त्या महिलेच्या बालकाचा सरकारी बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 04:53 PM2019-08-09T16:53:51+5:302019-08-09T16:54:11+5:30

गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे खानापूर येथील आदिवासी समाजातील महिलेला प्रसूतीसाठी खाटावर बसून प्राथमिक आरोग्य केंद्रात न्यावे लागल्याने नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Government victim of the woman's child |  त्या महिलेच्या बालकाचा सरकारी बळी

 त्या महिलेच्या बालकाचा सरकारी बळी

Next

शिवाजी पवार
श्रीरामपूर : गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे खानापूर येथील आदिवासी समाजातील महिलेला प्रसूतीसाठी खाटावर बसून प्राथमिक आरोग्य केंद्रात न्यावे लागल्याने नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सोमवारी घडलेल्या घटनेला आरोग्य व्यवस्थाही तितकीच दोषी असून हा सरकारी व्यवस्थेचा बळी असल्याचे आता समोर आले आहे.
खानापूरमधील जुन्या गावठाण येथील गुड्डी बबन बर्डे (वय २२) या महिलेला रविवारी (दि.४) रात्री प्रसूती वेदना झाल्या. मात्र गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे बंधारा पाण्याखाली गेल्याने कुटुंबीयांना तिला घेऊन रस्ता पार करता आला नाही. सकाळपर्यंत महिलेस वेदनांची कळ काढावी लागली होती. त्यानंतर चक्क खाटावर बसून छातीएवढ्या पाण्यातून प्रवास करीत तिला नेल्याने नवजात बाळाचा दुर्दैैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती.
या घटनेनंतर मिळालेली माहिती धक्कादायक आहे. सदर महिलेचे हे दुसरे बाळंतपण होते. पहिल्या बाळंतपणातही नवजात बाळाचा मृत्यू झाला होता. ही आदिवासी महिला असून वीटभट्टीवर काम करते. सरकारच्या पंतप्रधान मातृ वंदन योजनेअंतर्गत पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत लाभार्थी महिलेस ५ हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये दिले जातात.
असे असले तरी महिलेच्या कुटुंबीयांनी मात्र अशा प्रकारे कुठलेही पैैसे मिळालेले नसल्याचे सांगितले. माळवाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैैद्यकीय अधिकारी डॉ.सोहेल शेख यांनी महिलेच्या बँक आॅफ महाराष्ट्रच्या खात्यावर पैैसे जमा झाल्याचा दावा केला. मात्र कुटुंबीयांना त्याबद्दल माहिती नव्हती अशी सारवासारव केली. मग पहिल्या दोन टप्प्यातील तीन हजार रुपये गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गर्भवती महिलेची आशा सेविकांकडून व उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांकरवी संपर्क ठेवून काळजी घेणे अपेक्षित आहे. वेळेवर सकस आहार मिळाल्यास नवजात बालकांच्या मृत्युच्या घटना टाळता येतील. मात्र तसे घडताना दिसत नाही.
पंतप्रधान मातृवंदना योजनेचा मोठा फलक आरोग्य केंद्राच्या बाहेर लावण्यात आला आहे. मात्र आदिवासी महिलेला हे पैैसे मिळालेले नाहीत. सरकारी व्यवस्थेवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

या भगिनीला भेटून तिच्या तोंडून दु:ख ऐकताना ग्रामीण आरोग्य प्रशासनाचा अत्यंत निष्काळजीपणा समोर आला. गरिबांप्रती त्यातून व्यवस्थेची असंवेदनशीलता दिसून आली. महिलेला प्रसूतीपूर्वीच सुरक्षित स्थळी आणले गेले नाही. या घटनेनंतर तरी आरोग्य व्यवस्था जागी होणार का हा प्रश्नच आहे. - लहू कानडे, साहित्यिक
 

 

 

Web Title: Government victim of the woman's child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.