पंधरा दिवस आधीच रचला होता मुकुंद वाकडेच्या हत्येचा कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 03:58 PM2020-05-09T15:58:46+5:302020-05-09T16:24:27+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील मुकुंद जयसिंग वाकडे याचा काटा काढण्याचा प्लॅन पंधरा दिवसापूर्वी दत्तात्रय पठाडे व त्याच्या पे्रयसीने रचला होता, अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी आरोपींच्या घेतलेल्या जबावावरून पुढे आली आहे.
श्रीगोंदा : तालुक्यातील आढळगाव येथील मुकुंद जयसिंग वाकडे याचा काटा काढण्याचा प्लॅन पंधरा दिवसापूर्वी दत्तात्रय पठाडे व त्याच्या पे्रयसीने रचला होता, अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी आरोपींच्या घेतलेल्या जबावावरून पुढे आली आहे.
आरोपी दत्तात्रय पठाडे व महिलेचे तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. याची मुकुंदला माहिती होती. लॉकडाऊनचा फायदा घेत मयत मुकुंद वाकडे यानेही महिलेला त्रास दिला. त्या महिलेने आपल्या प्रियकरास मुकुंद मला त्रास देत आहे. तू त्याला संपवून टाक. अन्यथा मला जगणे अवघड होईल, असे सांगितले. त्यानंतर दत्तात्रय पठाडे हा मुकुंदवर पाळत ठेवून होता. शनिवारी संध्याकाळी दत्तात्रय पठाडे यास या महिलेने मुकुंदची माहिती दिली. यानंतर दत्तात्रयने डाळिंबाच्या बागेत मुकुंदचा खून केला. खून केल्यानंतर दत्तात्रय पठाडे गावात आला. त्याने आपला मित्र सचिन भाऊसाहेब शिंदे याला डाळिंबाच्या बागेत मृत्यू झाला आहे. आपण मळ्यातून जाऊन येऊ असे सांगितले. त्यानंतर दोघे जण मळ्यात गेले. येथे मुकुंदचे प्रेत आढळले.
अंत्यविधीची तयारी आणि ढोंगीपणा
दत्तात्रय पठाडे याने मुकुंदचे प्रेत पाहून डोळ्याला पाणी आणण्याचे नाटक केले. आढळगावमध्ये आला. एका किराणा दुकानदाराकडून लगबगीने अंत्यसंस्काराचे साहित्य खरेदी केले. मुकुंदच्या शरिराचे शवविच्छेदन न करता अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली. पण काही नागरिकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे या खुनाचे बिंग फुटले.
एकलव्य टीमची मदत
या खुनाचा तपास करताना पोलिसांना सुरुवातीला मेळ लागत नव्हता. कारण मयताचे मोबाईलवर कोणत्याही स्त्री अथवा पुरुषाबरोबर संवाद झालेला नव्हता. त्यामुळे पोलिसांना पावलांचे ठसे तपासून शोध घेणाºया बांगर्डे येथील एकलव्य टीममधील व्यक्तींनी मोठी मदत केली. त्यामुळे आरोपीस २४ तासाच्या आत बेड्या ठोकण्यास मदत झाली. एकलव्य टीमच्या कामगिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी कौतुक केले.