परतीच्या पावसाने कपाशी, तूर पाण्यात; बाजरीचे झाले भुसकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 12:30 PM2019-11-06T12:30:51+5:302019-11-06T12:31:47+5:30

यंदा शेतक-यांनी दुष्काळावर मात करीत खरिपाची पिके घेतली. मात्र गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतातील पिके बरबाद झाली.

Cotton, turf water in return; Bajra became a straw | परतीच्या पावसाने कपाशी, तूर पाण्यात; बाजरीचे झाले भुसकट

परतीच्या पावसाने कपाशी, तूर पाण्यात; बाजरीचे झाले भुसकट

googlenewsNext

लोकमत बांधावर/ संजय सुपेकर । 
बोधेगाव : यंदा शेतक-यांनी दुष्काळावर मात करीत खरिपाची पिके घेतली. मात्र गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतातील पिके बरबाद झाली. शेतात उसनवारी करून केलेला खर्च वाया गेल्याने शेतकरी पूर्णपणे खचला आहे. अशा अस्मानी संकटामुळे यंदा शेतक-यांची अवस्था ‘घर जाळून कोळशाचे धंदे’ अशी झाल्याचे विदारक चित्र आहे. 
बोधेगावसह (ता.शेवगाव) परिसरातील बालमटाकळी, लाडजळगाव, चापडगाव, चेडेचांदगाव, सोनविहीर, हातगाव, मुंगी, गदेवाडी, ठाकुर पिंपळगाव आदींसह तालुक्यातील बहुतांशी गावात अतिवृष्टीमुळे पिके मातीमोल झाली आहेत. बोधेगाव येथील ‘लोकमत’ प्रतिनिधीने  बोधेगाव, चेडे चांदगाव तसेच लाडजळगाव याठिकाणी भेट देऊन पिकांची पाहणी केली. त्यावेळी पिकांची अतिशय विदारक अवस्था झालेली दिसून आली. बोधेगाव येथील बंकट कणसे, इसाक शेख यांच्या शेतातील कपाशी आजही गुडघाभर पाण्यात तरंगत आहे. तर नामदेव गर्जे यांची चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्चून हातातोंडाशी आलेली एकरभर मका जास्त पावसामुळे पूर्णपणे जळून गेली आहे. अभय चव्हाण यांच्या सोंगणी केलेल्या बाजरीचे भिजल्याने कुजून भुसकट झाले आहे. लाडजळगाव येथील महादेव पाटील या वयस्कर शेतक-याचे दीड हेक्टर कपाशी पीक पाण्यात गेले आहे. तर बाजरीला क-हे फुटले आहेत. चेडेचांदगाव येथील संदीप चेडे यांच्या शेतातील वेचणीला आलेल्या कापसाला कोंब फुटले असल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशीच परिस्थिती परिसरातील अनेकांच्या शेतात झाली असल्याचे गोवर्धन ढेसले, मयूर हुंडेकरी, ज्ञानदेव घोरतळे, सुनील गर्जे, राजेंद्र घोरतळे, बाबासाहेब तांबे यांनी सांगितले. 
गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून थेट बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. आजपर्यंत तालुक्यातील एकूण ५० हजार ४०४ हेक्टरपैकी ६ हजार २०० हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे आठ दिवसात पूर्ण होतील. तालुक्यात सर्वाधिक बाजरी व त्या खालोखाल कपाशी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आढळून येत आहे, असे शेवगाव तालुका कृषी अधिकारी किरण मोरे यांनी सांगितले.  
 

Web Title: Cotton, turf water in return; Bajra became a straw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.