अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयात तसेच महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील हेल्पलाइनवर येणाऱ्या कॉल्सची संख्या कमी झाली आहे. कोणती लस कुठे मिळणार, आज लस मिळणार का? याची चौकशी करणारे कॉल सध्या जास्त येत आहेत. त्यामध्ये १८ वर्षांच्या पुढील वयोगटाला लसीकरण सुरू झाल्याने लसीबाबत चौकशी करणाऱ्या कॉल्सच्या संख्येत वाढ झाली आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करणे, विलगीकरण, क्वारंटाइन सेंटर यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांना डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी जिल्हा रुग्णालय, महापालिकेच्या मुख्यालयात कोरोना वॉर रूम सुरू करण्यात आली होती. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन, बेड आणि रेमडेसिविर इंजेक्शनची टंचाई मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे ऑक्सिजन बेड कुठे मिळेल, रेमडेसिविर आहेत का, याची चौकशी जास्त व्हायची. आता सध्या फक्त लसीकरणाबाबत चौकशी होत आहे. म्युकरमायकोसिसचे उपचार कुठे होतात, कोविशिल्ड लस घेतली तर ताप येतो का, कोव्हॅक्सिन लस घेतली, तर अंग दुखते का, अशी विचारणा करणारे फोन येत असल्याचे वॉर रूममधील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
-----------
नगर शहरातून सर्वाधिक कॉल्स
नगर शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. तसेच ग्रामीण भागातील रुग्णही शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यामुळे नगर शहरातूनच सर्वाधिक कॉल्स झाले. ग्रामीण भागातून येणाऱ्या कॉल्सचे प्रमाण कमी होते. जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालयात कॉल्स येण्याचे प्रमाणही जास्त होते.
------------
पहिल्या लाटेत रोज येणारे कॉल्स- १००
दुसऱ्या लाटेत रोज येणारे कॉल्स-१५०
सध्या येणारे कॉल्स-२५
------------
आम्हाला लस कधी मिळणार?
सध्या जिल्ह्यात १९ वर्षांपुढील वयोगटाला लसीकरण सुरू आहे. त्यामुळे तरुणांमध्ये लस कधी मिळेल, याची उत्सुकता आहे. याबाबत महापालिका, जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच ग्रामीण रुग्णालयामध्येही लस कधी मिळणार, आज लस मिळेल का, कोणती लस चांगली, अशी विचारणा करणारे कॉल्स येत आहेत. सकाळी कधी यावे लागेल, लस घेतल्यानंतर त्रास होतो का, लस घेतली आता अंगदुखी वाढली आहे, ताप आला आहे, आता काय करू, अशी विचारणा करणारेही कॉल्स येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
---
डमी ८३२