श्रीरामपूर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती चिंताजनक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 11:03 AM2020-04-07T11:03:36+5:302020-04-07T11:03:42+5:30

मंगळवारी आरोग्य विभागाने या गावांमध्ये प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांचे चार पथक तैनात केले.

The nature of the coronavoid patient in Shrirampur taluka is alarming | श्रीरामपूर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती चिंताजनक 

श्रीरामपूर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती चिंताजनक 

Next

श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिका-यांनी दिली.

श्रीरामपूर तालुक्यातील एका गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे संपूर्ण गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. शेजारच्या गावातील डॉक्टरांनी या रुग्णाची तपासणी केल्याने डॉक्टरांसह त्यांचे संपूर्ण कुटुंब तसेच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 14 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

सोमवारी पुणे येथील ससून रुग्णालयात तपासणी झाल्यावर या रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. तत्पूर्वी या रुग्णाला लोणी येथील प्रवरा रुग्णालय तसेच नगर येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. या रुग्णाला अशक्तपणा आला होता. शेजारील गावातील डॉक्टरांकडून रुग्णाने औषधोपचार घेतले होते. 

मंगळवारी आरोग्य विभागाने या गावांमध्ये प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांचे चार पथक तैनात केले. तेथे संपूर्ण ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली जात आहे. सर्दी, खोकला व ताप असणाऱ्या प्रत्येक नागरिकावर  बारीक नजर ठेवली जात आहे. एक हजार लोकसंख्येचे हे गाव असून गावातील नागरिक भीतीखाली आहेत. 

आरोग्य अधिकारी सुनील राजगुरू हे या पथकाचे नेतृत्व करत आहेत. त्यांना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे हे मार्गदर्शन करत आहेत. दरम्यान, हा रुग्ण घरातच पडून असल्याने त्याला कोरनाची बाधा कशी झाली ? असा प्रश्न प्रशासनाला सतावत आहे. रुग्णाच्या आईने आपण कधीही घराबाहेर पडलो नाही,  अशी  माहिती दिली, तर रुग्णाचे वडील हे पुण्याला ससून रुग्णालयात असून त्यांच्याशी अद्यापपर्यंत  संपर्क झालेला नाही, अशी माहिती डॉ. मोहन शिंदे यांनी लोकमत'ला दिली. रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत जमधडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे हे परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

Web Title: The nature of the coronavoid patient in Shrirampur taluka is alarming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.