शिर्डी : पाकिटमारीच्या संशयावरून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या किरण अशोक रोकडे या अठरा वर्षीय युवकाचा गुरुवारी दुपारी शिर्डी पोलीस ठाण्यात मृत्त्यू झाला. या युवकाने पॅन्टच्या बेल्टच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर, पोलिसांच्या मारहाणीत हा मृत्यू झाल्याची तक्रार युवकाच्या नातेवाईकांनी केली आहे. सकाळी साडे अकराच्या सुमारास या युवकास पाकीटमारीच्या संशयावरून मंदिर परिसरातील सुरक्षा रक्षक राक्षे यांनी शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले. ठाणे अंमलदार आयुब शेख यांनी त्यास लॉकअप गार्ड च्या ताब्यात दिले. यानंतर काही वेळात या युवकाने आपल्या कमरेच्या बेल्टच्या सहाय्याने लॉक अपच्या दरवाज्याला गळफास घेतला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. यावेळी कोठडीच्या सुरक्षेसाठी सहाय्यक फौजदार रज्जाक शेख, पोलीस कर्मचारी माने व आव्हाड होते. सव्वा बाराच्या सुमारास हा प्रकार लक्षात येताच ठाणे अंमलदार शेख यांनी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना हा प्रकार कळवला़ त्यानंतर वाघ यांनी तातडीने या युवकाला साईबाबा रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती समजताच मयताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सायंकाळपर्यंत ते पोलीस ठाण्यात ठिय्या धरून होते. युवकाच्या आईने आक्रोश करतांनाच पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली़ नातेवाईकांनी काहीवेळ रास्ता रोकोही केला. पोलिसांच्या मारहाणीमुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप युवकाचे वडील अशोक रोकडे, सुनील सोनवणे यांनी केला. पोलिसांनी किरणला ताब्यात घेतले होते तर त्याच्याकडील चीजवस्तू काढून का घेतल्या नाहीत. त्याने गळफास घेतला तेव्हा कोठडीचे सुरक्षा रक्षक कोठे होते? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपअधीक्षक विवेक पाटील शिर्डीत दाखल झाले़ या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविला जाणार असून दोषींवर कारवाई केली जाईल, असे जाधव यांनी नातलगांना सांगितले. मृतदेहाचे शवविच्छेदन पुणे येथे ससून रूग्णालयात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले़ शहरातील निलेश कोते,शिवाजी गोंदकर,कमलाकर कोते,अशोक पवार,विजय जगताप,सचिन शिंदे,सचिन चौघुले आदींनीही घटनेनंतर पोलीस स्टेशला धाव घेतली़ सायंकाळी माजी नगराध्यक्ष कैलास कोते व अभय शेळके यांनी नातेवाईकांचे सांत्वन करत त्यांची समजूत काढली़ रोकडे यांच्या मृतदेहाचा इनक्वेस पंचनामा तहसिलदारांच्या उपस्थित करण्यात आला़ (तालुका प्रतिनिधी)
शिर्डी पोलीस ठाण्यात युवकाचा मृत्यू
By admin | Updated: April 1, 2016 00:52 IST