अहमदनगर : पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत नुकसानीची माहिती कृषी विभागाला द्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
खरीप हंगाम २०२१ मध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजना राज्यात राबविली जात आहे. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखमीच्या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग अशा आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते. स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीमअंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हे नंबरनुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप, संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांकावर तसेच बँक, कृषी व महसूल विभाग यांना कळवावे. नुकसान कळविताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक असणार आहे. याबाबत अधिक तपशिलासाठी तत्काळ नजीकच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उप विभागीय कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.