पारनेर : तालुक्यातील नारायणगव्हाण, वाडेगव्हाण, वाघुंडे बुद्रुक, घाणेगाव ग्रामपंचायतीच्यावतीने गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचे पाणी दूषित असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे. येथील पाण्याचे नमुने तपासल्यानंतर हे उघड झाले. ग्रामपंचायतीने वेळीच उपाययोजना हाती न घेतल्यास साथीचे आजार पसरण्याचा धोका असल्याचेही आरोग्य विभागाने कळविले आहे.पारनेर तालुक्यात आरोग्यविभागाने ग्रामपंचायतीच्यावतीने गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेव्दारे पाणीपुरवठा करणारे उद्भव व इतर ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेऊन त्याची तपासणी केली आहे. यामध्ये नारायणगव्हाण, वाडेगव्हाण या मोठ्या गावांसह वाघुंडे बुद्रुक व घाणेगाव येथील पाणीसाठे दूषित असल्याचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहेत.त्यानुसर आरोग्य विभागाने या गावांमध्ये ग्रामपंचायतीला पत्र देऊन त्वरीत उपाययोजना करण्यास सांगितले आहे. गावातील रहिवाशांना पाणी देताना जंतुनाशक पावडरचा योग्य वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गावात जनजागृती करण्याचे काम आरोग्य विभागाने सुरू केले आहे.
वाघुंडेसह चार गावांचे पाणीसाठे दूषित
By admin | Updated: September 19, 2014 23:40 IST