हाॅस्पिटलच बनले परीक्षा केंद्र; अपघातात दोन विद्यार्थिनी जखमी, परीक्षा मंडळासह शिक्षण विभागाची तत्परता

By चंद्रकांत शेळके | Published: February 23, 2024 09:04 PM2024-02-23T21:04:58+5:302024-02-23T21:06:37+5:30

सर्वांनीच तत्परता दाखवल्याने या दोन विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान टळले.

hospital itself becomes an examination center 2 students injured in the accident | हाॅस्पिटलच बनले परीक्षा केंद्र; अपघातात दोन विद्यार्थिनी जखमी, परीक्षा मंडळासह शिक्षण विभागाची तत्परता

हाॅस्पिटलच बनले परीक्षा केंद्र; अपघातात दोन विद्यार्थिनी जखमी, परीक्षा मंडळासह शिक्षण विभागाची तत्परता

चंद्रकांत शेळके, अहमदनगर : बारावीचा पेपर देण्यासाठी निघालेल्या दोन विद्यार्थिनींच्या दुचाकीला अपघात झाला. मात्र, जखमी अवस्थेत तशाच त्या केंद्रावर पोहोचल्या. हाता-पायाला झालेल्या जखमांमुळे त्या पेपर लिहू शकत नव्हत्या. अशा स्थितीत परीक्षा केंद्र संचालक, शिक्षण विभागाने यंत्रणा हलवली. पुणे बोर्डाकडून विशेष परवानगी मिळवली व या विद्यार्थिनींना लेखनिक देत पोलिस बंदोबस्तात चक्क हाॅस्पिटलमध्ये परीक्षा केंद्र उभारून परीक्षा देण्याची संधी दिली. सर्वांनीच तत्परता दाखवल्याने या दोन विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान टळले.

त्याचे झाले असे. शुक्रवारी (दि. २३) बारावीचा मराठीचा पेपर होता. कर्जत शहरातील दादा पाटील महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर सकाळी साडेदहा वाजता पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होती. अशात एका विद्यार्थिनीला केंद्रावर आल्यानंतर आपले हाॅलतिकीटच घरी विसरल्याचे लक्षात आले. पेपर सुरू होण्यास थोडा अवधी असल्याने एका मैत्रिणीला घेऊन ती दुचाकीवरून हाॅलतिकीट आणण्यासाठी शहरातच असलेल्या घरी गेली. तेथून परतत असतानाच त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला व त्यात दोघीही हाता-पायाला लागल्याने जखमी झाल्या. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना उठवून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, पेपर हुकला तर शैक्षणिक वर्ष वाया जाईल, या भीतीने त्यांनी डाॅक्टरांकडून उपचार घेण्यास नकार देत थेट परीक्षा केंद्र गाठले. मात्र, केंद्रावर आल्यावर त्यांना अधिक त्रास होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे त्यांना नजीकच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले.

दरम्यान, केंद्र संचालकांनी हा प्रकार कर्जत गटशिक्षणाधिकारी उज्ज्वला गायकवाड यांना सांगितला. गायकवाड यांनी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना ही माहिती दिली. त्यांनी तत्काळ ही बाब पुणे विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष मंजुषा मिसकर व सचिव औदुंबर उकिर्डे यांच्या निदर्शनास आणून दिली. पुणे बोर्डाने तत्काळ दोन्ही विद्यार्थिनींसाठी हॉस्पिटलमध्ये परीक्षा केंद्र उभारण्याची परवानगी दिली. तसेच पोलिस बंदोबस्तही घेण्यास सांगितले. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कर्जत पोलिसांना कळवले. पोलिसांनीही तातडीने दोन कर्मचारी पाठवले व या विद्यार्थिनींनी हाॅस्पिटलमध्ये पेपर दिला.

वाॅर्ड झाले परीक्षा केंद्र

दोन्ही विद्यार्थिनींच्या हाताला मार लागल्याने पेपर लिहिणे शक्य नव्हते. त्यामुळे दादा पाटील महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्र संचालकांनी या विद्यार्थिनींना तत्काळ लेखनिक उपलब्ध करून दिले. दोघींना हाॅस्पिटलमध्ये दोन वेगवेगळ्या खोल्यांत परीक्षेची व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी दोन परीक्षकही देण्यात आले. अखेर हाॅस्पिटलच्या वाॅर्डमध्ये या विद्यार्थिनींनी साडेबारा वाजता पेपर लिहिण्यास सुरूवात केली व ठरलेल्या वेळेत पेपर सोडवला.

शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली भेट

दरम्यानच्या काळात परीक्षा सुरू असताना शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन विद्यार्थिनींची भेट घेऊन व्यवस्थेची पाहणी केली आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली. हाॅस्पिटल, पोलिस व शिक्षण विभाग या सर्वांनीच वेळेत तत्परता दाखवल्याने विद्यार्थिनींना पेपर देता आला व त्यांचे शैक्षणिक नुकसान टळले, अशी माहिती शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली.

Web Title: hospital itself becomes an examination center 2 students injured in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा