शेतक-यांसाठी मोेटारसायकलवरुन भ्रमंती करणारे आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 04:19 PM2019-08-16T16:19:10+5:302019-08-16T16:43:18+5:30

श्रीरामपूरपासून फलटणपर्यंतच्या खंडकरी चळवळीचे कॉम्रेड पी़ बी़ कडू पाटील यांनी एकहाती नेतृत्व केले़ खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळावा, म्हणून पदरमोड करुन त्यांनी न्यायालयीन लढा दिला़ पश्चिम महाराष्ट्रात कडू पाटील यांच्या मोटारसायकल भ्रमंतीची जोरदार चर्चा त्यावेळी होती. एकाएका शेतक-यासाठी मोेटारसायकलवरुन शेकडो किलोमीटरचा प्रवास मोेटारसायकलवरुन करणारा आमदार विरळच!

bicyclists for farmers | शेतक-यांसाठी मोेटारसायकलवरुन भ्रमंती करणारे आमदार

शेतक-यांसाठी मोेटारसायकलवरुन भ्रमंती करणारे आमदार

Next

अहमदनगर : पी. बी. कडू उर्फ आप्पा यांचा जन्म २६ आॅक्टोबर १९२१ रोजी सात्रळ (ता. राहुरी) येथे झाला. घरातील ते एकुलते एक अपत्य. घरातील कारभारी चुलते नानासाहेब कडू यांना अपत्य नव्हते. पंचक्रोशीत त्यांना नानाबाबा म्हणून ओळखले जात. त्याकाळी थोडे शिकले, लिहिता-वाचता आले की बस झाले शिक्षण, असा प्रगाध होता. आप्पांच्याही बाबतीतही तसेच घडले असते. मात्र आप्पांनी आग्रह व हट्टाने काही प्रमाणात बंडखोरीने स्वत:चे शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. चुलत्यांचा शिक्षणाला विरोध असल्यामुळे आप्पांनी नातेवाईकांकडून आर्थिक जुळवाजुळव केली. कालांतराने चुलत्यांचा विरोधही मावळला.
बालपणीचे आप्पांचे शिक्षण सात्रळ येथील प्राथमिक मराठी शाळेत झाले़ माध्यमिक शिक्षण संगमनेर येथे घेतले. संगमनेर येथे विद्यार्थी दशेत असताना काही चळवळींमध्ये त्यांनी भाग घेतला. राष्ट्र सेवा दल व इतर सामाजिक चळवळीत ते सहभागी असायचे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालविण्यात आप्पांनी पुढाकार घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व आप्पा सहभागी असलेल्या राष्ट्र सेवा दल यांच्यात सातत्याने तात्विक वाद झडत असत. सेवा दलाचे दुर्वे नाना हे नेतृत्व करीत होते. त्यामुळे सामाजिक चळवळीत आप्पांनी विद्यार्थी दशेतही सहभाग घेतला.
सन १९४२ मध्ये महात्मा गांधींनी चले जाव चळवळीची घोषणा केली. देशभरातील असंख्य तरूण चळवळीत सहभागी झाले. आप्पांनीही स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. त्याकाळी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होणे म्हणजे तुरूंगवास ठरलेलाच असे. चळवळ सुरू असताना साने गुरूजी, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे आदींच्या सोबत आप्पा स्वातंत्र्य चळवळीत आघाडीवर होते. त्यांच्यावर ‘महाराष्ट्र कटाचा’ खटला दाखल झाला होता. या खटल्यात सर्वांना अत्यंत त्रासदायक परिस्थितीतून जावे लागले.
स्वातंत्र्य लढ्यामुळे आप्पांचे शिक्षण अपूर्ण राहिले होते. पुढील शिक्षणासाठी आप्पांनी बडोदा येथे महाविद्यालयात प्रवेश घेतला. बहुजन समाजातील मुलं कमी प्रमाणात वकील होत होते. गोरगरिबांना व विशेषत: ग्रामीण भागातील जनतेला न्याय मिळावा म्हणून आप्पांनी वकील होण्याचा चंग बांधला. त्याकाळी वकिलीचे शिक्षण घेताना आप्पांना अण्णासाहेब शिंदे, चंद्रभान व सूर्यभान पाटील आठरे, बी. जे. खताळ पाटील, पी. पी. जोशी अशा अनेक मित्रांचा सहवास लाभला. शिक्षण घेत असताना अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आप्पा कम्युनिस्ट विचाराकडे ओढले गेले. तुरूंगात असताना अण्णासाहेब शिंदे व मित्रांकडून सहकाऱ्यांना मार्क्सवाद व एकूणच कम्युनिस्ट चळवळ संबंधी अभ्यासपूर्ण माहिती मिळाली.
कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली अनेक चळवळींच्या माध्यमातून आप्पांनी लढे उभारले. नेतृत्व केले. भूमिहीन आदिवासींचा कृषी विद्यापीठ कामगार व विस्थापित शेतकरी, मुळा डावा कालवा निर्मिती, झरेकाठी व वांबोरी चारी असे अनेक लढे आप्पांनी दिले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आप्पा कॉमे्रड श्रीपाद डांगे व कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली अग्रणी होते. खंडकरी शेतक-यांची चळवळ आप्पांच्या आयुष्यातील एक वेगळेच पर्व ठरले. खंडकरी चळवळ ही प्रामुख्याने कोपरगाव, श्रीरामपूर व फलटण या परिसरात होती. गोदावरी व प्रवरा नदीवरील धरणामुळे उत्तर नगर जिल्ह्यात कॅनॉलचे पाणी आले. ब्रिटिश सरकारच्या पाठिंब्यावर ब्रॅरबी कंपनीने हरेगाव येथे साखर कारखाना सुरू केला. कारखान्याच्या ऊस शेतीसाठी तत्कालीन शासनाने शेतक-यांच्या जमिनी खंडाने कंपनीस दिल्या. सोमय्या, मोरारका व डहाणूकर आदी उद्योगपतींनी कारेगाव, सावळेविहीर व टिळकनगर येथे साखर कारखाने सुरू केले. कारखान्यांसाठी मोठ्या प्रमाणावर शेतक-यांच्या जमिनी खंडाने घेतल्या. शेती व्यवसाय कर वसुलीसाठी जप्तीच्या कारवाया सुरु होत्या. त्याचवेळी गुळाच्या व्यवसायात मंदी आली होती. या पार्श्वभूमीवर शेतक-यांनी शेकडो एकर जमिनी साखर कारखानदारांना खंडाने दिल्या. वाढीव खंड व अन्य प्रश्नांसाठी खंडक-यांच्या वतीने कोर्टात खटले दाखल झाले. श्रीरामपूर येथे वकील या नात्याने अण्णासाहेब शिंदे यांनी शेतक-यांच्या केसेस चालविल्या. कालांतराने अण्णासाहेब शिंदे काँगे्रसमध्ये गेले. शिंदे यांनी शासनाच्या विरोधी भूमिका सांगण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचे नेते मनमाडचे कॉ. माधवराव गायकवाड यांच्याकडे ही जबाबदारी दिली. कॉ. गायकवाड यांना मनमाडहून ही चळवळ चालविणे अडचणीचे होते. कम्युनिस्ट पक्षाच्या इतर राज्य पातळीवरील कारभारातही त्यांचा सहभाग असल्यामुळे खंडकरी चळवळीची जबाबदारी आप्पांवर सोपविली.
श्रीरामपूरपासून फलटणपर्यंतच्या खंडकरी चळवळीचे आप्पांनी एकहाती नेतृत्व केले. मोटारसायकलवरून प्रवास करीत पदरमोड केली. पश्चिम महाराष्ट्रात आप्पांच्या मोटारसायकल भ्रमंतीच्या चर्चा झडत होत्या. खंडकरी चळवळीच्या नेतृत्वामुळे आप्पांना काही राजकीय तोटाही सहन करावा लागला. शेती महामंडळाचे कामगार चळवळीमुळे विस्थापित होणार या भितीपोटी कामगारांनी आप्पांना १९६७ व १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत तीव्र विरोध केला. हाच विरोध पुढे १९८४ मध्ये माधवराव गायकवाड यांनाही सहन करावा लागला. १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकीत आप्पांचे चिरंजीव अरूण कडू यांनाही या विरोधाला सामोरे जावे लागले.
स्वातंत्र्य चळवळीनंतर वकिलीचे शिक्षण पूर्ण केलेल्या आप्पांनी राहुरी येथे वकिली पेशा सुरू केला. वकिलीच्या कालखंडात आप्पांनी राहुरी येथून अनेक लढेही दिले. आपल्या वकिली व्यवसायाचा व ज्ञानाचा पूर्ण वापर आप्पांनी गोरगरीब, शेतकरी व दीनदलितांसाठी केला. यादरम्यान प्रस्थापितांच्या विरोधात कोर्टात लढे द्यावे लागले. पक्षकारांकडून सक्तीची फी वसुलीच्या उलट गोरगरीब पक्षकारांना घरी जाण्यासाठी पैसे नसायचे. घरी जाण्यासाठी आप्पांकडूनच पक्षकार पैसे घेत असल्याची ख्याती सर्वश्रुत होती. त्यामुळे ओघाने आप्पांकडे गोरगरिबांचे वकील म्हणून आदराने पाहिले जात होते.
आप्पांना समाजसेवेच्या जोरावर जिल्हा लोकल बोर्डवर काम करण्याची संधी चालून आली. लोकल बोर्डाच्या अध्यक्षपदाची त्यांची संधी हुकली. तरीदेखील आप्पांना जिल्हा ग्रामपंचायत मंडळावर उपाध्यक्ष म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली. कलेक्टर हे मंंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष होते. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून आप्पांकडेच अहमदनगर जिल्ह्याचा कारभार होता. यानिमित्ताने आप्पांना कम्युनिस्ट पक्षाचे कार्य वाढविण्याची संधीही उपलब्ध झाली. याकार्यात कृषी खात्याची जबाबदारी संभाळणारे कॉ. लक्ष्मणराव पालवे यांचेही मोठे सहकार्य लाभले.
