अपहरण, रेप, पोलिसांवर गोळीबार: ये अहमदनगर है़, या लूटमारनगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:40 PM2019-11-27T12:40:37+5:302019-11-27T12:40:55+5:30

तरुणीवर अत्याचार, थेट पोलिसांवर गोळीबार अन् भरचौकासह महामार्गावरील लूटमाऱ़़ गेल्या आठ दिवसांतील या चार ते पाच घटनांचे अवलोकन केले तर जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांनी डोके वर काढून थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे़.

Abduction, rep, police firing: Yeh Ahmednagar Yes, this robbery | अपहरण, रेप, पोलिसांवर गोळीबार: ये अहमदनगर है़, या लूटमारनगर

अपहरण, रेप, पोलिसांवर गोळीबार: ये अहमदनगर है़, या लूटमारनगर

Next

अरुण वाघमोडे /  
अहमदनगर : गजबजलेल्या चौकातून उद्योजकाचे अपहरण, रस्त्याच्या कडेला वाहनात तरुणीवर अत्याचार, थेट पोलिसांवर गोळीबार अन् भरचौकासह महामार्गावरील लूटमाऱ़़ गेल्या आठ दिवसांतील या चार ते पाच घटनांचे अवलोकन केले तर जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांनी डोके वर काढून थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे़. या गुन्ह्यातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी सराईत गुन्हेगारांची वाढलेली ही हिंमत कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने नक्कीच घातक आहे.
गुन्हेगारांबाबत ‘कानून के हाथ लंबे होते है’! असा एक प्रसिद्ध डायलॉग आहे. नगर जिल्ह्याबाबत मात्र ‘कानून के हाथ हमारे यहाँ तो बंधे होते है’! असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांतील आणि काही महिन्यांतील घटना पाहिल्या तर सराईत गुन्हेगारांनी जनतेसह पोलिसांनाही हैराण करून सोडले आहे़. घरफोड्या, रस्तालूट, वाहनचोरी या घटना सुरूच असताना आता भरदिवसा आणि भरचौकातून अपहरण आणि पोलिसांवर गोळीबाराच्या घटना घडू लागल्याने जनतेमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. कानून के हाथ लंबे करून पोलिसांनी या सराईत गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा अशीच जनतेची मागणी आहे़.    
नगर शहरातील सर्जेपुरा येथून १८ नोव्हेंबर रोजी अजहर मंजूर शेख या कुख्यात गुंडाच्या टोळीने प्रसिद्ध उद्योजक करीम हुंडेकरी यांचे अपहरण करून २५ लाख रुपयांची खंडणी मागितली़. या गुन्ह्यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले असले तरी मुख्य सूत्रधार अजहर हा अजून फरार आहे. १९ नोव्हेंबर रोजी शहरातील क्लेरा ब्रुस विद्यालयाच्या मैदानाजवळ रस्त्यावरच एका वाहनचालकाने पिकअप वाहनात तरुणीवर अत्याचार केला. कोतवाली पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे. २० नोव्हेंबर रोजी तर राहाता येथे सराईत गुन्हेगारांनी थेट पोलिसांवरच गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. या घटनेत एका पोलीस कर्मचा-याला दोन गोळ्या लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. २५ नोव्हेंबर रोजी राहुरीत पहाटे दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गुन्हेगारांनी दगडफेक केली. गेल्या आठ दिवसात एकसलग घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भरदिवसा अपहरणाच्या घटना आणि थेट पोलिसांवर गोळीबार होत असेल तर सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
हुंडेकरी यांचे अपहरण करणारा अजहर शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर याआधी विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामीनावर बाहेर आहे. तर राहाता येथे पोलिसांवर गोळीबार करणारे आरोपी सचिन ताके व अमित सांगळे हे सराईत गुन्हेगार आहेत. प्रसिद्ध व्यक्तीचे अपहरण अथवा पोलिसांवर हल्ला या घटना एका दिवसांपुरत्या मर्यादित राहत नाहीत तर त्याचा दीर्घकाळ समाजमनावर परिणाम होत असतो़. यातून जनतेत असुरक्षिततेची भावना निर्माण होते. इतर गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक कमी होतो. यातून गुन्हेगारीच्या घटना वाढतात़ सराईत गुन्हेगारांनी पुन्हा-पुन्हा गंभीर गुन्हे करू नयेत, यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ‘गुन्हेगारी दत्तक योजना’ ही संकल्पना जिल्ह्यात राबविली होती. शर्मा गेल्यानंतर मात्र या योजनेचे काय झाले? हे पोलिसांनाच माहिती.

 हत्यारांचाचा धाक दाखवून भरदिवसा लुटमार 
गुन्हेगारी जगतात लुटमारीसाठी युपी, बिहारचे उदाहरणे दिली जातात. प्रत्यक्षात मात्र नगर शहर व परिसरात त्यापेक्षाही भयानक लुटमारीच्या घटना घडत आहेत. रविवारी (दि़२४) नगर शहरात तिघा चोरट्यांनी दुपारी तीन वाजता कारचालकाचा पाठलाग करून हत्यारांचा धाक दाखवित मारहाण करत त्याच्याकडील पैशाची बॅग लंपास केली. शहर व परिसरात आठ दिवसांत किमान तीन ते चार अशा स्वरुपाच्या घटना घडत आहेत. अंगावर दागिने घालून आणि घरातून पैसे घेऊन नगर शहरात यावे की, नाही असा प्रश्न आता नगरकरांना पडला आहे.

Web Title: Abduction, rep, police firing: Yeh Ahmednagar Yes, this robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.