तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्यासह त्यांच्या आई कांताबाई व कुटुंबातील आठ सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. कांताबाई यांच्यावर घरी तर काही सदस्यांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यापश्चात मुलगा रघुवीर खेडकर, मुली अनिता, अलका, मंदाराणी, नातू मोहित, अभिजीत, नात पूजा, जावई दीपकराव मेंगजी, गोतान्बर सौन्दाडेकर, राजेश खोल्लम असा परिवार असून, सर्व परिवार तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहे.
१९३९ मध्ये गुजरातमधील बडोदा जिल्ह्यातील टिंबा या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांना तमाशाचा कोणताही वारसा नव्हता. पुढे त्यांचे आईवडील सातारा या मूळगावी आले. तेथे कांताबाई यांना ‘नवझंकार मेळ्यात’ नृत्याची संधी मिळाली आणि त्यांचा कलाप्रवास सुरू झाला. मुंबईत तमाशा महर्षी तुकाराम खेडकर यांच्या तमाशात काम करताना, त्यांच्यातील कलाकार घडत गेला. खेडकर आणि कांताबाई या जोडीला अमाप लोकप्रियता मिळाली. पुढे खऱ्या आयुष्यातही ही जोडी एक झाली.
पती खेडकर यांच्या निधनानंतर कांताबाईंनी स्वतःचा फड उभा केला. अभिनेत्री, गायिका, वगनाट्य दिग्दर्शिका, व्यवस्थापक अशा विविध भूमिका त्यांनी निभावल्या. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सादर करण्याचा, तसेच मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात तंबू लाऊन सिने, नाट्यसृष्टीतील मान्यवरांसाठी तमाशा सादर करण्याचा पहिला बहुमान त्यांना मिळाला होता. त्यांच्या पार्थिवावर संगमनेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जीवनावर पत्रकार डॉ.संतोष खेडलेकर यांनी पुस्तक प्रकाशित केले आहे.
-----------
भालजी पेंढारकरांकडून चित्रपटात काम करण्याविषयी विचारणा
तुकाराम खेडकर यांच्याबरोबर कांताबाई यांनी सुमारे पन्नासहून अधिक सामाजिक, राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक वगातून प्रमुख भूमिका साकारली. १९५८ मध्ये चित्रमहर्षी भालजी पेंढारकरांकडून चित्रपटात काम करण्याविषयी त्यांना विचारणा झाली होती.
-------------
कांताबाई सातारकर यांची गाजलेली काही वगनाट्ये व त्यातील भूमिका
‘रायगडची राणी’ अर्थात पन्हाळगडचा नजरकैदी (सोयराबाई), ‘डोम्या नाग’ अर्थात सख्खा भाऊ-बहिणीचा पक्का वैरी (बायजा), ‘असे पुढारी आमचे वैरी’ (आवडा), ‘कलंकिता मी धन्य झाले’ (अनाथ आश्रमातील मुलगी), ‘पाच तोफांची सलामी’ (गजरा), ‘कोर्टादारी फुटला चुडा’ (सगुणा), ‘महारथी कर्ण’ (कुंती), ‘हरिश्चंद्र तारामती’ (तारामती), ‘जय-विजय’ (नायकीन), ‘अधुरे माझे स्वप्न राहिले’ (नर्तकी), ‘गवळ्याची रंभा’ (रंभा), ‘गोविंदा-गोपाळ्या’ (राणी), ‘विशालगडची राणी’ (राणी), ‘बेरडाची औलाद’ (सुगुणा), ‘१८५७ सालचा दरोडा’ (सुशीला), ‘चित्तोगडचा रणसंग्राम’ (राणाप्रताप), ‘तडा गेलेला घडा’ (अलका), ‘कोंढाण्यावर स्वारी’ (जिजाबाई).