़ संदीप सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवकांनी दुर्गम वाड्या-वस्त्यांवर जाऊन लोकांना लसीकरणाची माहिती दिली़ तसेच सर्व मुलांना लसीकरण घडवून आणले़ परजिल्ह्यातील अनेक ऊसतोड मजूर नगर जिल्ह्यातील उसाच्या फडांमध्ये मुलाबाळांसह आलेले आहेत़ या मुलांचे लसीकरण घडवून आणण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक थेट उसाच्या फडात पोहोचले़ शेतातील राहुट्यांमध्ये जाऊन बालकांना लस दिली़ त्यामुळे ग्रामीण भागातील लसीकरणाची आकडेवारी ९३ टक्यांवर पोहोचली आहे़ एकही मुलगा लसीपासून वंचित राहू नये, असे नियोजन करण्यात आल्याचे डॉ़ सांगळे यांनी सांगितले़

राज्याच्या तुलनेत नगर जिल्ह्याने समाधानकारक काम केले आहे़ नगर जिल्ह्यात ९३़५१ टक्के लसीकरण झाले असून, शहरी भागात लसीकरण मोहिमेला कमी प्रतिसाद आहे़ पण पुढे लसीकरण चांगले होईल़-डॉ़ संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी


सर्वाधिक लसीकरण झालेले जिल्हे व महापालिका

जिल्हा                                   महापालिका
नाशिक (१०५ टक्के)             धुळे (१०० टक्के)
लातूर (१०४)                         चंद्रपूर (९६)
पुणे (१०४)                            वसई-विरार (९३)
उस्मानाबाद (१०१)                कोल्हापूर (९२)
भंडारा (९८)                          लातूर (९१)
सांगली (९७)                        सांगली (८८)
धुळे (९५)                             नवी मुंबई (८०)
अहमदनगर (९३)                 कल्याण (८०)
वर्धा (९३)                             पिंपरी चिंचवड (७९)
हिंगोली (९१)                       उल्हासनगर (७७)

 

Web Title: Rural areas dominate the Gore-Rubella vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.