हुरडा, हुळा अभ्यासक्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 04:15 PM2019-02-23T16:15:52+5:302019-02-23T16:39:42+5:30

रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा, गहू पिके येतात. ज्वारीचे पीक साधारणत: दरवर्षी १५ डिसेंबर ते ३० जानेवारीपर्यंत फुलोऱ्यात असतात.

Hoora, halo in curriculum | हुरडा, हुळा अभ्यासक्रमात

हुरडा, हुळा अभ्यासक्रमात

Next

अनिल लगड
अहमदनगर : ज्वारी पीक फुलो-यात आले की बळीराजा गोफण घेऊन धानावरची पाखरं हाकायला तयार होतो. जोरजोरात हरोळ्या टाकून बळीराजा या पाखरांना हाकलण्याचा प्रयत्न करताना पहायला मिळतो. अनेक ठिकाणी शेतात बुजगावणे देखील पहायला मिळतात. मात्र तरी देखील काही पक्षी या फुलो-यात आलेल्या ज्वारीचा आनंद घेतात, त्याच पद्धतीने अनेक हौशी लोकही गरमागरम भाजलेल्या ज्वारीची मजा घेण्यासाठी थेट शिवारात येतात आणि हुरडा पार्टी साजरी करतात. स्पर्धेच्या युगात ही हुरडा पार्टी आता शेतातून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आली आहे. एवढेच नाहीतर आता शालेय पातळीवर देखील विद्यार्थ्यांना हुरडा, हुळा पार्टीचे धडे मिळू लागले आहेत.

रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा, गहू पिके येतात. ज्वारीचे पीक साधारणत: दरवर्षी १५ डिसेंबर ते ३० जानेवारीपर्यंत फुलोऱ्यात असतात. या दिवसात हरभरा, गहू पिकेही बहरलेली असतात. ज्वारीचे दाणे कोवळे झाले की सर्वांना हुरड्याची आठवण होते. हुरडा म्हणजे ज्वारीचे कोवळे दाणे. हे दाणे रंगाने हिरवे असतात तर आकाराने तयार ज्वारी दान्यापेक्षा थोडेसे मोठे असतात. ते रसदार असतात. ज्वारीचे कणीस गोव-याच्या निखा-यावर किंवा शेकोटीत भाजून एकेक कणीस पोत्यावर चोळून हे दाणे कणसापासून वेगळे केले जातात. ते गरम गरम खाणे अपेक्षित असते. गार झाल्यावर हे दाणे कडक होतात. असे सगळ्यांनी एकत्र कोवळे दाणे खाण्याला हुरडा पार्टी म्हणतात. धावपळीच्या युगात आता हुरडा आणि हुळा पार्टीला मोठे महत्व आले आहे. हरभरा कोवळ्या दाण्याचा हुळा केला जातो. पाल्यासकट हरभरा शेकटीत भाजला जातो. त्यानंतर एक एक घाटा उचलून खालला जातो. त्याची चवही न्यारीच असते. गव्हाच्या ओंब्यापासून गव्हाचा हुरडाही तयार केला जातो. तो ही चवीला चांगला व आरोग्यवर्धक समजला जातो. त्यामुळे त्याला सध्या महत्व आले आहे.
आम्ही पूर्वी आमच्या शेतात आजोबा, चुलत्यांबरोबर हुरडा खायला जात असत. शेतात गेल्यावर आम्हाला प्रथम गोवºया गोळा कराव्या लावी. आम्ही जवळजवळ पोतेभर गोव-या गोळा करून आणत. त्यानंतर घरातील मंडळी सायंकाळच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी ज्वारीचे कोवळी कणसे आणून गोव-याच्या शेकोटीत भाजत. भाजल्यानंतर एका पोत्यावर आमचे चुलते, वडील हातावर हुरडा चोळीत. त्यांच्या हाताला चटेक बसत असत. परंतु आम्हाला गरमगरम हुरडा खाऊ घालीत. याबरोबर आमच्या आजीने उखळात तयार केलेली खोब-याची चटणी देखील असे. या चटणीची आणि हुरड्याची चव देखील आजही मला हुरड्याचे दिवस आले की आठवते. असेच आम्ही हरभरा कोवळा किंवा पक्क झाला की काड्याकुड्यावर जाळून त्याचा हुळाही आम्ही तयार करुन खात असे. हुळा खाताना मात्र बालसवंगड्याची टोळीच रहात. याची चवही न्यारीच रहात.

आज स्पर्धेचे आणि धावपळीचे युग आहे. शहरीकरणामुळे अनेकांना हुरडा, हुळ्याचा आस्वाद घेता येणे शक्य नाही. परंतु शेतातील हुरडा, हुळा आता रिसॉर्ट किंवा पंचतारांकित हॉटेलमध्ये देखील आला आहे. ज्वारी पिकांवर कृषी विद्यापीठांनी संशोधन करुन हुरड्याच्या विविध जाती संशोधन केल्या आहेत. त्यामुळे अनेक तरुण शेतकºयांनी हुरड्यापासून रोजगार उपलब्ध केला आहे. पॅकिंगमध्ये देखील हुरडा उपलब्ध होत आहे. हा हुरडा विकत घेऊन घरी आणून तव्यावर देखील भाजून खाता येतो. परंतु खरी मजा असते ती शेतात जाऊन शेकोटीत भाजलेल्या हुरड्यातच. परंतु आताच्या शहरी बालगोपालांना हुरडा, हुळ्याचे महत्व पटवून देण्याची वेळ पालकांसह, शिक्षकांवर देखील आली आहे. यासाठी त्यांना आता काही शैक्षणिक संस्थांमध्ये देखील याचे प्रात्याक्षिकांसह धडे दिले जात आहेत.
नगर जिल्ह्यातील राहाता शहरातील प्रीतिसुधाजी इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्या सात दिवसांपासून हुरडा व हुळा सप्ताह साजरा करण्यात आला. डांगे पॅटर्नचे इंद्रभान डांगे यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत असलेल्या सुमारे १५०० बालगोपाळांना संकुलाने हुरडा व हुळा पार्टीची अनोखी मेजवानी बहाल केली. गव्हाच्या भाजलेल्या ओंब्यांचा हुरडा, हरभ-याचा हुळा, ज्वारीच्या कणसांना भाजून केलेला हुरडा खाण्याची मजा या संकुलातील विद्यार्थी सवंगड्यांसोबत शिक्षकांनीही अनुभली. त्यासोबतच या बालकांना आंबट बोरे, कवठे, चिंचा, ऊस, नारळ पाणी आदी हंगामी फळे येथेच्छ खाण्याची मेजवानीही दिली. प्राचार्य ज्ञानेश डांगे यांनी हुरडा कसा तयार करायचा याचे प्रत्यक्षात बालकांना या उपक्रमातून दाखविले. या उपक्रमात प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलाच्या उपाध्यक्षा स्नेहलता डांगे, संचालिका पूनम डांगे, भगवानराव डांगे, शिवाजी देवढे, स्वाती धनवटे, विष्णूवर्धन, अशोक गाढवे, जालिंदर धनवटे, राजूभाऊ दिघे, गणेश शार्दुल, किशोर नवले, अरविंद पवार यांनी सहभाग घेऊन बालकांना हुरडा, हुळ्याची चव दाखवून त्याचे आरोग्यदायी महत्वही पटवून दिले. हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असेच म्हणावे लागेल. येथून पुढे भावी पिढीला अशा उपक्रमातून हुरडा, हुळ्याची माहिती द्यावी लागेल, यात शंका नाही.
 

Web Title: Hoora, halo in curriculum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.