अहिल्यानगर : वाडिया पार्क मैदानावरील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शेवटच्या दिवशी गालबोट लागले. गादी विभागातील अंतिम लढतीत पराभूत घोषित केल्याचा पंचाचा निर्णय अमान्य करत नांदेड येथील मल्ल शिवराज राक्षे याने आखाड्यातच पंचाची कॉलर पकडली. त्यांना लाथही मारली. त्यामुळे कुस्तीच्या मैदानावर गोंधळ उडाला. याप्रसंगी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत शिवराज व त्याच्या सहकाऱ्यांना मैदानाबाहेर काढले.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी रविवारी अहिल्यानगर येथील वाडिया पार्क मैदानावर अंतिम लढतीआधीच हा गोंधळ उडाला. माती व गादी विभागातून अंतिम लढतीसाठी दोन मल्ल निश्चित केले जाणार होते. त्यात गादी विभागातील लढत पुणे येथील पृथ्वीराज मोहळ व नांदेड येथील डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांच्यात सुरू झाली.
सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास या लढतीला प्रारंभ झाला. कुस्ती सुरू झाल्यानंतर पहिल्या २० सेकंदांतच पृथ्वीराज याने आक्रमक लढत करत शिवराज याच्यावर ताबा मिळविला. या दोघांमध्ये तुल्यबळ लढत सुरू होती. पुढील २० सेकंदात पृथ्वीराजने शिवराज याची पकड घेत त्याला खाली पाडले.
उपस्थित पंचाने शिवराज हा चीतपट झाल्याचे जाहीर करत पृथ्वीराजला विजयी घोषित केले. या निकालावर शिवराजसह त्याच्या प्रशिक्षकांनी आक्षेप नोंदविला. मात्र त्यांच्या तक्रारीची दखल पंचाने न घेतल्याने शिवराज चिडला. यावेळी पंच दत्ता माने यांच्याशी शिवराजने वाद घालत त्यांची कॉलर पकडली. त्यांना लाथही मारली. त्यामुळे आखाड्यात एकच गोंधळ उडाला.
बाहेर पडल्यानंतर शिवराजने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर जाऊन पंचाचा निर्णय चुकीचा असल्याची तक्रार केली.
अर्धाच पडला, चीतपट कसा?
कुस्तीदरम्यान शिवराज हा अर्धाच खाली पडला. त्याचे दोन्ही खांदे टेकलेले नव्हते. त्यामुळे तो चीतपट झालेला नव्हता. अशाही स्थितीत पंचाने शिवराजबाबत चुकीचा निर्णय दिला. यावेळी आम्ही तत्काळ आक्षेप घेतला. मात्र, आमची कुणीही नोंद घेतली नाही. याबाबत वरिष्ठ संघटनेकडे तक्रार करणार असल्याचे शिवराज राक्षे याच्या प्रशिक्षकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
शिवराज राक्षे याने कुस्ती आखाड्यात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर एकच गोंधळ उडाला. आयोजक कार्यकर्ते व पोलिसांनी आखाड्याकडे धाव घेतली.
पंचाने सर्वांना स्क्रीन दाखवावे : शिवराज
पंचाने विरोधी मल्लाला विजयी घोषित केले तेव्हा मी या निर्णयावर आक्षेप नोंदविला होता. आक्षेपानंतर कुस्तीचा निर्णय देता येत नाही. मात्र, माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाले. मल्लाचे दोन्ही खांदे जमिनीवर टेकलेले असेल तरच त्याला पराभूत घोषित केले जाते. माझे दोन्ही खांदे जमिनीवर टेकलेले नव्हते आणि जर खांदे जमिनीवर टेकल्याचे चित्रीकरणात दिसले तर मी हार मानायला तयार आहे. म्हणून पंचांनी कुस्तीची स्क्रीन पुन्हा सर्वांना दाखवावी आणि मग निर्णय द्यावा. स्पर्धेसाठी आम्ही वर्षभर मेहनत घेतो. मात्र, पंचाने माझ्यावर अन्याय केला, अशी प्रतिक्रिया शिवराज राक्षे याने माध्यमांशी बोलताना दिली.
राक्षे, गायकवाड ३ वर्षांसाठी निलंबित
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवित आक्षेपार्ह वर्तन केल्याने स्पर्धेतील सहभागी झालेला नांदेड येथील मल्ल शिवराज राक्षे व सोलापूर येथील मल्ल महेंद्र गायकवाड या दोघांना महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर संघाने तीन वर्षांसाठी निलंबित केल्याचे संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी सांगितले. स्पर्धेत दोन्ही मल्लांबाबत पंचानी दिलेले निर्णय योग्य होते मात्र, या मल्लांनी चुकीचे वर्तन केल्याने संघांनी त्यांच्यावर कारवाई केल्याचे तडस यांनी सांगितले.
पंचांचा मैदानावरच ठिय्या
घटनेवर संताप व्यक्त करत स्पर्धेतील पंचांनी मैदानात ठिय्या देत दोन्ही मल्लांवर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने कारवाई करावी, अशी मागणी केली. स्पर्धेसाठी चार दिवसांपासून पंच म्हणून १०५ जण काम पाहत होते.
पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी
६७ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अंतिम क्षणी सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला पराभूत करत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ याने रविवारी यंदाच्या महाराष्ट्र केसरी किताबावर नाव कोरले. विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याला चांदीची गदा आणि थार गाडीची चावी देण्यात आली.