तीसगाव : कल्याण-निर्मळ राष्ट्रीय महामार्गाच्या थंडावलेल्या कामाला गती द्यावी, फुलोरबाग ते श्रीक्षेत्र हनुमान टाकळी या ग्रामीण रस्त्याच्या दुरुस्तीसह प्रत्यक्ष लांबीनुसार मजबुतीकरण करावे, शेतीसाठी पूर्ण दाबाने व दिवसा वीज द्यावी, रोहित्र वाढवावेत, अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.८) सकाळी नऊ वाजता निवडुंगे (ता. पाथर्डी) येथील बसस्थानकावर ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले जाईल, अशी माहिती शिवसेना तालुका प्रमुख अंकुशराव चितळे, संघटक आसाराम ससे यांनी दिली.
निवडुंगे मढी परिसरात बिबट्याचा अधिक वावर आहे. जीवितहानी टाळण्यासाठी शेतीला पूर्ण दाबाने व दिवसा वीज द्यावी, मेंढवाडा, आंबेवाडी व आंधरवड वस्तीवर जास्तीचा अधिभार लक्षात घेऊन जास्त अश्वशक्तीचे रोहित्र बसवावेत, समर्थ हनुमान व कानिफनाथ देवस्थानला जोडणाऱ्या ग्रामीण सडक खड्डेरहित व वेड्याबाभळी हटवून मंजूर आकृतिबंधानुसार उर्वरित सातशे मीटर लांबीचे काम पूर्ण करावे, ठेकेदारावर यंत्रणेचा अंकुश नाही, त्यामुळे निकृष्ट व मंद गतीने कामे होत आहेत, अत्यंत वर्दळीचे रस्ते असल्याने रोजच अपघात घडत आहेत. मंगळवारी सकाळी रास्ता रोको करून विलंबाबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार असल्याचे चितळे, ससे यांनी सांगितले. सुनील पालवे, भाऊसाहेब निमसे, ऋषी गव्हाणे, सागर राठोड, नवनाथ वाघ, नवनाथ उगलमुगले, बजरंग धस आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.