लोकल बोर्डानंतर जिल्हा परिषदेतही सदस्य म्हणून आप्पांना संधी मिळाली. तेथे कॉ. वकीलराव लंघे यांच्यासारखे खंदे सहकारी लाभले.
दरम्यान आप्पांनी १९५२ व १९६२ साली विधानसभा निवडणुका लढविल्या. पण त्यात त्यांना अपयश आले. सन १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत राहुरी मतदार संघातून कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर आप्पा निवडून आले. विधानसभेत आपला ठसा उमटविण्यात ते अग्रभागी राहिले. पाटपाणी प्रश्नाची आप्पांना आधीपासून जाण होती. पाण्याच्या प्रश्नावर प्रशासन व अधिका-यांना चांगले धारेवर धरीत. जायकवाडीच्या धरणग्रस्तांच्या संघर्षात कॉ. एकनाथ भागवत, कॉ. वकीलराव लंघे आदी नेत्यांबरोबर आप्पांचा मोलाचा सहभाग होता. पुनर्वसनाच्या प्रश्नावर आप्पांनी विधानसभेत आवाज उठविला. रोजगार हमी योजनेच्या प्रक्रियेतही मोलाचे योगदान दिले. तत्कालीन पाटबंधारे मंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडून मुळा डावा कालवा निर्मितीचे महान कार्य आप्पांनी तडीस नेले. हा कालवा मुळा धरण प्रकल्पाच्या मूळ योजनेत समाविष्ट नव्हता. कालवा खोदणे अशक्य असाच सूर पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांचा होता. परंतु इंजिनिअर नानल व इतरांच्या मदतीने आप्पांनी डाव्या कालव्याची निर्मिती करून घेतली. मुळा डावा कालवा राहुरीच्या पूर्व भागाचा जीवनदायी ठरला आहे. विशेषत: त्या काळानंतर प्रवरा उजव्या कालव्याच्या पाण्याचा आजपर्यंतचा तुटवडा पाहता मुळा डाव्या कालव्याचे महत्व निश्चितच अधोरेखित होते. ते शेतकरी म्हणून प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे प्रथमपासूनचे ऊस उत्पादक सभासद होते. विठ्ठलराव विखे, धनंजय गाडगीळ, मुरलीधर कडू, ग. र. औताडे आदी स्थानिक शेतक-यांच्या सहकार्याने प्रवरा कारखान्याची स्थापना केली. कालांतराने या कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे आप्पांकडे आली.
राहुरी कारखान्याच्या निर्मितीतही बाबूरावदादा तनपुरे, अण्णासाहेब कदम यांच्याबरोबर आप्पांचाही सहभाग होता. आप्पांचे सात्रळ गाव प्रवरा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात होते.  पुढे अण्णासाहेब कदम, रामदास पाटील धुमाळ, दादा पाटील इंगळे आदी सहका-यांबरोबर मतदार जागृती मंडळाची स्थापना करून कारखान्यात सत्तापालट करण्यात आप्पांनी महत्वाची भूमिका बजावली.
प्रवरा व राहुरी कारखान्यामध्ये आप्पांचा सहभाग महत्वाचा समजला जायचा. महाराष्ट्रभर कम्युनिस्ट पक्षाच्या व इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांचा सहभाग सहकार चळवळीत नव्हता. मात्र, आप्पांनी सहकार चळवळ वृद्धिंगत करण्यात महत्वाची भूमिका बजावली.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ग्रामीण बहुजन वर्गाच्या शिक्षणासाठी आप्पा आयुष्यभर कार्यरत राहिले. कर्मवीरांना सात्रळ येथे आणून रयतची शाखा सुरू केली. आप्पांनी आयुष्यभर रयतच्या कार्यामध्ये वाहून घेतले. २० वर्षापेक्षा जास्त कालावधीत ते रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार मंडळाचे अध्यक्ष होते. रयतचे उपाध्यक्षही झाले. रयतसाठी आप्पांनी देणग्याही मिळवून दिल्या. आप्पांनी राहुरीतील स्वत:चे घर तसेच नगर येथील प्लॉट विकून रयत शिक्षण संस्थेला देणग्या दिल्या. आप्पांचे चिरंजीव अरूण कडू हे २३ वर्षापासून रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाची अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत आहेत. शरद पवार अध्यक्ष असलेल्या या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून अरूण कडू कार्यरत आहेत.

