गेटवर हजेरी घेणारे अध्यक्ष अण्णा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 11:08 AM2019-08-16T11:08:32+5:302019-08-16T11:10:24+5:30

राहुरी कारखान्याचे अध्यक्ष झाल्यानंतर कडाक्याच्या थंडीत अण्णा पहाटे देवळाली प्रवरा येथून मोटारसायकलवरून कारखान्यावर जात. थेट गेटवर जाऊन उशिरा येणाऱ्यांची हजेरी घेत. अण्णांच्या या कडक शिस्तीचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनीही कौतुक केले होते.

President Anna Patil who attended the gate | गेटवर हजेरी घेणारे अध्यक्ष अण्णा पाटील

गेटवर हजेरी घेणारे अध्यक्ष अण्णा पाटील

Next

अहमदनगर : लक्ष्मण बळवंत तथा अण्णा पाटील कदम यांचा जन्म गुहा (ता. राहुरी) येथे गुरुवारी वैशाख शुद्ध दशमीला झाला. २६ एप्रिल १९२३ मध्ये जन्मलेल्या अण्णांचे मामा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विनायकराव ताकटे यांच्याकडून त्यांना समाजसेवेचे धडे मिळाले. भारत मातेला पारतंत्र्याच्या जोखडातून सोडविण्यासाठी तरूणांचे संघटन करणा-या क्रांतिवीर विनायकराव ताकटे यांच्या घरी अण्णांचे बालपण गेले.
गुहा हे अण्णांचे मामाचे गाव तर देवळाली प्रवरा हे मूळ गाव. देवळाली प्रवरा येथील अण्णांचे घराणे पोलीस पाटीलकीचे. शिस्तीचे धडे त्यांना लहानपणापासूनच मिळाले. त्यामुळेच त्यांनी आयुष्यभर व्यसनमुक्तीचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन समाजसेवा केली. अण्णांचे प्राथमिक शिक्षण देवळाली प्रवरा येथे वडील बळवंतराव कदम, आई सरस्वतीबाई यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. शिक्षण घेत असताना देशी खेळांकडे अण्णा आकर्षिले गेले. सुरपारंब्या, आट्यापाट्या, कुस्ती यामध्ये प्राविण्य मिळविले. त्यामुळे अण्णांमध्ये खिलाडूवृत्ती वाढीस लागली. पुढे समाजसेवा करताना आलेल्या चढउतारांनाही अण्णा याच खिलाडू वृत्तीने सामोरे गेले.

