कोरोना संसर्गापासून बचावासाठी प्राणायाम उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:22 AM2021-05-09T04:22:19+5:302021-05-09T04:22:19+5:30

संगमनेर : योग-प्राणायामाचे महत्त्व जगातील अनेक देशांनी मान्य केले आहे. प्राणायामचे प्रमुख १९ प्रकार आहेत. प्राणायाम ही अष्टांग योगातील ...

Pranayama is useful to prevent corona infection | कोरोना संसर्गापासून बचावासाठी प्राणायाम उपयुक्त

कोरोना संसर्गापासून बचावासाठी प्राणायाम उपयुक्त

Next

संगमनेर : योग-प्राणायामाचे महत्त्व जगातील अनेक देशांनी मान्य केले आहे. प्राणायामचे प्रमुख १९ प्रकार आहेत. प्राणायाम ही अष्टांग योगातील चौथी पायरी आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे जडणारे विकार, होणारे आजार तसेच कोरोना संसर्गापासून बचावासाठी अनेकजण आता प्राणायामकडे वळले असून, तो उपयुक्त ठरत असल्याचे योग प्रशिक्षकांनी सांगितले. निरोगी राहण्याकरिता अनेकांनी त्यांच्या जीवनशैलीत बदल केला असून, प्राणायामला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे.

यम, नियम, योगासन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत. त्यामुळे याला अष्टांग योग असेही म्हटले जाते. प्राणायाममुळे शरीर व मन शुद्ध होऊन मनाची एकाग्रता वाढते. तसेच प्राण शक्ती संतुलित होऊन रोगांचा नाश होतो. नाड़ीशोधन, भ्रस्त्रिका, उज्जाई, भ्रामरी, कपालभाती, केवली, कुंभक, दीर्घ, शीतकारी, शीतली, मूर्छा, सूर्यभेदन, चंद्रभेदन, प्रणव, अग्निसार, उद्गीथ, नासाग्र, प्लावनी व शितायू हे प्राणायामाचे प्रमुख १९ प्रकार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राणायाम अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडण्याचे काम करू शकतो.

प्राणायाममध्ये सूर्यभेदन त्यालाच आपण अनुलोम-विलोम असे म्हणतो. शीतली, शीतकारी, भस्रिका, भ्रामरी, उज्जाई, प्लावनी आणि मूर्छा इत्यादी प्राणायाम केल्यामुळे आपल्या श्वसन संस्थेची कार्यक्षमता वाढवू शकतो. श्‍वसनसंस्थेच्या संदर्भातील विविध आजारांवर उदाहरणार्थ दमा, उच्च रक्तदाब. हृदयविकार, सर्दी, डोकेदुखी अशा आजारांवर मात करू शकतो. प्राणायाममुळे रक्ताभिसरण संस्थेची कार्यक्षमता वाढून रक्ताचे शुद्धीकरण होते. पंचज्ञानेंद्रियांची कार्यक्षमतादेखील वाढते, पचनशक्ती सुधारते. शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य चांगले राहते. मानसिक ताण-तणाव दूर करण्यासाठी व एकाग्रता वाढवण्यासाठी प्राणायाम अतिशय उपयोगी पडतो आहे.

सूर्यनमस्कार व विविध आसने त्यामध्ये भुजंगासन, हलासन, धनुरासन, ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन ही आसने केल्याने आपले शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निरोगी व चांगले आरोग्य राहण्यासाठी प्राणायाम व ओंकार साधना लाभदायक ठरेल. लोकांच्या मनामध्ये कोरोनाविषयी भीती निर्माण झालेली आहे. परंतु, नियमितपणे प्राणायाम केल्यास लोकांच्या मनातील ही भीती दूर होऊ शकते. प्राणायामने शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते तसेच फुप्फुसांची कार्यक्षमतादेखील सुरळीतपणे सुरु राहते. त्यामुळे प्राणायाम हा सर्वांसाठी अत्यंत उपयोगी व लाभदायक ठरणार असल्याचे योग प्रशिक्षकांनी सांगितले.

-------------

प्राणायाम करण्यासाठी सकाळची वेग चांगली आहे. प्राणायाममुळे शरिरातील ऊर्जेची पातळी वाढते. फुप्फुसाचे रोग बरे होतात. नाकातील व घशातील अडथळे दूर होण्यास मदत होते. भस्रिका, कपालभाती, भ्रामरी, ओमकार तसेच घशातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी उज्जाई प्राणायाम हा अतिशय उपयुक्त ठरतो आहे. त्यामुळे सर्वांनी नित्यनेमाने प्राणायाम करणे गरजेचे आहे. हे शरीर स्वास्थ्यासाठी फायदेशीर आहे.

प्रा. जगन गवांदे, योग पदवीधारक, राष्ट्रीय ॲथलेटिक्स खेळाडू, संगमनेर

---------------

अनुलोम विलोम, भ्रस्त्रिका व कपालभाती या तीन प्रकारचे प्राणायाम गेल्या ५ वर्षांपासून नित्याने करतो आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्राणायाम उपयुक्त ठरत आहे, याचा अनुभव आला. कुटुंबातील इतर सदस्यांना कोरोनाची लागण झाली मात्र मी आणि आई नित्यनेमाने प्राणायाम करत असल्याने आम्ही त्यापासून दूर राहिलो. भ्रस्त्रिका प्राणायाम केल्याने श्वसनाचे विकार दूर होण्यास मदत होते. अनुलोम विलोम केल्याने शारीरिक लाभ मिळून उत्साह वाढतो. कपालभातीने शरिरातील वात, पित्त आणि कफ कमी करून संतुलन वाढवते, हे मी अनुभवत आहे.

- सागर अरुण भोसले, कोपरगाव

----------------

मला कोरोनाची लागण झाली असताना पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार घेत होतो. परिस्थिती काहीशी गंभीर बनली असताना, दोन दिवस कृत्रिम ऑक्सिजन लावावा लागला. परंतु, गेल्या ८ वर्षांपासून दररोज पहाटे साडेचार ते पाच यावेळेत न चुकता प्राणायाम करतो आहे. त्यात कपालभाती, अनुलोम-विलोम आणि भ्रस्त्रिका या तीन प्रकारांमुळे माझे प्राण वाचले.

- सखाहरी पंडित पवार, रा. धायरी, जि. पुणे

Web Title: Pranayama is useful to prevent corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.