मी वेडी नाही, माझी बाळं मला हवीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:22 AM2021-05-11T04:22:31+5:302021-05-11T04:22:31+5:30

कोतूळ येथील वरदविनायक गणेश मंदिराच्या आवारात गेल्या महिन्यापासून नंदा दुटे (सासर- शिरसगाव धुपे, संगमनेर) ही ३५ वर्षांची विवाहित मनोरुग्ण ...

I'm not crazy, I want my babies! | मी वेडी नाही, माझी बाळं मला हवीत!

मी वेडी नाही, माझी बाळं मला हवीत!

Next

कोतूळ येथील वरदविनायक गणेश मंदिराच्या आवारात गेल्या महिन्यापासून नंदा दुटे (सासर- शिरसगाव धुपे, संगमनेर) ही ३५ वर्षांची विवाहित मनोरुग्ण महिला कित्येक दिवस सडके अन्न व गटारातील पाण्यावर जगत होती. लोकमतने शनिवारी (दि.८) वृत्त प्रसिद्ध करताच नांदेड, परभणी, अमरावती, अकोला, अहमदनगर येथील सामाजिक संस्थांनी दोन दिवस सतत संपर्क करून मदतीचा हात देऊ केला. अहमदनगरजवळील देहरे येथील माऊली संस्थेत मनोरुग्णांची सेवा करणारे डाॅ. राजेंद्र धामणे, डाॅ. किरण राजेंद्र धामणे यांनी स्वतः कोतूळ येथे येऊन रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी नेले.

माझी बाळं मला द्या, मी वेडी नाही. मी घरी जाते, असे ती ओरडून सांगत होती. मदर डे ला असा आईचा मुलासाठी टाहो पाहून डाॅ. धामणे यांच्यासह उपस्थितांचे डोळे पाणावले.

नंदाला दोन मुले असून, पती शासकीय नोकरीत तर सासरे सेवानिवृत्त असल्याचे समोर आले. नंदाला २० वर्षांचा एक भाऊ असून तो गरिबीने पोटासाठी आळेफाटा, नारायणगावात मोलमजुरी करतो. त्याने लोकमतला नंदाची आपबिती सांगितली.

...................

मदतीसाठी राबवले अनेकांचे हात

कोतूळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच, संजय देशमुख, सदस्य हेमंत देशमुख, शंकर घोलप यांनी कोतूळ ग्रामीण रुग्णालयातून सर्जेराव खंडागळे, घिगे यांच्यामार्फत तिची अँटिजन टेस्ट केली. पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी कायदेशीर कागदपत्रे पूर्ण केली. सामाजिक कार्यकर्ते उमेश धुमाळ, राजेंद्र गीते, अजित देशमाने यांनी तपासणी रुग्णवाहिकेत पोहोचेपर्यंत मदत केली.

...........

तिला घराबाहेर कोणी काढले

दोन दिवसांत हे प्रकरण माध्यमांतून चांगलेच गाजल्याने राष्ट्रवादी व भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घातले. आता नंदाच्याबाबत सखोल चौकशी सुरू झाली असून, तिला कोणी व का घराबाहेर काढले, याचा छडा लवकरच लागणार आहे.

..........

नंदाची करुण कहाणी मी सांगली लोकमतला वाचली. अत्यंत वाईट वाटले. मी मोठ्या राजकीय घराण्यातील असले, तरी मी एक स्त्री आहे. म्हणून, मी आणि आमचा मित्र परिवार नंदा बरी होईस्तोवर तिला हवी ती मदत करणार आहोत. वेळप्रसंगी राजकीय ताकदीचा वापर करून तिला न्याय देणारच आहे.

-डाॅ. नंदिनी पाटील, वैद्यकीय व्याख्याता, शांतिनिकेतन पॅरामेडिकल, सांगली

Web Title: I'm not crazy, I want my babies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.