केडगाव : नगर तालुुक्यातील १७ गावांना ऐन दुष्काळात वरदान ठरलेली घोसपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ऐन पावसाळ्यात पाण्याअभावी बंद पडली आहे़ विसापूर धरणातीलपाणी संपल्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसापासून योजना बंद करण्यात आली आहे़ मात्र, कुकडी अधिका-यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे़विसापूर धरण क्षेत्रावर अवलंबून असणा-या शेतक-यांच्या मोटारी सुद्धा बंद करण्याची वेळ आली आहे़ पावसाळ्यात ही अवस्था झाली असून, पुढील काळात काय होणार, याची चिंता लाभधारक गावांमध्ये वाढली आहे़ घोसपुरी योजनेतून १५ गावांना पाणीपुरवठा होतो़ तसेच तालुक्यातील इतर गावांचे पाण्याचे टँकरही या योजनेवरुन भरले जातात़ मात्र, पाणीच नसल्यामुळे या योजनेवरील सर्व टँकर बंद करण्यात आले आहेत़ त्यामुळे लोकांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे़ तालुक्यात प्यायला पाणी नाही़ जनावरांनाही प्यायला पाणी नाही़ अशी पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही़ त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे़घोसपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना समितीचे अध्यक्ष संदेश कार्ले व योजनेत समाविष्ट गावातील सरपंचांनी निवासी उपजिल्हाधिका-यांना निवेदन दिले आहे़ विसापूर तलावातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी करण्यात आली. या योजनेतून पिण्याचे टँकर भरले जातात़ योजना बंद झाल्याने हे टँकर आता बंद झाले आहेत़ तालुक्यात पाऊस नसल्याने भीषण पाणी टंचाई आहे़ यामुळे टँकर व योजना सुरू राहणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणीसाठा दुप्पट करून तो राखीव करण्याची मागणी कार्ले यांनी केली.
विसापूर तलावातील पाणी संपले; १७ गावात पाणीबाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 15:10 IST