अनिल राठोड म्हणाले होते,  ‘माझा मीच गॉड फादर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 12:39 PM2020-08-06T12:39:22+5:302020-08-06T12:40:10+5:30

माजीमंत्री, माजी आमदार, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांची लोकमत वर्धापन दिन विशेषांकात मुलाखत प्रसिद्ध केली होती. मी कसा घडलो, हे त्यांनी त्यांच्याच शब्दात सांगितले होते. 

Anil Rathore had said, 'I am my Godfather' | अनिल राठोड म्हणाले होते,  ‘माझा मीच गॉड फादर’

अनिल राठोड म्हणाले होते,  ‘माझा मीच गॉड फादर’

Next

सुदाम देशमुख /अहमदनगर

-------------------

घरात हलाखीची परिस्थिती असल्याने बी. कॉम. चे शिक्षण पूर्ण केल्याबरोबर नोकरीसाठी मुंबईला गेलो. सेंच्युरी बाजारमध्ये लेखापालची (अकौंटंट) नोकरी लागली. मात्र तिथे फारसे मन रमले नाही. पुण्यात स्वारगेट येथील एका खासगी कंपनीत नोकरी सुरू केली. महिन्याला मिळणारा पगार घराकडे पाठवायचो. जेमतेम पैसे मिळत असले तरी नोकरीत काही मन रमले नाही. हिंदुत्वाविषयी माझ्या मनाला प्रचंड ओढ होती. बाहेरगावी नोकरी करून आई-वडिलांकडे लक्ष देणे शक्य नव्हते. म्हणून पुन्हा नगरला आलो. पण घरात बसणे शक्य नव्हते. उदरनिर्वाहासाठी काहीतरी काम  केले पाहिजे, यावर विचार मंथन सुरू होते. दिलीप शिदेंची गाडी होती. त्यांच्या गाडीसोबत चितळे रोडवर माझीही गाडी लावली. वडा-पाव, पावभाजी, ज्युसची गाडी सुरू केली आणि सुरू झाला रोजच्या जीवनाशी संघर्ष!


वडापाव विकताना माझ्यातील हिंदुत्त्वाचे रक्त काही मला स्वस्थ बसू देत नव्हते. हे रक्त जन्मजात भिनलेले. हिंदू धर्मासाठी काम करणारी त्यावेळी हिंदु एकता समिती होती. या समितीचे काम मला मनापासून आवडायचे.  याच कामामुळे माझी शहरभर एक कार्यकर्ता म्हणून ओळख झाली. मला कोणी गॉडफॉदर भेटला नाही. हम खुद फादर है. हृदयात ठासून भरलेले हिंदुत्त्व हेच माझ्यासाठी खरे गॉडफादर ठरले. 


हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमख बाळासाहेब ठाकरे यांचा झंजावात त्यावेळी सुरू होता. मीही शिवसेनेत काम सुरू केले. शिवसेना शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख अशा जबाबदाºया यशस्वीपणे सांभाळल्या. त्याकाळात शिवसेनेच्या शाखा विस्ताराच्या कामाने झपाटलो होतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानी हेच माझे दैवत. त्यांच्या नावांनी दिलेल्या घोषणा लोकांना आवडत होत्या. कार्यकर्ते कधीच मी गोळा केले नाहीत. मला ते गोळा करून आणावे लागले नाहीत. प्रत्येक काम करताना नवीन कार्यकर्ते मला मिळत गेले.  जनतेला संपूर्ण संरक्षण हेच माझे ब्रीद आहे. शिवसेनेची पहिली शाखा उघडण्यासाठी भांडणे, मारामाºया झाल्या. शाखा उघडण्यास मातब्बरांकडून दबाव आला. धमक्या आल्या. मात्र त्याला न जुमानता काम सुरू केले. प्रत्येक शाखा उघडायची म्हटली की दहशतीशी सामना करावा लागला. मात्र हा संघर्ष नित्याचाच झाला. ‘दैनंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ हे संत तुकाराम महाराजांचे वचन आम्ही प्रत्यक्षात जगत होतो. नगर शहरावर तेव्हापासून दहशत आहे. घोषणा देण्यासही बंदी असायची. पण कोणापुढेच मी डगमगलो नाही. कारण कामाशी मी प्रामाणिक होतो. माझ्यात कुठेही खोट नव्हती. सामान्य माणसासाठी काम करणे हाच माझा ध्यास राहिला आहे.


