श्रीरामपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा शिवाजी चौकातील परिसरात बसविण्यात येईल. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे लवकरच प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी दिली. नगरपालिकेत बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत आदिक यांनी ही माहिती दिली. यावेळी नगरसेवक राजेंद्र पवार, रवी पाटील, दीपक चव्हाण, वैशाली चव्हाण, अल्तमेश पटेल, कलीम कुरेश मुक्तार शाह, प्रकाश ढोकणे उपस्थित होते.
आदिक म्हणाल्या, पालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्याचे राज्य सरकारचे आदेश होते. त्यामुळे त्याचे पालन करणे बंधनकारक होते. त्यामागे कोणताही अन्य हेतू नव्हता. केवळ काही मोजक्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ऑनलाईन सभेला हरकत नोंदविली. प्रत्यक्षात मात्र सभा खेळीमेळीत पार पडली. सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले. माझ्या कार्यकाळात शहरातील सर्व प्रभागांमध्ये २२ कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. आजवर कधीही न झालेली कामे पार पाडली. मात्र विरोधक हे केवळ किरकोळ चुका दाखविण्याचे काम करत आहेत. निकृष्ट व बोगस कामांवर आपण स्वत: आक्षेप घेतला असून संबंधित ठेकेदारांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
.........
नाट्यगृह खुले करणार
दिवंगत गोविंदराव आदिक नाट्यगृहासाठी अग्निशमन विभागाचा परवाना आवश्यक आहे. त्यासाठी प्रस्ताव पाठविला असून मंजुरी मिळताच ते खुले होईल, असा विश्वास आदिक यांनी व्यक्त केला.
---------
निवारामध्ये रस्ता गिळला
शहरातील निवारा सोसायटीत पालिकेचा अधिकृत रस्ता एका व्यक्तीने गिळंकृत केला आहे. पालिकेकडील नकाशामध्ये हा रस्ता दाखविण्यात आला आहे. मुख्याधिकारी यांच्याशी बोलून तो खुला केला जाईल, अशी माहिती आदिक यांनी दिली.
----------