प्राथमिक शिक्षण देवळाली प्रवरा येथे झाल्यानंतर अण्णांनी माध्यमिक शिक्षणाचा श्रीगणेशा नगर येथे सुरू केला. त्यावेळी अनेक मित्र जोडले गेले. त्यातून बरेच शिकायला मिळू लागले. अभ्यास करताना समाजसेवेची ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अण्णांनी पुणे येथे प्रवेश घेतला. शिक्षण सुरू असतानाच अण्णांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिस्त खूपच भावली. ओघाने संघामध्ये सहभागी झाले. १९४२ मध्ये मॅट्रीक झाल्यानंतर अण्णा संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून कार्यात सहभागी झाले. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी कार्याचा झंझावात अनेकांनी जवळून पाहिला. माणसं जोडण्याची कला आयुष्यभर उपयोगी पडली.
इंटर सायन्समध्ये शिक्षण घेत असताना अण्णांना अचानक वडिलोपार्जित शेती व्यवसायाकडे यावे लागले. शिक्षणाला पूर्णविराम देत देवळाली प्रवरा येथे अण्णांचे १९४५ मध्ये आगमन झाले. अल्पावधीतच शेती क्षेत्रात त्यांनी चुणूक दाखविली. अण्णांच्या शेतीमध्ये कोणती फळे नाहीत ?, असा प्रश्न अनेकांना पडायचा.  नारळापासून ते आंबा, जांभूळ, बोर, चिक्कू, सीताफळ ते वेलदोडे, बदाम, जायफळ अशी वनस्पती संपदा होती. अण्णांची हुरडा पार्टी तर सर्वश्रुत होती. घरी आलेल्यांना अण्णांकडून स्वागतालाच हमखास रानमेव्याचा आस्वाद घेण्याची संधी मिळत असे. सहचरणी शांताबाई यांनी आदरातिथ्यासाठी मोलाची साथ दिली. वेळप्रसंगी अण्णांनी राज्यभरातील मित्रांना रानमेवा घरपोहोच केल्याची अनेक उदाहरणे आहेत. अण्णांना अनेक संस्थांची पदे चालून आली. संचालक मंडळाच्या बैठकीसाठी जाताना अण्णा रानमेवा घेऊन जात. त्यामुळे विरोधी असो की सत्ताधारी असो अण्णांचा रानमेवा सर्वांना जोडण्याचे काम करीत असे.
अण्णांना घरी भेटण्यास जाणे म्हणजे पाहुण्यांसाठी पर्वणी असे. पाहुण्यांची सुरूवात फळ देऊन होत असे. त्यानंतर न विचारता भोजनाचे ताटही पुढे वाढून येत असे. हंगामानुसार अण्णा पाहुण्यांना फळे पाठवत. वानुळा दिल्याने वाढतो असे अण्णा हसत म्हणायचे. शेती व प्रपंच सांभाळत असताना अण्णांना अनेक नोक-याही खुणावत होत्या. परंतु अण्णांना शेतीबरोबरच समाजसेवाही करायची होती. अण्णांना लष्करात सेवा करण्याची संधी चालून आली होती. परंतु देशभक्तीचे वारे अंगात घुसलेले असताना अण्णांनी ब्रिटिशांची नोकरी करण्यास लाल कंदील दाखविला.
शेतीत रमणा-या अण्णांना सहकाराचे वारे शांत बसून देत नव्हते. अर्थात शांत बसणे हे त्यांच्या रक्तातही नव्हते. वयाच्या २४ व्या वर्षी देवळाली प्रवरा के्रडीट सोसायटीचे सभापतीपदी विराजमान होण्याची संधी मिळाली. यासंधीचे त्यांनी अल्पावधीतच सोने केले. काळाच्या ओघात  के्रडीट सोसायटीचे रूपांतर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये केले. त्यापाठोपाठ अण्णांना फेअर प्राईज कमिटी, जेल व्हिजीटर, तालुका विकास मंडळ, प्रवरा कॅनॉल अ‍ॅडव्हाईझरी कमेटी अशा अनेक ठिकाणी काम करण्याची संधी चालून आली. जिथे काम करण्याची संधी मिळाली तिथे अण्णांनी श्रध्दा व सबुरीने काम करीत संस्थेचा कायापालट केल्याचा इतिहास आहे. 
अण्णांमध्ये एक डॉक्टर दडलेला होता. आजारी पडले की दोरीगंडा करणे, उतारे करणे, नवस करणे अशा अनेक कुप्रथा समाजामध्ये प्रचलित होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळात ग्रामीण भागात दवाखाने उपलब्ध नव्हते. साथीच्या रोगामध्ये हजारो लोकांचा अंधश्रद्धेपायी बळी जात होता. ही सर्व भयावह परिस्थिती अण्णांनी जवळून पाहिली होती. दीनदुबळ्यांना आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, असे अण्णांना प्रकर्षाने वाटू लागले. त्यासाठी अण्णांनी स्वत:च्या मळ्यातच विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड केली. मळ्यात बहरलेली औषधे अण्णांनी रोग्यांना घरोघरी जाऊन दिली. प्रत्येक औषधी वनस्पतीचा उपयोग रूग्णांना सांगितला. रूग्णांना गुणही येऊ लागला. त्यामुळे टीका करणा-यांचे तोंडही काळाच्या ओघात बंद झाले.
सामान्य मनुष्याला तत्पर सुविधा उपलब्ध व्हावी, म्हणून राहुरी साखर कारखान्याच्या माध्यमातून श्री विवेकानंद नर्सिंग होम उभारणीत अण्णांचा सहभाग होता. फिरत्या आरोग्य केंद्राद्वारे वंचित घटकाला  आरोग्य सेवा मिळवून देण्याचे काम अण्णांच्या पुढाकाराने झाले. खरं तर अण्णा वैद्यकीय शास्त्राचे विद्यार्थी नव्हते. मात्र ग्रामीण भागातील दीन दुबळ्यांचे दु:ख पाहून आयुर्वेद व होमियोपॅथीचा दांडगा अभ्यास केला.  देवळाली प्रवरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना के ली. त्यामुळे वंचित घटकाला ख-या अर्थाने औषधे व उपचार मिळू लागले. आरोग्याच्या सेवा गोरगरिबांपर्यंत पोहोचविणा-या अण्णांना म्हणूनच समाजाने ‘दुरितांचे डॉक्टर’ ही उपाधी दिली.
१९४६ मध्ये मुळा नदीला पूर आला होता. राहुरी गाव वाहून गेले होते. शेतक-यांच्या मोसंबीच्या बागाही पुरात वाहून गेल्या होत्या. अण्णांनी सर्व मित्रांना एकत्र करून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. धान्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य पुरविले. अनेक मदतीचे हात पुढे आल्याने महापुरात गांगरून गेलेल्या जनतेला दिलासा मिळाला.
१९५२, १९५५ व १९७२ या वर्षांमध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून दुष्काळ विमोचन समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीच्या माध्यमातून अण्णांनी मोलाचे योगदान दिल्याचे सर्वश्रुत आहे. १९६१ मध्ये पानशेत धरण फुटले़ पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हानी झाली. अशा परिस्थितीत अण्णा धावून गेले. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करून पूरग्रस्तांना दिलासा दिला.
अण्णांच्या जीवनातील राहुरी कारखाना सुरू होणे हे आनंदाची पर्वणी ठरली. बाबूरावदादा तनपुरे यांच्या पुढाकाराने राहुरी कारखाना सुरू करण्याचे धाडस करण्यात आले. त्यामध्ये अण्णांबरोबर अनंतराव धावडे, राघुजी रामजी पाटील, राजुळे पाटील आदींचा सहभाग होता. कारखाना उभारणीमध्ये अण्णांनी यंत्रसामग्रीचा अभ्यास केला. यानिमित्ताने जर्मन तंत्रज्ञांशी त्यांचा जवळून संबंध आला. अण्णांच्या इंग्रजीचे ज्ञान कारखान्याची उभारणी करताना उपयोगी आले.  त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने राहुरी कारखान्याची उभारणी करण्याचा मार्ग मोकळा झाला. शेअर्स गोळा करण्यापासून ते ऊस लागवड असो की कारखान्यातून साखर पोत्याचे गाळप असो, अण्णा बारकाईने लक्ष देत. थेट शेतात जाऊन शेतक-यांना मार्गदर्शन करीत. बाबूरावदादा तनपुरे व अण्णांनी साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतक-यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. ‘शेतक-यांनी शेतात नांगर धरावा, उद्योग उभारणे त्यांचे काम नाही’, अशी टीका करणा-यांना कारखाना उभारल्यानंतर चपराक बसली. शेतक-यांच्या घरावरील पाचरट जाऊन बंगले निर्माण झाले. ही क्रांती केवळ एका साखर कारखान्याच्या माध्यमातून झाली.