१९९० मध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली. नगरमधून शिवसेनेला उमेदवार हवा होता. त्यासाठी शहरामध्ये अनेक कार्यकर्ते होते. प्रत्येकाला तिकिटासाठी विचारणा झाली. मात्र विधानसभेचे तिकीट घ्यायला कोणीच तयार नव्हते. निवडणूक लढविणे सोपे काम नाही, असे प्रत्येकजण म्हणत होता. त्यावेळी तिकीट घेण्याचा मला आग्रह झाला आणि मी निवडणूक लढवायचे ठरविले. माझ्याविरोधात नगर शहरातील सर्व दिग्गज निवडणुकीला उभे राहिले. पहिलीच निवडणूक आव्हानात्मक होती. लोकांचा माझ्यावरील विश्वास, लोकांमध्ये मिसळून काम करण्याची पद्धत, संरक्षणासाठी पुढाकार आणि हिंदुत्त्व लोकांना आवडले. त्या निवडणुकीत सगळ््यांचे डिपॉझिट मी जप्त केले. ३५ व्या वर्षीच आमदार झालो. एका मोठ्या संघर्षातूनच विजय मिळाला.


कार्यकर्ता म्हणूनच काम करायचे ठरविले होते. म्हणून निवडणूक हा विषय माझ्यासाठी नव्हताच. मी कोणतीही निवडणूक लढविली नव्हती. पहिल्यांदा थेट आमदारकीची निवडणूक लढविली आणि विजयी झालो, याचे मलाही आश्चर्य वाटले. तिकीट घेऊन काय करू असा माझा प्रश्न होता. प्रचारासाठी थोडेफार पैसे लागतात. तेही माझ्याकडे नव्हते. म्हणूनच निवडणूक लढविण्याचा विचार माझ्या मनात आला नव्हता. पण लोकांच्या आग्रहास्तव निवडणूक लढविली. मला निवडणुकीसाठी पैसा कधीच लागला नाही. कार्यकर्ते हेच माझे खरे धन आहे.


हिंदुत्त्वासाठी लढणारा एक सच्चा कार्यकर्ता असल्यामुळे काहीही घडलं तरी पोलीस माझ्याच मागे असायचे. मलाच पहिल्यांदा अटक व्हायची. माझ्यावर नेहमीच गुन्हे दाखल व्हायचे. हिंदू एकता समितीमध्येही माझी आरोपी म्हणूनच ओळख होती. मी काही कोणाच्या घरी डाके घातले नव्हते. मात्र लोकांच्या संरक्षणासाठी मला आरोपी व्हावे लागले. या आरोपीला पोलिसांच्याऐवजी आता लोकांनीच त्यांच्या प्रेमाच्या पिंजºयात कैद केले आहे. म्हणूनच सलग २५ वर्ष आमदार झालो.


छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले. त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना फुटली. त्यावेळी मलाही विचारणा झाली होती. मात्र हिंदुत्त्वाचे रक्त माझ्या अंगात असल्याने दुसºया कोणाचाही विचार कधीच माझ्या मनात आला नाही. शिवसेना हाच एक पक्ष! हिंदुत्त्वावर होणारा अन्याय सहन होत नसल्याने सतत मनात संघर्षाची मशाल ज्वलंत होती.


नगर जातीय दंगलीसाठी राज्यात प्रसिद्ध होते. शहर जातीपातीबाबत संवेदनशील आहे. सर्जेपुरा येथे पहिल्यांदा दंगल झाली. मोठा राडा झाला होता. त्याचवेळी हिंदुच्या संरक्षणासाठी हिंदू एकता समितीच्या माध्यमातून आवाज उठविला. लोकांसाठी पुढे आलो. लोकांसाठी मी २४ तास उपलब्ध आहे. राजकारण हा काही व्यवसाय नाही. ती एक सेवा आहे आणि सेवाच राहिली पाहिजे. धंदे करण्यासाठी, शाळा-कॉलेज उघडण्यासाठी मी काही राजकारणात आलो नाही. तसे करणेही अयोग्यच आहे. म्हणूनच माझी कुठेच शाळा नाही की कॉलेजही नाही. संरक्षण आणि शांततेसाठी लढतो आहे. एक सामान्य मुलगा आमदार झाल्याचे निश्चितच समाधान आहे. आमदार असलो तरी आजही मी लोकांसाठी सामान्यच आहे.

Web Title: Anil Rathore had said, 'I am my Godfather'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.