अहमदनगर : एक-दोन निवडणुकीत आम्हाला अपयश आले असेल म्हणून विखे पॅटर्न संपला असे नाही. भविष्यात येणा-या निवडणुकांत जिल्ह्यातील विखे पॅटर्न दाखवून देऊ, असा विश्वास खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे गुरूवारी विखे यांच्या नेतृत्वाखाली विविध आढावा बैठका झाल्या. त्यानंतर विखे पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपकडे संख्याबळ नव्हते. राष्ट्रवादी-कॉँग्रेसनेही आमच्याशी संपर्क करून अर्ज मागे घेण्याची विनंती केली. वरिष्ठांशी चर्चा करून सर्व गोष्टी विचारात घेता तेथे आम्ही माघार घेतली, अशी प्रांजळ कबुली विखे यांनी दिली. त्याचवेळी त्यांनी शालिनीताई विखे या काँग्रेसमध्येच आहेत. जि.प.अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही त्या काँग्रेसच्या सदस्यांमध्येच बसल्या होत्या, असे स्पष्टीकरण दिले. गेल्या काही दिवसांतील निवडणुकांत जिल्ह्यात आम्हाला फटका बसला असेल म्हणून विखे पॅटर्न संपला असे नाही. भविष्यात हा पॅटर्न नक्की दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विखे पॅटर्न अजून संपलेला नाही-सुजय विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 12:11 IST