...यासाठी हवीय दूध उत्पादक शेतक-यांना दरवाढ?

By अनिल लगड | Published: August 2, 2020 02:06 PM2020-08-02T14:06:08+5:302020-08-02T14:07:37+5:30

कोरोनामुळे शेतकरीही मोठ्या अडचणीत आला आहे. कांद्याला भाव नाही. दुधाचे दर कोसळले आहेत. यामुळे शेतक-यांचे आर्थिक चक्रच बदलून गेले आहे. सध्या दूध दरवाढीसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. अजून तरी सरकारला जाग आलेली दिसत नाही. परंतु शेतक-यांचा दूध उत्पादनाचा आणि खर्चाचा कुठेच ताळमेळ बसत नाही. फक्त यासाठीच शेतक-यांना दुधाला दरवाढ हवी आहे.

... price hike for milk producing farmers? | ...यासाठी हवीय दूध उत्पादक शेतक-यांना दरवाढ?

...यासाठी हवीय दूध उत्पादक शेतक-यांना दरवाढ?

Next

कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकरीही मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. याचा मोठा फटका दूध उत्पादक शेतक-यांना बसला आहे. कोरोनामुळे राज्यात ५२ लाख लीटर दूध अतिरिक्त ठरत आहे. आंतरराष्टÑीय बाजारात दूध पावडरला मागणी नसल्याने राज्यात दूध पावडरचे साठे गोदामात पडून आहे. या पार्श्वभूमीवर दुधाचे दर कोसळले आहेत.

   दुधाला भाव नसल्याने शेतक-यांचे अर्थचक्र पूर्ण कोलमडून गेले आहे. सध्याचा दुधाचा भाव शेतक-यांना परवडणारा नाही. यामुळे शेतकरी संघटना, भाजप, माकप, भापकसह विविध संघटना दूध दरवाढीसाठी पुढे सरसावल्या आहेत. यामुळे दूध संघांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. 

दुधाला ३० रुपये प्रतीलिटर भाव द्यावा. राज्य सरकारने दुधाला प्रतिलिटरमागे १० लिटर अनुदान द्यावे. अनुदान शेतक-यांच्या खात्यात वर्ग करावे. केंद्राने दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीचे धोरण तातडीने मागे घ्यावे. दूध पावडरसाठी ५० रुपये प्रतिकिलो अनुदान द्यावे, या मागणीसाठी भाजप, रयत क्रांती शेतकरी संघटना, रासप, रिपाइं, किसान सभा, मनसेतर्फे राज्यातील हजारो गावात शनिवारी (१ आॅगस्ट) पुन्हा आंदोलने झाली. परंतु शेतक-यांच्या दूध उत्पन्न खर्चाचा आणि सध्याच्या दुधाचा लिटरच्या भावाचा विचार केला तर खूप मोठी तफावत आहे. जर सरकारने वेळीच लक्ष दिले नाही तर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही. अन् शेतकरी कर्जबाजारी झाला की तो आत्महत्येचा मार्ग पत्करतो, हे ठरलेलेच आहे. तरी राज्य सरकारने तातडीने शेतक-याला दुधाला ३० ते ४० रुपये लिटर भाव देऊन त्याला दिलासा देण्याची गरज आहे. 

एका गायीपासून मिळणारे उत्पन्न असे...
१५ ते २० लिटर दूध देणारी गाय खरेदी -४० ते ६० हजार रुपयांना खरेदी करावी लागते. गाय सरासरी १२० दिवस पूर्ण क्षमतेने १५ ते २० लिटर दूध देते. त्यानंतर पुन्हा १२० दिवस कमी जास्त प्रमाणात दूध देते. १६५ दिवस ती भाकड राहते. परंतु ती शेतक-याला वर्षभर सांभाळावी लागते. तिचा नेहमीचा खर्च मात्र करावाच लागतो. ही गाय सरासरी रोज १८ लिटर दूध देते असे धरले तर २४० दिवसांचे ४३२० लिटर दूध होते. त्याचा भाव सरासरी १८ रुपये धरला तर एकूण उत्पन्न ७७ हजार ७६० रुपये होतात. त्यात गायीच्या शेणाचा शेतकरी खत म्हणून वापर करतो. त्याचे उत् पन्न ५००० रुपये धरले तर एका गायीचे ८२ हजार ७६० असे एकूण उत्पन्न मिळते. 

एका गायीसाठी होणारा खर्च असा....
शेतक-याला एका गायीपासून सरासरी ८२ हजार ७६० असे उत्पन्न मिळते असे आपण समजू. 
आता शेतक-यांच्या खर्चाचा विचार केला तर एका गायीस सरकी महिन्यास दोन पोते लागते. त्याचा भाव १३०० आहे. दोन पोत्याचे २६०० रुपये होतात. यात मका भरडा टाकावा लागतो. त्याचा खर्चही २८०० रुपये होतो. घास, गिणी गवत, कोरडा भुसा किंवा घासाच्या पेंढ्या रोज १०. घासाची पेंढी ७ रुपयाला मिळत नाही. तरी पेंढी सात रूपये धरली तर ७० रुपये होतात. यात कोरडा चारा, गवत सोडून दिले (शेतकरी बारीक विचार करीत नाही) तरी निव्वळ घासाचे ७० गुणीले महिन्याचे ३० दिवस केले तर २१०० रुपये होतात. असा दरमहा ७५०० रुपये खर्च होतो. दिवसाला २५० रुपये रोज खर्च शेतक-याला एका गायीमागे करावा लागतो. 

दहा हजारांचा तोटा
वर्षाचा ३६५ दिवसाचा खर्चाचा विचार केला एकूण खर्च ९१ हजार २५० रुपये होतो. म्हणजे वर्षाला कमीत कमी खर्च धरला तर शेतक-याचा वर्षाला ८ ते १० हजार रुपयांचा तोटा होतो. याशिवाय पशुवैद्यकीय डॉक्टरचा खर्च, घरातील गायीची सोडबांध करणे, धारा काढणे, वासरु पाजणे, धुणे आदी विविध कामे दिवसभर करावीे लागतात. त्याचा खर्च तर वेगळाच आहे. 
 

Web Title: ... price hike for milk producing farmers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.