लॉकडाऊनमुळे जनावरांची किंमत घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:19 AM2021-05-16T04:19:02+5:302021-05-16T04:19:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लोणी : जनावरांचे बाजार सध्या बंद आहेत. त्यामुळे या बाजारांमधून होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाली ...

Lockdown lowered the price of animals | लॉकडाऊनमुळे जनावरांची किंमत घटली

लॉकडाऊनमुळे जनावरांची किंमत घटली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी : जनावरांचे बाजार सध्या बंद आहेत. त्यामुळे या बाजारांमधून होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार कसे व कोठे करायचे असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात लोणी (ता.राहाता), घोडेगाव (ता.नेवासा), कोपरगाव, आळेफाटा(पुणे) येथील जनावरांचे आठवडे बाजार दुधाळ गायीसाठी आणि गाभण गायीच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहेत. अहमदनगर जिल्ह्यासह पुणे, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यातून तसेच गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब राज्यातून हजारो जनावरे येथे खरेदी-विक्रीसाठी येत असतात. यामध्ये लाखोंची उलाढाल होते. त्यामुळे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांनाही चांगले उत्पन्न मिळते. मात्र, कोरोनामुळे सर्वंकाही ठप्प झाले आहे. हे आठवडा बाजार तीन-चार महिन्यांपासून बंद आहेत.

या जनावरांच्या बाजारात बैल, गाई, म्हशी, शेळी, मेंढी आदींची खरेदी-विक्री होत असते. स्थानिक परिसरातील तसेच परराज्यातून आलेले व्यापारी हे व्यवहार करून घेतात त्यातून त्यांना कमिशन मिळते त्यांचाही उदरनिर्वाह या जनावरांच्या बाजार व्यवहारातून चालतो पण हे बाजार बंद झाल्याने तेही व्यापारी आता अडचणीत सापडले आहेत.

सध्या उन्हाळ्याच्या झळा मोठ्या प्रमाणात बसू लागल्या आहेत. काही भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांना आपली जनावरे विकायची आहेत पण बाजार बंद आहे. त्यामुळे ती विकायची कुठे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. कोरोना महामारी संकटामुळे गतवर्षीपासून शेतकऱ्यांना फटका बसू लागला आहे. दुधाचा विक्रीचाही प्रश्न निर्माण होत आहे. खाद्य व दुधाचा दर यामध्ये मोठी तफावत असल्याने दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे.

................

जनावरांना मिळेना किंमत

हा व्यवसाय बंद करावा, असे अनेकांना वाटत आहे पण गाई-म्हशी विकायच्या म्हटलं तर बाजार बंदमुळे त्यांना योग्य किंमत येत नाही. त्यामुळे सहन होईना अन्‌ सांगता येईना अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. सध्या गाय आणि म्हशीच्या दुधाला योग्य दर मिळत नाही, खाद्य व दर यांचा मेळ बसत नाही. त्यातच लॉकडाऊनच्या नावाखाली खाद्याचे दर वाढलेले आहेत. दुधाचे दर कमी झाल्याचे या सगळ्या परिस्थितीत व्यवसाय करणे अवघड झाले. परिणामी जनावरे सांभाळणे कठीण बनले आहे.

-किरण घोगरे, दुग्ध व्यावसायिक, शेतकरी, लोणी,ता.राहाता

.................

लोणी (ता.राहाता) येथे जनावरांचा बाजार भरतो तो राज्यभर आणि राज्याबाहेर प्रसिद्ध आहे. खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. कृषी उत्पन्न बाजार समितीलाही बाजाराच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळते पण सध्या कोरोना महामारी संकटामुळे बाजार बंद केले आहेत. त्यामुळे बाजार समितीचे उत्पन्न थांबले आहे. गतवर्षी कोरोनामुळे अनेक महिने बाजार बंद होता त्याचाही फटका बसला आहे.

-उद्धव देवकर,सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता.

............................

बैलजोडीची खरेदी-विक्री बंद आहे

काही भागात अजूनही पारंपरिक पद्धतीने बैलांच्या सहाय्याने शेतीची मशागत करून शेती केली जाते; मात्र सध्या सर्वच जनावरांच्या बाजाराला ब्रेक लागलेला आहे. त्यातच खरीप हंगाम तोंडावर आला असून शेती मशागतीची लगबग वाढली आहे. शेती करण्यासाठी बैलांची आवश्यकता आहे; परंतु सध्या शेतकऱ्यांना चांगली बैलजोडी मिळविण्यासाठी शोध घ्यावा लागत आहे.

Web Title: Lockdown lowered the price of animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.