चित्रपट निर्मात्यांना भुरळ पाडणारे बाबूरावदादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 01:57 PM2019-08-16T13:57:09+5:302019-08-16T14:05:41+5:30

‘सामना’ चित्रपट ओळखला जातो, तो राजकीय टिपण्णीसाठी़ मात्र, या चित्रपटात सहकार चळवळही तेव्हढ्याच प्रकर्षाने मांडण्यात आली आहे. या सहकार चळवळीची पटकथा ज्या कारखान्यात तयार झाली तो राहुरी कारखाना बाबूरावदादा तनपुरे यांनी उभा केला.

Baburav Dada who is enthralled by the film makers | चित्रपट निर्मात्यांना भुरळ पाडणारे बाबूरावदादा

चित्रपट निर्मात्यांना भुरळ पाडणारे बाबूरावदादा

googlenewsNext

अहमदनगर : पारतंत्र्याच्या राजवटीत देशाचे चित्र विदारक होते़ पारंपरिक पद्धतीने शेतीची कामे केली जात होती. दुसऱ्या महायुद्धामुळे जागतिक आर्थिक मंदी आली होती. अनेक साम्राज्यशाही नष्ट झालेल्या होत्या. अशा काळात बाबूराव बापुजी तनपुरे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात २० डिसेंबर १९१४ रोजी राहुरी येथे झाला. दादा या नावाने ते परिचित होते. दादांचे वडील लक्ष्मण आप्पाजी तनपुरे हे शेतीवर उपजीविका करीत होते. चुलते बापुजी यांनी दादांना दत्तक घेतले. दत्तक मातोश्री झुंगाबाई यांनी दादांवर संस्कार केले.

