अहमदनगर : वंचित व दुर्लक्षित घटकातील महिलांसाठी कार्य करणाऱ्या अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ आणि एमआयडीसी येथील एमसीसीआयए या औद्योगिक संघटनेच्यावतीने स्थलांतरित महिला कामगारांसाठी महिला दिनानिमित्त महिला शोषण प्रतिबंध व निवारण कायद्याबाबत कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत एमआयडीसीमधील स्थलांतरित महिला कामगारांना महिला शोषण प्रतिबंधात्मकतेच्या उपाययोजनेची माहिती दिली.
दिलासा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी उबरहंडे-देशमुख मार्गदर्शन करताना म्हणाल्या, सोशल मीडियाचा वापर करताना जागृत राहणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तींशी सोशल मीडियावर संवाद साधू नये. कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाल्यास पोलिसांशी संपर्क करावा. चुकीच्या गोष्टीला वेळ प्रसंगीच रोखल्यास पुढील धोका टाळता येतो. स्वत:चे संरक्षण करण्यासाठी महिलांनी जागृत व सक्षम होण्याची गरज आहे. जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव यांनी महिलांचे आजार, गुप्तरोग, एचआयव्ही बद्दल माहिती दिली. शारदा होशिंग यांनी अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून समाजातील बेवारस, निराधार मनोरुग्ण असलेल्या महिलांचे संगोपन करुन त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचाराची माहिती दिली.
यावेळी दीपाली टकले,प्रदीप बागुल, महेश पवार आदींसह कामगार महिला उपस्थित होत्या. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी सिराज शेख, नम्रता नागरगोजे, समुपदेशक पल्लवी हिवाळे-तुपे, श्रीकांत शिरसाठ, विकास बर्डे, अनिल दुधवडे, ऋतिक बर्डे, मच्छिंद्र दुधवडे यांनी परिश्रम घेतले.
---