व्यवसायांवर कोसळली ‘वीज’!

By admin | Published: May 28, 2014 11:56 PM2014-05-28T23:56:34+5:302014-05-29T00:25:44+5:30

चंद्रकांत शेळके, अहमदनगर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले भारनियमन व मागील दोन महिन्यांपासून तातडीचे होत असलेले शटडाऊन यामुळे विजेवर अवलंबून असलेले व्यवसाय कोलमडले आहेत.

'Electricity' collapses in business! | व्यवसायांवर कोसळली ‘वीज’!

व्यवसायांवर कोसळली ‘वीज’!

Next

चंद्रकांत शेळके, अहमदनगर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले भारनियमन व मागील दोन महिन्यांपासून तातडीचे होत असलेले शटडाऊन यामुळे विजेवर अवलंबून असलेले व्यवसाय कोलमडले आहेत. व्यावसायिकांचे अर्थकारणच यामुळे बिघडले असून कामाच्या वेळेसच वीज नसल्याने कामगारांना बसून पगार द्यावा लागतो. या दुहेरी नुकसानीमुळे व्यापार्‍यांत महावितरणविषयी तीव्र संताप निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात राज्यभर विजेची मागणी वाढली आहे. मात्र त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्याने सुमारे पाच ते सहा हजार मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण होत आहे. याची तोंडमिळवणी करण्यासाठी इमर्जन्सी शटडाऊन सध्या सुरू आहे. नेहमीचे भारनियमन तर वेगळेच. यामुळे ग्राहक जसे मेटाकुटीला आले आहेत, त्यापेक्षा ज्यांचे व्यवसाय विजेवर अवलंबून आहेत अशा व्यावसायिकांचे मात्र प्रचंड नुकसान होत आहे. भारनियमनाची वेळ दिवसाचीच असल्याने कामात मोठे अडथळे येतात. शहरापेक्षा ग्रामीण भागाची स्थिती भयंकर आहे. पिठाच्या चक्क््या, इलेक्ट्रॉनिक वस्तुंची दुकाने, झेरॉक्स मशीन, फेब्रिकेशन, किराणा दुकाने, थंड-पेयांचे स्टॉल, हॉटेल यांना विजेअभावी जबरदस्त फटका बसला आहे. रात्री-अपरात्री केव्हातरी वीज आली की पीठ चक्कीवाल्यांना धावपळ करावी लागते, त्यासाठी रात्र जागवण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तुंची किंवा दुरूस्तीची दुकाने तर विजेशिवाय उघडतच नाहीत. फेब्रिकेशन दुकानांत तर हातावर हात धरून बसण्याशिवाय मार्गच नसतो. उत्पादन होत नसल्याने होणारा तोटा व कामगारांना बसून पगार या दुहेरी नुकसानीला त्यांना तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळयात थंड पेयांची किंवा आईसक्रिमची दुकाने वीज नसल्याने तोट्यात जात आहेत. थंड नसलेली पेय ग्राहक स्वीकारत नसल्याने त्या मालाला सांभाळण्याची मोठी कसरत त्यांना करावी लागते. हॉटेल व्यावसायिकांनाही भारनियमनामुळे मोठा फटका बसत आहे. (प्रतिनिधी) ग्राहकांना ठरलेल्या वेळेत वस्तू तयार करून हव्या असतात. त्यासाठी ते आगावू रक्कमही देतात. परंतु वीज नसल्याने सर्व कामे खोळंबून पडली आहेत. रोजंदारीचे चार कर्मचारी बसून असतात. त्यांची रोजंदारी चुकत नाही. शिवाय वेळेत वस्तू तयार न झाल्यास ग्राहकांच्या लाखोल्या ऐकाव्या लागतात. आम्ही वेळेवर वीजबिल भरतो तरीही भारनियमनाचा भुर्दंड आम्हाला का? - किसन काळे, फेब्रिकेशन व्यावसायिक घरगुती ग्राहकांपेक्षा व्यावसायिकांना महावितरण दुपटीने दर आकारते. घरगुती ग्राहकांपेक्षा वीजवापर कमी असला तरी त्यांना व्यावसायिक दरानेच बिल भरावे लागते. परंतु वेळेवर बिल भरूनही वीज मिळत नसल्याने व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे वीजचोरी करणार्‍यांचे फावत असून, महावितरणचा मात्र त्यांच्यावर अंकुश नाही.

Web Title: 'Electricity' collapses in business!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.