बाबूराव दादा तनपुरे यांचे शिक्षण राहुरी येथे सातवीपर्यंत झाले. त्यानंतर इंग्रजी शाळेत जाण्यासाठी एक वर्षाचा कोर्स करावा लागत होता. सदरचा एक वर्षाचा कोर्सही दादांनी पूर्ण केला. शिक्षण घेत असताना दादांनी पोहण्याचा छंदही जोपासला होता. कुस्तीमध्येही दादा रममाण झाले होते. त्यांचे वागणे रूबाबदार होते. दादांनी जिल्हा मराठा प्रसारक मंडळाच्या मदतीसाठी ह. कृ. काळे, विष्णू दिघे यांच्या प्रोत्साहनाने ‘आग्य्राहून सुटका’ हे नाटक बसविले होते. त्यामध्ये दादांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती. या नाटकातून तब्बल २ हजार ९०० रूपये आर्थिक मदत मिळाली होती. पुढे जिल्हा मराठा शिक्षण प्रसारक मंडळातून प्रेरणा घेत राहुरी येथे पत्की गुरूजींना प्रोत्साहन देऊन विद्या मंदिरची मुहूर्तमेढ रोवली.
शिक्षण झाले की शेती किंवा जमल्यास नोकरी करण्याचा प्रगाध त्याकाळी होता. त्याकाळी दादांना तलाठी किंवा तहसीलदार अशी कुठलीही नोकरी सहज मिळाली असती. परंतु त्यांनी नोकरी न करता राहुरी येथे जयवंतराव शेटे यांचे किराणा दुकानात व्यापाराचा अनुभव घेतला. त्यामुळे व्यापारी वृत्ती दादांमध्ये वृद्धिंगत झाली. दादांचे कर्तृत्व व हुशारी पाहून जयवंतराव शेटे खूश झाले. त्यांनी स्वत:ची मुलगी भागिरथीबाई यांच्यासोबत १९३५ मध्ये दादांचा विवाह लावून दिला. भागिरथीबाई तनपुरेंच्या सूनबाई म्हणून आल्या अन् परिवाराची जेमतेम असलेली परिस्थिती बदलली. तनपुरे घराण्यात लक्ष्मीच्या पावलांनी भरभराट आली.
विवाहानंतर दादांनी पारंपरिक शेतीला छेद देत व्यापारी पद्धतीचा अवलंब केला. बागायती पाटपाणी असलेल्या शेतजमिनीमध्ये जुनी मोसंबीची बाग मोडून नवीन बाग लावली. मोसंबीच्या बागेत घासाचे आंतरपीक घेतले. त्यावेळी मोसंबीला फळे येण्यासाठी पाच-सहा वर्षांचा कालावधी लागत असे. तोपर्यंत दादांनी तीन वर्ष घासाचे पीक घेतले. दादांचे बंधू दगडूराम दादा तनपुरे हे घास विक्री करीत असत. त्यांच्याबरोबर दादांनी घासाची शेती व विक्रीचे तंत्र अवगत केले.
दादांची शेती पिकाची दूरदृष्टी आजच्या शेतकऱ्यांसमोर आदर्श ठरावी अशीच होती. साधारणत: ८० वर्षापूर्वी दादांनी तीन वर्षाचा घास झाल्यानंतर त्यामध्ये नांगर न फिरविता घासाचे बी धरले. त्यातून तब्बल २९ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले़ त्यावेळचे २९ हजार रूपये आजच्या घडीला १५ लाखापेक्षा अधिक होत. घासाच्या बियाणामुळे तनपुरे परिवाराच्या भरभराटीला दिशा मिळाली. मोसंबी झाडांची मशागत, फळांची प्रतवारी करून सुरूवातीला विक्रीही केली़ त्यासाठी आडत दुकान काढले़ बाबूराव बापुजी तनपुरे लॉटरी असे दुकानाला नाव देण्यात आले. मोसंबीचे व्यापारी पद्धतीने मार्केटिंग केले. अनेक शेतक-यांची मोसंबी विकत घेऊन ती मुंबईला पाठविली. शेतक-याचा मुलगाही मोठा व्यापारी होऊ शकतो, हे दादांनी दाखवून दिले.
मोसंबीला डायबॅक नावाचा रोग आला. त्यामुळे मोसंबीची बाग नामशेष झाली. मोसंबीनंतर ऊस पिकाचे राहुरी परिसरात आगमन झाले. उसाचा शेतकरी गूळ करीत होते. शेतक-यांना दोन पैसे अधिक मिळावे, म्हणून दादांनी गूळ खरेदी सुरू केली़ दादा लिलावात उशिरा आल्यास शेतकरी म्हणायचे, ‘दादांना येऊ द्या, मग लिलाव सुरू करा़’ व्यापारीही दादा आल्यानंतर गुळाचा लिलाव करीत़ दादांमुळे गुळाला अधिक भाव मिळतो, असा आत्मविश्वास शेतक-यांना होता.
