विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील तरुणांनी कोरोनायोद्ध्यांची भूमिका पार पाडताना सामाजिक बांधिलकी जोपासत रुग्णसेवेचा वसा घेतला आहे. ते येथील अजितदादा पवार काेविड सेंटर येथे रुग्णसेवा बजावत आहेत.
पिंपळगाव पिसा येथे जिल्हा बँकेचे संचालक माजी आमदार राहुल जगताप यांनी २१ एप्रिल अजितदादा पवार कोविड सेंटर उभे करून परिसरातील कोरोनाबाधितांना उपचार व आधार देण्याचे काम सुरू केले. हे सेंटर उभारल्यापासून येथे परिसरातून दोनशेहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाले. त्यांची सेवा करण्याचे कार्य राहुल जगताप मित्रमंडळाच्या तरुणांनी हाती घेतले आहे. या सेंटरमध्ये अक्षय काळे, आशिष भोसले, अजिंक्य जगताप, खंडू पवार, सागर साठे, गणेश पवार, शशिकांत उजागरे व गणेश कांबळे हे तरुण रात्रंदिवस येथील रुग्णांची सेवा करताना त्यांना मानसिक आधार देण्याचे काम करत आरोग्यदूताची भूमिका निभावत आहेत.
स्वत:च्या जिवाची पर्वा न करता नास्ता, जेवण रुग्णांच्या खोलीमध्ये घेऊन जातात. त्यांना गोळ्या, औषधे घेतली का? काही त्रास होतोय का? याची आपुलकीने विचारपूस करतात. तसेच ऑक्सिजन पातळी तपासणे, प्रत्येकाला वाफ घेण्याची आठवण करून देणे, पाण्याची व्यवस्था, निर्जंतुकीकरण, स्वच्छता ही सर्व कामे करतात. काय हवं, काय नको? या गोष्टींकडे लक्ष देताना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्यांची काळजी घेतात. या तरुणांना मदत करताना कुकडी एज्युकेशन सोसायटीचे सर्व शिक्षक व कर्मचारी स्वयंस्फूर्तीने काम करत आहेत.
----
माणसात अंतर हवे, माणुसकीत नको?
या सामाजिक जाणिवेतून स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांची सेवा करत असलेले स्वयंसेवक हेच खरे कोरोनायोद्धे आहेत. जेथे दवा संपतो तेथे दुवा काम करतो. त्यामुळे या सर्वांना रुग्णांचा आशीर्वाद नक्कीच मिळणार आहे. कोरोना संकटाच्या काळात या तरुणांचे रुग्णसेवेचे काम कौतुकास पात्र आहे.
- राहुल जगताप,
माजी आमदार
---
या कोरोनाबाधितांची सेवा करण्यात एक वेगळाच आनंद आहे. आम्हा मित्रांना या कोविड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाल्याने मनस्वी आनंद होत आहे. अशा रुग्णांना मानसिक आधाराची खूप गरज असते. जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून तो आधार आम्ही देतो.
-अक्षय काळे,
कोरोनायोद्धा
----
१६ अक्षय काळे, आशिष भोसले, अजिंक्य जगताप, खंडू पवार