श्रीगोंदा : बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी नागवडे साखर कारखाना निवडणुकीत राजेंद्र नागवडे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील विधानसभा निवडणूक समोर ठेवून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तिसरी आघाडी करून प्रस्थापित मंडळींना आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.
नाहाटा यांनी आढळगावमध्ये (ता. श्रीगोंदा) समर्थक कार्यकर्त्यांची गुरुवारी बैठक घेतली. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या आठ आणि पंचायत समितीच्या सर्व सोळा गणांत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत अण्णासाहेब शेलार यांना उभे करून आमदार बबनराव पाचपुते यांना रोखण्याचा डाव नाहाटा यांनी त्यावेळी टाकला होता. मात्र, त्यामध्ये त्यांना यश आले नाही. त्यानंतर शेलारांबरोबर काम केले आणि आपले लक्ष साध्य केले.
२०१४ ला राष्ट्रवादीचे राहुल जगताप यांना साथ केली आणि बबनराव पाचपुतेंना रोखले. मात्र, २०१९ ला पुन्हा बबनराव पाचपुतेंना मदत केली. पाचपुते सातव्यांदा आमदार झाले. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत नाहाटांनी केलेले घातकी राजकारण पाचपुते विसरलेले नाहीत.
गेल्या काही दिवसांपासून अण्णासाहेब शेलार व बाळासाहेब नाहाटा यांच्यात राजकीय दरी निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत अण्णासाहेब शेलारांना झटका दाखविण्यासाठी नाहाटांनी डावपेच टाकण्यास सुरुवात केली आहे.
आढळगावमध्ये त्यांनी निवडक कार्यकर्त्यांशी याबाबत चर्चा केली. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आढळगावचा उमेदवार उभा करून नवा इतिहास घडवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बेलवंडी गटात तीन उमेदवार उभे करून या गटावर तिसऱ्या आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी बेलवंडी गावातील अण्णासाहेब शेलार यांचा समर्थक फोडण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कालचे हातात हात घालून काम करणारे मित्र हे राजकीय शत्रू म्हणून समोरासमोर येणार आहेत.
---
कोण-कोण राहणार सोबत..
बाळासाहेब नाहाटा यांनी प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे नाहाटा हे प्रस्थापित मंडळींच्या रडारवर आहेत. अशा तापलेल्या रणसंग्रामात नाहाटांच्या रथाचे सारथ्य संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस करीत आहेत. नाहाटांच्या भूमिकेला साथ देण्यासाठी कोण कोण पुढे येतात, सच्चे मित्र काय कानमंत्र देतात, यावरच नाहाटा पुढचे पाऊल टाकण्याचे धाडस करतील, अशी चर्चा आहे.
-----
बाळासाहेब नाहाटा