शिर्डी : आपल्याला विषय पूर्ण माहिती नव्हता व आपले म्हणणेही अर्धवट दाखवण्यात आल्याने गैरसमज झाला़ मात्र कोणत्याही परिस्थितीत साईसंस्थानचा निधी बाहेर देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करून संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी निधी देण्याच्या वादावर पडदा टाकला़शिर्डीतील वैद्यकीय सेवेला दवा बरोबर दुव्याची जोड असल्याने ही सेवा अधिक सक्षम व लोकाभिमुख करू, शताब्दीच्या पार्श्वभूमीवर शहराचा व संस्थानचा एकत्रित विकास करू, यासाठी केंद्र व राज्याकडून निधी मिळवू,भाविकाचे दर्शन आनंददायी होण्याकरता येथे भक्तीमय,धार्मिक वातावरण निर्माण करू, सोयीसुविधा करतांनाच लेझर-शो,साईगार्डन सारख्या मनोरंजनाच्या सुविधा निर्माण करू अशी ग्वाही हावरे यांनी दिली़राज्यातील वैद्यकीय सेवेला वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी निधी मागितल्यानंतर महाजन यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले होते़ या पार्श्वभूमीवर संस्थान अध्यक्षांनी भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा बैठक होवू देणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता़ त्यामुळे मंगळवारी तणाव निर्माण होण्याची शक्यता होती़ मात्र सार्इंची श्रद्धा व सबुरीची शिकवण अंगिकारत दोन्ही बाजूंनी सकारात्मक व सामंजस्याची भूमिका घेतली़ प्रारंभीच ग्रामस्थांनी अध्यक्ष हावरे यांच्यासह उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त मोहन जयकर, भाऊसाहेब वाकचौरे, बिपीन कोल्हे, प्रताप भोसले, सचिन तांबे, राजेश सिंग व नगराध्यक्षा अनिता जगताप यांचा सत्कार करत त्यांच्या कामकाजाला शुभेच्छा दिल्या़ यावेळी ग्रामस्थांच्या वतीने विजय कोते, कमलाकर कोते, निलेश कोते यांनी शहरातील समस्या, भाविकांच्या अडीअडचणी, शहराचा मंदावलेला विकास याकडे लक्ष वेधले़ येथील समस्या व भाविकांच्या सुविधा होत नाहीत, शताब्दी सोहळा होत नाही तोवर निधी बाहेर देवू नये, अशी मागणी केली़ ज्या भाविकांनी पैसा दिलेला आहे, तो भाविक केंद्रस्थानी मानून रस्ते, कचरा, वाहनतळे, पाणी, दर्शनबारी, स्वच्छतागृहांबरोबरच लेझर-शो, साई गार्डन असे प्रकल्प मार्गी लावा, वरिष्ठ महाविद्यालय सुरू करा, रूग्णालयात चांगली सेवा उपलब्ध करून द्या, आदी मागण्या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आल्या़ यावेळी कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे, उपकार्यकारी अधिकारी संदीप आहेर, ग्रामस्थ विजय जगताप, नितीन कोते, रमेश गोंदकर, सुधाकर शिंदे, दत्तात्रय कोते, अमित शेळके, दीपक वारूळे, अशोक बाबुराव गोंदकर, दीपक गोंदकर, प्रकाश गोंदकर, सुजित गोंदकर, मंगेश त्रिभुवन, सचिन औटी, धनंजय साळी, गोकुळ ओस्तवाल, संजय गोंदकर आदी उपस्थित होते़(तालुका प्रतिनिधी)
साईसंस्थानचा निधी बाहेर देणार नाही
By admin | Updated: August 17, 2016 00:47 IST