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात आप्पांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, व्यंकटराव रणधीर यांच्या समवेत आप्पांनी राज्यभर अंधश्रद्धेविरूध्द लढा दिला. शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या ओट्यावर महिलांना प्रवेश मिळावा म्हणूनही आप्पांनी लढा दिला. वरवंडी येथे लक्ष्मीआई यात्रेतील बोकडबळी प्रथा बंद व्हावी म्हणून आप्पांनी सहका-यांना बरोबर घेऊन लढा दिला. 

परिचय

नाव : कॉ. पुंजाजी बापुजी कडू
जन्म : २८ आॅक्टोबर १९२१

भूषविलेली पदे 
- विधानसभा सदस्य १९७२ ते ७७
- जिल्हा उपाध्यक्ष, ग्रामपंचायत लोकल बोर्ड
- सदस्य जिल्हा परिषद, अहमदनगर
- अध्यक्ष, सात्रळ सहकारी सोसायटी
- सदस्य, जिल्हा लोकल बोर्ड
- संचालक, मुळा प्रवरा विद्युत सोसायटी
- संचालक व अध्यक्ष, प्रवरा सहकारी साखर कारखाना
- संचालक, राहुरी सहकारी साखर कारखाना
- उत्तर विभागीय अध्यक्ष व उपाध्यक्ष, रयत शिक्षण संस्था सातारा 
- अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा अंधश्रध्दा निर्मूलन समिती

लेखक - भाऊसाहेब येवले (‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी)

Web Title: bicyclists for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.