सन १९५२ मध्ये दुष्काळ पडला होता. भोजनावाचून अनेकांचे हाल होत होते. धान्याचा तुटवडा होता. त्यावेळी दादांच्या कन्या रत्नमाला यांचा विवाह करण्यात आला. विवाहाच्या निमित्ताने राहुरीकरांनी पहिल्यांदा विद्युत रोषणाई पाहिली. लग्नानिमित्त एक महिना राहुरी तालुक्यातील लोकांना भोजन सुरू होते. दुष्काळी कामाच्या ठिकाणीही भाऊबंद व मित्रांच्या मदतीने भोजन पोहोच करण्यात आले. त्यामुळे दादांनी केलेल्या अन्नदानाची चर्चा राज्यभर झाली होती. प्रतिष्ठितांना त्यावेळी आॅनररी मॅजिस्ट्रेट म्हणून नियुक्ती मिळत होती. या आॅनररी मॅजिस्ट्रेटकडे दंडात्मक अधिकार होते. हे पद दादांना चालून आले. कालांतराने गुळाला मंदी आली. त्यामधून बाहेर पडण्यासाठी दादांच्या डोक्यात साखर कारखाना सुरू करण्याचा विचार आला. साखर कारखाना काढणे सोपे नव्हते. परंतु दादांवर शेतक-यांचा खूप भरवसा होता. साखर कारखाना सुरू करण्याचे पाऊल उचलले. त्यासाठी शेतक-यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला वाघुजी रामजी पाटील, आण्णा पाटील कदम, अनंतशेठ धावडे, शिवराम राजुळे आदी उपस्थित होते. मात्र, दादांच्या कल्पनेला विरोध झाला. कारखान्याला नकार मिळाल्याने दादांनी कोपरगाव येथे गणपतराव औताडे, के.बी.रोहमारे, शंकरराव काळे यांच्या मदतीने कारखाना काढण्याचे ठरविले. त्यानंतर दादांनी कारखाना रजिस्टर केला. त्यामध्ये दादा प्रमोटर होते. कोपरगाव सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पुन्हा राहुरीला साखर कारखान्याला झालेला विरोध ही चूक होती, असे शेतक-यांच्या लक्षात आले. त्यानंतर राहुरी साखर कारखाना सुरू करण्यासाठी दुसरी बैठकही देवळाली प्रवरा येथे झाली. त्यामध्ये कारखाना उभारणीला उपस्थितांनी हिरवा कंदील दाखविला. अखेर ५ मे १९५४ रोजी राहुरी कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. बैठकीत ३१ सभासदांची कमेटी तयार करण्यात आली. त्यामध्ये चिफ प्रमोटर म्हणून दादांची निवड झाली.
राहुरी कारखाना सुरू करताना व्यापा-यांकडून जबर विरोध झाला. शेतक-यांनी पैसे, दागिने व्यापा-यांकडे ठेवलेले होते़. एक हजार रूपयांचा शेअर्स भरण्यासाठी शेतक-यांचे पैसेही व्यापारी देत नव्हते. बिनव्याजी शेतक-यांचे पैसे व्यापा-यांना वापरण्यास मिळत होते. त्यामुळे व्यापारी शेतक-यांना त्यांचेच कष्टाचे पैसे देण्यास नकार देत होते. शेतक-यांनी महिलांच्या अंगावरील दागिने विकले. जनावरे विकून शेअर्ससाठी पैसे जमविले. शेतक-यांनी जमेल तसे पैसे जमा करून राहुरी कारखाना सुरू करण्यासाठी खारीचा वाटा उचलला.
कारखाना सुरू करताना दादांनी सर्व विचारांच्या लोकांना बरोबर घेतले. दादांनी जनसंघाचे अण्णा पाटील कदम, कम्युनिस्ट विचाराचे पी. बी. कडू पाटील आदींना बरोबर घेतले. पहिल्या संचालक मंडळात समाविष्ट होण्यासाठी कारखान्याचे २५ शेअर्स घेणा-यांना संधी देण्यात आली. त्यामध्ये चंद्रभान डाकले, वाघुजी बडधे, शिवराम राजुळे, मुन्शीबेग इनामदार, अण्णा पाटील कदम, अनंतशेठ धावडे व स्वत: दादांचा समावेश होता.
शेअर्स गोळा करण्यासाठी तत्कालीन कलेक्टर म. वा. देसाई यांनी अतिशय मोलाची मदत केली. देसाई यांनी शेतक-यांना चारा तगाई, बैल तगाई अशा स्वरूपात कर्ज मंजूर केले. एका दिवसात ८० हजार रूपये जमा करून दिले. भागभांडवलासाठी दीड लाख रूपये कमी पडत होते. नंतरच्या काळात ही रक्कमही गोळा करण्यात आली. सुरूवातीला कारखान्यासाठी अधिका-यांच्या नेमणुका करण्यात आल्या. दादांनी काटकसरीने कारखाना चालवून राज्यात सर्वाधिक एक रूपया अधिक भाव देण्याची किमया केली.
