मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मल्हारवाडी रस्त्यावरून रोहिदास दातीर यांचे अपहरण करण्यात आले. अपहरणाबाबत पोलीस ठाण्यात त्यांच्या पत्नी सविता दातीर यांनी चौघांच्या नावावर शंका व्यक्त करीत तक्रार दाखल केली होती. वांबोरी येथील हॉटेल व्यावसायिक कान्हू गंगाराम मोरे यांच्यावर सर्वाधिक संशय बळावला आहे. अपहरण प्रकरणात वापरलेली स्कॉर्पिओ (एमएच १७, एझेड ५९९५) ही गाडी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.
शोध सुरू असतानाच सदरचे वाहन कुकाणा (ता. नेवासा) येथे बेवारस अवस्थेत आढळूल आले आहे. अपहरण प्रकरणात असल्याचा संशय असलेल्या लाल्या ऊर्फ अर्जुन माळी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कान्हू मोरे, अक्षय इथापे, लाल तौफिक शेख यांच्या शोधासाठी संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी पोलीस पथक तैनात केले आहे. राहुरी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या पथकाने रात्रभर शोधमोहिम राबवीत एकास ताब्यात घेतले आहे. या घटनेचे कंगोरे उलगडण्यासाठी तिघांचा शोध घेतला जात असल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे.