सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीची जबाबदारी प्रांताधिकाऱ्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:20 AM2021-01-23T04:20:13+5:302021-01-23T04:20:13+5:30

अहमदनगर : जिल्ह्यातील राखीव सरपंचपदाची आरक्षण सोडत २७ व २८ जानेवारीला काढण्यात येणार आहे. या दोन दिवसांपैकी ...

The responsibility of drawing the reservation of Sarpanchpada rests with the Prantadhikari | सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीची जबाबदारी प्रांताधिकाऱ्यांवर

सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीची जबाबदारी प्रांताधिकाऱ्यांवर

Next

अहमदनगर : जिल्ह्यातील राखीव सरपंचपदाची आरक्षण सोडत २७ व २८ जानेवारीला काढण्यात येणार आहे. या दोन दिवसांपैकी कोणत्या तालुक्यात कधी आरक्षण सोडत काढायचे, याची जबाबदारी प्रांताधिकऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी दिला आहे. सोडत कार्यक्रमाचे सर्व अधिकार प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. २७ व २८ या दोन दिवसांपैकी कोणत्या तालुक्यात कधी आरक्षण सोडत असेल, याचा कार्यक्रम प्रांताधिकारी जाहीर करणार आहेत. त्यानुसार तहसील कार्यालयात ही सोडत होईल. पाच वर्षांसाठी हे आरक्षण राहणार आहे. पूर्णतः अनुसूचित क्षेत्राशी संबंधित आरक्षण २९ जानेवारीला अकोले तहसील कार्यालयात होणार आहे.

जिल्ह्यात ७६७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. पैकी ७०५ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान झाले. ५७८८ जागांसाठी १३ हजार १९४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. सोमवारी निकाल जाहीर झाला. मात्र, सरपंच कोण होणार याची उत्सुकता लागली आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये पूर्ण पॅनल तर काही गावांत अर्धवट पॅनल निवडून आले आहे. त्यामुळे त्या गावांत आरक्षणानंतरच कोणत्या गटाचा सरपंच होणार आहे, ते समजणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील एकूण १२१८ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले होते. हाच तक्ता ७६७ ग्रामपंचायतींसाठी लागू राहणार आहे. आरक्षण कसे असेल हे प्रत्यक्ष सोडतीच्या वेळीच समजणार आहे, त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य सध्या संभ्रमात आहेत.

‐----------------

सरपंचपदाची संख्या व आरक्षण

अनुसूचित जाती

एकूण -१५१

महिला-७६

अनुसूचित जमाती

एकूण-८३

महिला-४२

नागरिकांचा मागासप्रवर्ग

एकूण-३२९

महिला-१६५

खुला

एकूण-६५५

महिला-३२८

--------

जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाचे आरक्षण संबंधित प्रांताधिकारी निश्चित करणार आहेत. निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास उपस्थित रहावे.

-ऊर्मिला पाटील, उपजिल्हाधिकारी, महसूल

Web Title: The responsibility of drawing the reservation of Sarpanchpada rests with the Prantadhikari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.