कोरोना टेस्ट लॅब ठरणार वरदान-डॉ़ प्रदीप मुरंबीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 11:54 AM2020-05-17T11:54:47+5:302020-05-17T11:55:32+5:30

नगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या जिल्हा रुग्णालय हे कोरोना हॉस्पिटल घोषित करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात लवकरच कोरोनाचे चाचणी केंद्र सुरु होणार असून, तेथील कोरोना टेस्ट लॅबचे काम अंतिम टप्प्यात आहे.  या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ प्रदीप मुरंबीकर यांच्याशी साधलेला संवाद.

Corona Test Lab will be a boon - Dr. Pradeep Murambikar | कोरोना टेस्ट लॅब ठरणार वरदान-डॉ़ प्रदीप मुरंबीकर

कोरोना टेस्ट लॅब ठरणार वरदान-डॉ़ प्रदीप मुरंबीकर

Next

संडे स्पेशल मुलाखत 
अहमदनगर : नगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या जिल्हा रुग्णालय हे कोरोना हॉस्पिटल घोषित करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात लवकरच कोरोनाचे चाचणी केंद्र सुरु होणार असून, तेथील कोरोना टेस्ट लॅबचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ प्रदीप मुरंबीकर यांच्याशी साधलेला संवाद.
प्रश्न : कोरोनाच्या चाचणीसाठी सध्याची व्यवस्था काय आहे?
कोरोना चाचणीसाठी प्रारंभी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेकडे संशयित रुग्णांचे स्त्राव पाठविले जात होते. परंतु तेथे मोठ्या संख्येने चाचणीसाठी स्त्राव येऊ लागल्याने नगरचे स्त्राव तपासणीसाठी पुणे येथील लष्कराच्या प्रयोगशाळेत पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या. सध्या लष्कराच्या वैद्यकीय प्रयोगशाळेत नगरमधून पाठविलेले स्त्राव तपासले जात आहेत. 
प्रश्न : जिल्हा शासकीय रुग्णालयात काय सुविधा आहेत?
जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्ययावत आयसीयु सेंटर आहे. जेथे सध्या कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काही रुग्णांना बूथ हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येते. गंभीर स्थितीत हे रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयु सेंटरमध्ये आणले जातात. त्याशिवाय आपल्याकडे व्हेंटीलेटर, डॉक्टरांसाठी पीपीई कीट व एन-९० मास्क अशा कोरोनासाठीच्या प्रतिबंधात्मक व उपचारासाठी लागणा-या सर्व सुविधा आहेत. एका आठवड्यात ८ ते १० फिजिशियन नियुक्त केले आहेत. त्यामुळे आपल्याकडे पूर्ण सुविधा आहेत. आता जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना टेस्ट लॅब उभी राहत आहे. 
प्रश्न : रुग्णसंख्या वाढल्यास तशी व्यवस्था आपल्याकडे आहे का?
कोरोना टेस्ट लॅब सुरु झाल्यानंतर सर्व चाचण्या नगरमध्येच होतील. चाचण्यांची संख्याही त्यामुळे वाढविता येणार आहे. लवकर निदान झाल्याने रुग्णांना उपचारही लवकर मिळतील. त्याशिवाय जिल्ह्यात २२ कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात आले आहेत. या कोरोना केअर सेंटरमध्ये कमी त्रास होणा-यांना ठेवण्यात येणार असून, तेथेच उपचार केले जाणार आहेत. ज्यांना जास्त त्रास होतो, अशा  रुग्णांची जिल्हा शासकीय रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय काही खासगी हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्यास काहीही घाबरण्याचे कारण नाही. आपण पुरेशी व्यवस्था केलेली आहे.
ही लॅब कधी सुरु होईल?
कोरोनाच्या महामारीविरोधात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन युद्धपातळीवर काम करीत असून, पुढील ४ ते ५ दिवसात नगरमधील जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब सुरु होणार आहे. ही लॅब सुरु करण्यासाठी जिल्हाधिका-यांनी मोठे प्रयत्न केले. त्यामुळे एका दिवसात सुमारे १०० चाचण्या होऊ शकतात़. या लॅबमधील सर्व कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. मायक्रोबायोलॉजिस्टची नेमणूक करण्यात आली आहे. या लॅबमध्ये कोरोनासह इतर सर्व आजारांच्या चाचण्या करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे ही लॅब नगरकरांना आरोग्याच्या दृष्टिने वरदान ठरणारी आहे.

Web Title: Corona Test Lab will be a boon - Dr. Pradeep Murambikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.