दादांच्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ अभिनेते निळू फुले यांना पडली. राहुरी कारखान्याच्या सहकार चळवळीवर ‘सामना’ हा चित्रपट काढला. चित्रपटाच्या एका भागाचे चित्रीकरण राहुरी कारखान्यावर झाले होते.
दादांना १९६२ व १९६७ मध्ये आमदारकीची संधी मिळाली. १९६७ मध्ये काँग्रेसचे अधिवेशन राहुरी कारखान्यावर झाले होते. अधिवेशन जाणीवपूर्वक कारखान्यावर ठेवले होते. महाराष्ट्राच्या राजकारणावर यानिमित्ताने दादांची छाप पडली. पुढील काळात दादांनी विविध प्रकल्प उभे केले. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्यामुळे शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली. कापूस उत्पादकांच्या हितासाठी जिनिंग प्रेसींगचा प्रकल्प सुरू केला. त्यामुळे स्थानिक पातळीवर एकाधिकार कापूस खरेदी केंद्र राहुरीला सुरू करण्यात आले. मुळा धरणाला डावा कालवा नव्हता. त्यामुळे राहुरीच्या उत्तर बाजूला पाणी मिळत नव्हते. दादांनी पाटबंधारे मंत्री बी. जे. खताळ यांच्याकडे पाठपुरावा केला. खताळ पाटील यांनी विशेष मदत केली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीला स्थापन झाले. त्यासाठी केंद्रीय कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. पां.वा.पवार यांनी इंग्रजी पेपरमध्ये इलेक्ट्रीक सोसायटीसंदर्भात जाहिरात वाचली. पवार यांनी दादांना ही माहिती पुरविली. त्यानंतर दादांनी मुळा प्रवरा इलेक्ट्रीक सोसायटीच्या स्थापनेसाठी  पुढाकार घेतला. त्यासाठी तत्कालीन मंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. भागडा चारीची संकल्पनाही दादांची होती. पुढे आमदार प्रसाद तनपुरे यांच्या कालावधीत ती पूर्ण झाली. शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली. खरेदी विक्री संघ, राहुरी तालुका फ्रुट ग्रोअर्स सोसायटी, राहुरी नगर परिषद, शेतकरी सूतगिरणी, मोटार वाहतूक संस्था आदी संस्थांची मुहूर्तमेढ दादांनीच रोवली.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत बाबूराव दादा तनपुरे यांनी शेतकरी, व्यापारी, समाजसेवक व स्वातंत्र्य सैनिक म्हणून देशसेवेसाठी दिलेले योगदान महत्वाचे ठरले आहे. राहुरी तालुक्यापुरते त्यांचे कार्य मर्यादित नव्हते. राहुरी कारखान्याची स्थापना करण्याबरोबरच संगमनेर कारखाना, श्रीगोंदा कारखाना, कोपरगाव कारखाना आदींना दादांनी मदत केली़ दादा नसते तर संगमनेर कारखाना उदयाला आला नसता. मंत्रिमंडळात दादांना महत्वाचे खाते मिळत होते. मात्र मंत्रिमंडळात स्वारस्य नसल्याने त्यापासून ते सदैव दूर राहिले.
एका कारखान्यामुळे उद्योगधंदे आले. लोकांना रोजगार मिळाला. शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. विकासाच्या मूलभूत गरजा पूर्णत्वास गेल्या. मग कल्पना करा दादांनी कारखाना काढला नसता तर ही विकासगंगा घरोघरी पोहचली असती का? कुणाचेही फारसे मार्गदर्शन नसताना विविध विचारांच्या मित्रांना बरोबर घेऊन दादांनी राज्यात स्वत:चा ठसा उमटविला. दादांचा इतिहास म्हणजे नवीन पिढीला दीपस्तंभ ठरावा असा आहे.

परिचय
जन्म : २० डिसेंबर १९१४
गाव : राहुरी

भूषविलेली पदे 
- १९५२ : आॅनररी मॅजिस्ट्रेट म्हणून नियुक्ती  
- १९५४ : राहुरी कारखान्याची स्थापना व चिफ प्रमोटर निवड.
- १९६२ व १९६७ : आमदार 

लेखक - कॉ. गंगाधर पाटील जाधव(कम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते)

Web Title: Baburav Dada who is enthralled by the film makers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.