दूषित पाण्यामुळे पाथर्डी, शेवगाव तालुके आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 03:41 PM2018-03-16T15:41:41+5:302018-03-16T15:41:41+5:30

पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील ४८ गावांना पंधरा दिवसांपासून मळीसदृश रसायन मिश्रीत पाण्याचा पुरवठा होत असल्याने शेवगाव, पाथर्डी तालुका सध्या अनेक आजारांच्या विळख्यात आहे. अनेकजण पोटाच्या आजाराने त्रस्त आहेत.

Pathardi, Shevgaon taluka sick due to contaminated water | दूषित पाण्यामुळे पाथर्डी, शेवगाव तालुके आजारी

दूषित पाण्यामुळे पाथर्डी, शेवगाव तालुके आजारी

Next

हरिहर गर्जे
पाथर्डी : पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील ४८ गावांना पंधरा दिवसांपासून मळीसदृश रसायन मिश्रीत पाण्याचा पुरवठा होत असल्याने शेवगाव, पाथर्डी तालुका सध्या अनेक आजारांच्या विळख्यात आहे. अनेकजण पोटाच्या आजाराने त्रस्त आहेत. पाणी योजनेद्वारे नाथसागर जलाशयातून या तालुक्यांना सध्या पाणी पुरवठा सुरु आहे.
दूषित पाणी पुरवठ्यामुळे या तालुक्यांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. पाण्यातील दूषित द्रव्यांमुळे लहान मुलांच्या वाढीवर, प्रौढ माणसे तसेच पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन नाथसागरातून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे हगवण, त्वचेचे विकार, काविळ, मुतखडा, कर्करोग तसेच इतर संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढले आहे. एका समाजसेवी संस्थेने विविध भागातील पाण्याचे नमुने घेतले असता या पाण्यात क्षार, लोह, जस्त, नायट्रेटचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक आढळल्याचे दिसून आले.

गोदावरी नदीच्या पाण्यात ठिकठिकाणच्या साखर कारखान्यातील रसायनांचे दूषित पाणी, मळी तसेच शहरातील सांडपाणी ओढ्याव्दारे नदीपात्रात सोडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे धरण कार्यक्षेत्रापासून रसायनांच्या कारखान्यांना बंदी घालून अशा कारखान्यांचे सांडपाणी थेट नद्यांमध्ये न सोडता त्याचे शुद्धीकरण करून शेतीसाठी वापर करावा, असा पर्याय पुढे आला आहे.
पिण्यासाठी पुरविण्यात येणाºया पाण्याच्या बदल्यात नागरिकांकडून पाथर्डी पालिका पाणीपट्टीच्या नावाखाली मोठा कर वसूल करते, परंतु या पाणीपट्टी कराच्या बदल्यात दर्जेदार सेवा देण्यास पालिकेची यंत्रणा कमी पडताना दिसून येते. उपसा पंपाच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. पालिका व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्या बेजबाबदार कारभारामुळे दोन्ही तालुक्यातील नागरिकांना गाळ, मळी, शेवाळ मिश्रित दूषित पाणी प्यावे लागत आहे. जिल्ह्यातील पाण्याची शुद्धता तपासणारी यंत्रणा मूग गिळून गप्प आहे. दूषित पाणी पुरवठा होत असल्यास त्याची जबाबदारी पालिकेची नाही असे उत्तर पाथर्डी पालिका पाणीपुरवठा विभागाकडून मिळत आहे.
पाणीपुरवठा योजना चालविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने देखभाल दुरुस्तीसाठी मे. संकेत एंटर प्रायजेस, नेवासा यांना २३ नोव्हेंबर २००७ पासून नोटीस दिली आहे. निविदेच्या १२ महिने मुदत संपल्या नंतरही पुढे आजपर्यंत पुन्हा सदर योजना देखभाल दुरुस्ती व्यवस्थापनासाठी पूर्वीच्याच संस्थेला मुदत वाढ देण्यात आली आहे.

Web Title: Pathardi, Shevgaon taluka sick due to contaminated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.