कारखाना उभारणीच्या काळातील घटना अविस्मरणीय ठरली. पश्चिम जर्मनीच्या जे.एस.एच. कंपनीने मशिनरीमध्ये त्याकाळात ७ लाख रूपये किंमत वाढून दिली होती. अण्णांनी ही बाब शासन व जर्मन कंपनीच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे राहुरीसह चार साखर कारखान्यांचे तब्बल २८ लाख रूपये वाचले. राहुरी कारखान्याचे अण्णा अध्यक्ष झाल्यानंतर एक किस्सा सर्वश्रुत आहे. अण्णा थंडीत पहाटे देवळाली येथून मोटारसायकलवरून कारखान्यावर जात. थेट गेटवर जाऊन उशिरा येणा-यांची हजेरी घेत. त्यामुळे कामगारांना जरब बसली. आठ दिवस फे-या मारल्यानंतर कामगारांना वेळेवर येण्याची सवय लागली.
देवळाली प्रवरा सोसायटीपासून ते अखिल भारतीय किसान संघाच्या उपाध्यक्ष पदापर्यंत अण्णांनी अनेक पदांवर आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यानिमित्त महाराष्ट्रभर जनसंपर्क वाढविला. मात्र त्यांची राहणी एकदम साधी होती. अण्णांनी हाती घेतलेले एक काम अधुरे राहिले याची खंत सर्वांनाच आहे. मी, मोरेश्वर उपाध्ये, द. मा. कासार, अनिल देशपांडे आदी अण्णांच्या वाड्यावर गेलो होतो. त्यावेळी श्रीफळ फोडून अण्णांनी संतांचे चरित्र लिहिण्याचा संकल्प केला होता. संत चरित्र लिहिण्यास अण्णांनी सुरूवात केली. मात्र त्यानंतर काही दिवसांतच अण्णांनी प्राण सोडल्याची वार्ता आली अन् संत चरित्राचे काम अर्धवटच राहिले. 
अण्णांकडे माहितीचा मोठा खजिना होता. तसाच माणसांचाही त्यांनी मोठा संग्रह केला होता. त्यामुळेच अण्णांना मंत्रिपदाचीही आॅफर आली होती. मात्र, निष्ठावंत कोणासमोरही शरण जात नसतो, त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले. त्यांचा हा स्वतंत्र बाणा आजही अभिमान वाटावा, असाच आहे.


