अहमदनगर : जिल्ह्यात दुष्काळाचा सामना करत असलेल्या जनतेला मदतीचा हात देण्यासाठी पुणे येथील रामकृष्ण मठ व येथील श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा समितीने पुढाकार घेतला असून, दुष्काळग्रस्त भागात मोफत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे़ या उपक्रमाचा शुक्रवारी वडगाव गुप्ता रोडवरील मठात शुभारंभ करण्यात आला़ यावेळी तहसीलदार सुधीर पाटील, समितीचे अध्यक्ष शेखर देव, सचिव सुनील होरणे, विराज आहुजा, डॉ. राहुल वाघुले, दीपक कोतकर, धनंजय विभुती, मानसी देव, अशोक अकोलकर, मधुवंती शिवगुडे आदी उपस्थित होते. उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात पारनेर तालुक्यातील भोयरे पठार, भोयरे बुद्रूक, नगर तालुक्यातील अरणगाव, चास या गावातील वाड्या-वस्त्यांवर टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. ६ जूनपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे़ यासाठी १३ हजार लीटर क्षमतेच्या दोन टँकरची व्यवस्था करण्यात आली असून, गरज पडल्यास या मोहिमेच्या काळात व टँकरच्या संख्येत वाढ करुन पावसाच्या आगमनापर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यानंतर जिल्ह्यातील इतर दुष्काळी भागात देखील समितीच्या वतीने दुष्काळस्थितीचा आढावा घेऊन प्राधान्यक्रमाने गावांना टँकरद्वारे पाणी वाटप केले जाणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली. सुनील होरणे यांनी समितीच्या कामकाजाविषयी माहिती दिली़ सुधीर पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. रामकृष्ण विवेकानंद सेवा समितीचा हा उपक्रम दुष्काळग्रस्तांसाठी आधार ठरणार आहे़ (प्रतिनिधी)
दुष्काळग्रस्तांसाठी देणार पाणी
By admin | Updated: May 6, 2016 23:25 IST