कोल्हार-घोटी महामार्गाचे धिम्या गतीने काम सुरू आहे. एका बाजूला खोदलेला खड्डेमय रस्ता आणि काही ठिकाणी डांबरीकरण यामुळे रस्ते वाहन अपघात वाढले आहे. खड्डेमय रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे.
सागर याचा महिनाभरापूर्वी याच रस्त्यावर पानओहळ या ठिकाणी खड्डा चुकवताना मोटारसायकल अपघात झाला होता. नाशिक व नगर येथील हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. महिनाभर त्याने मृत्यूशी लढा दिला. बुधवारी दुपारी उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. रात्री इंदोरी प्रवरा तिरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्याच्या पश्चात आई, भाऊ,भावजयी असा परिवार आहे.
.............
ग्रामस्थ करणार आंदोलन
रास्ता रोको आंदोलन सागरच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला खड्डेमय रस्ता आणखी किती बळी घेणार? सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे रस्त्यावरच काम रखडले आहे. ठेकेदाराची मुजोरी वाढवली असून रस्त्याचे काम अकोले तालुक्यात ठप्प आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे म्हणून अकोले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन शुक्रवारी पानओहळ येथे छेडण्यात येणार आहे.
इंदोरी व रूंभोडी ग्रामस्थांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.