कोरोनाने बिघडवले अभियांत्रिकीचे अर्थकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:10 AM2021-01-24T04:10:47+5:302021-01-24T04:10:47+5:30

अहमदनगर : कोरोनाचा झटका कमी-अधिक प्रमाणात सर्वच क्षेत्रांना बसला असला, तरी त्याची मोठ्या प्रमाणात झळ अभियांत्रिकी महाविद्यालयांना बसली आहे. ...

Corona spoils the economics of engineering | कोरोनाने बिघडवले अभियांत्रिकीचे अर्थकारण

कोरोनाने बिघडवले अभियांत्रिकीचे अर्थकारण

Next

अहमदनगर : कोरोनाचा झटका कमी-अधिक प्रमाणात सर्वच क्षेत्रांना बसला असला, तरी त्याची मोठ्या प्रमाणात झळ अभियांत्रिकी महाविद्यालयांना बसली आहे. कोरोनामुळे गेल्या अकरा महिन्यांपासून जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये बंद असल्याने अनेक प्राध्यापकांना संस्थांनी अर्धे किंवा त्यापेक्षा कमी पगार दिले आहेत, तर शिक्षकेतर कर्मचारी घरीच असल्याने त्यांना पगारच दिलेला नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये अद्याप बंदच आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी शुल्क भरलेले नाही तसेच शासनानेही दुसऱ्या टप्प्यातील शिष्यवृत्ती महाविद्यालयांना दिली नसल्याने महाविद्यालये अडचणीत सापडली आहेत. याचा थेट परिणाम प्राध्यापकांच्या वेतनावर झाला आहे. नगर जिल्ह्यात १ शासकीय पदविका, ३२ खासगी पदविका तर १० खासगी पदवी महाविद्यालये आहेत. अनेक संस्थांनी लाॅकडाऊननंतर प्रारंभीचे तीन महिने ४० टक्के पगार दिला. मात्र, त्यानंतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी पगाराविना आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून विनावेतन असल्याने या कर्मचाऱ्यांचे अर्थकारण पूर्णपणे बिघडले आहे. जे प्राध्यापक आॅनलाईन अध्यापन करत आहेत, त्यांचेही पूर्ण पगार न होता त्यात मोठी कपात महाविद्यालयांनी केली आहे. हक्काचे वेतन गमवावे लागेल म्हणून आहे ती नोकरी सोडता येत नाही आणि वेतनासाठी लढायचे तर कुटुंबाची गुजराण कशी करायची, अशा कोंडीत सध्या हजारो प्राध्यापक सापडले आहेत. काही प्राध्यापकांनी महाविद्यालय बंद असल्याने दुसरीकडे खासगी काम करणे सुरू केले आहे. आधीच कमी पगारावर राबणाऱ्या या प्राध्यापकांना कोरोनामुळे आगीतून फुपाट्यात ढकलले आहे.

--------------

जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये

सरकारी - १ (पदविका)

खासगी - ३२ (पदविका)

सरकारी - ० (पदवी)

खासगी - १० (पदवी)

प्राध्यापक - सुमारे ३,५००

शिक्षकेतर कर्मचारी - ५,०००

विद्यार्थी - २४,०००

----------

कोरोनामुळे सर्वच अभियांत्रिकी महाविद्यालयांवर परिणाम झालेला आहे. गतवर्षीची शिष्यवृत्ती न मिळाल्याने महाविद्यालये अडचणीत आहेत. सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू असली तरी त्याला हवा तसा प्रतिसाद नाही.

- डाॅ. जयकुमार जयरामन, प्राचार्य, रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय

--------------

परिसरातील व्यवसाय कोसळले

अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थ्यांना राहण्यासाठी भाड्याने खोल्या तसेच खानावळींचे मोठे प्रमाण असते. परंतु, यंदा काॅलेज बंद असल्याने या खोल्या तसेच खानावळी ओस पडल्या आहेत. स्टेशनरीसह इतर व्यावसायिकांवरही दुकाने बंद करण्याची वेळ आली आहे.

Web Title: Corona spoils the economics of engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.