पंतप्रधान नेहरू थक्क...
पंतप्रधान पंडित नेहरू महाराष्ट्रातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी राहुरीतील शिस्तीची देशभर चर्चा झाली. नगरवरून पंडित नेहरू मनमाडकडे मोटारीने जाणार होते. नगर मनमाड रोडने जाताना राहुरीला थांबण्याचे नियोजन दुष्काळी पाहणी दौ-यात नव्हते. अण्णांनी भारी शिस्तबद्ध नियोजन केले. नेहरूंना मुले व गुलाबाची फुले आवडतात, हे त्यांना माहीत होते. तनपुरे कारखान्यालगत असलेल्या देवळाली फाट्यावर अण्णांनी मोठा जनसमुदाय जमविला. रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्याकडेला सर्वजण उभे राहिले. मुले व मोठ्यांची शिस्त पाहून नेहरू थक्क झाले. त्यांनी चालकास मोटार थांबविण्यास सांगितली. संघाची टोपी घातलेल्या अण्णांनी नेहरूंचे स्वागत केले. अण्णांशी नेहरूंनी दुष्काळावर चर्चाही केली. अण्णांच्या शिस्तबद्ध नियोजनाचे कौतुक करीत पंडित नेहरू मोटारीने मनमाडकडे रवाना झाले.

परिचय -
गाव : देवळाली प्रवरा (ता. राहुरी)
शिक्षण : मॅट्रीक

भूषविलेली पदे 
- १९४२ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक
- अध्यक्ष : राहुरी सहकारी साखर कारखाना
- उपाध्यक्ष : अखिल भारतीय किसान संघ
- संस्थापक : देवळाली प्रवरा सोसायटी


भाऊसाहेब येवले (‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी )

Web Title: President Anna Patil who attended the gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.